Sale!

संवाद – अच्युत गोडबोले

350.00 300.00

तुताऱ्या, शिंगं, धूर यापासून फेसबुक आणि मोबाइलपर्यंतचा मानवी संवादाचा चित्तथरारक, रोमहर्षक आणि रहस्यमय प्रवास…

लेखक : अच्युत गोडबोले / Achyut Godbole
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन / Manovikas Prakashan

किंमत : रु. ३५०/-
सवलत किंमत : रु. ३००/-

Description

जगातला कुठलाही जीव संवादाशिवाय जिवंत राहूच शकत नाही. संवाद साधणं हे कुठल्याही जिवाला अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्याइतकंच गरजेचं असतं. कधी आपल्या सगेसोयऱ्यांना काही सांगायला, तर कधी त्यांना सावध करायला संवाद हा आवश्यकच असतो.

हे सगळं मी अनेक पुस्तकांमध्ये वाचलं होतं. पण मुळात माणसानं एकमेकांशी संवाद साधायला कशी आणि कशा प्रकारे सुरुवात केली याबद्दल मात्र मला लहानपणापासूनच प्रचंड कुतूहल होतं. माणूस हा पूर्वी जंगलात राहायचा. त्याला ना भाषा येत होती, ना त्याच्याकडे संपर्काची काही साधनं होती. माणूस जेव्हा टोळ्यांमध्ये राहायला लागला, तेव्हा तो एकमेकांना काही सांगण्यासाठी किंवा त्यांना सावध करण्यासाठी काय करत असेल ?

आपल्या मनातल्या भावना तो कशा व्यक्त करत असेल ? असे अनेक प्रश्न मला नेहमी पडायचे. कालांतरानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मिळत गेली आणि त्यातूनच माणूस इतर प्राण्यांपेक्षा कसा वेगळा आहे याचं प्रमाणही!

लेखक : अच्युत गोडबोले / Achyut Godbole
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन / Manovikas Prakashan

किंमत : ३५०/-
सवलत किंमत : ३००/-

प्रकाशक संपर्क

लेखक संपर्क

पुस्तक वाचा

प्रस्तावना

जगातला कुठलाही जीव संवादाशिवाय जिवंत राहूच शकत नाही. संवाद साधणं हे कुठल्याही जिवाला अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्याइतकंच गरजेचं असतं. कधी आपल्या सगेसोऱ्यांना काही सांगायला, तर कधी त्यांना सावध करायला संवाद हा आवश्यकच असतो.

जंगलातल्या माकडांनी विशिष्ट प्रकारे आवाज काढला, की जनावरं सावध होतात. वाघ जवळपासच कुठेतरी आहे याची ती खूण असते.

तर, काही विशिष्ट मासे शत्रू जवळ आला की आपल्या अंगातून विशिष्ट रसायनं बाहेर काढून आपल्याभोवती संरक्षक कवच निर्माण करून आपल्या शत्रूलाच ‘तू जवळ आलास तर तू नष्ट होशील’ अशी काहीशी धमकी देतात.

मुग्यांमधला ‘संवाद’ तर खूपच मजेशीर असतो.

निर्जन बेटावर अडकलेल्या माणसाला वेड लागण्याची आणि प्रसंगी त्याचा मृत्यू होण्याची शक्यता जास्तच असते. अत्यंत निगरगट्ट आणि क्रूर असलेला गुन्हेगार जर पोलिसांवर अरेरावी करत असेल किंवा जेलमध्ये गोंधळ माजवत असेल तर त्याची वेगळ्या  कोठडीत रवानगी होते. अशा गुन्हेगारांचा मग सगळ्यांशीच संपर्क तुटतो. असं केलं, की बहुतेक जण ताळ्यावर येतात.

हे सगळं मी अनेक पुस्तकांमध्ये वाचलं होतं. पण मुळात माणसानं एकमेकांशी संवाद साधायला कशी आणि कशा प्रकारे सुरुवात केली याबद्दल मात्र मला लहानपणापासूनच प्रचंड कुतूहल होतं. माणूस हा पूर्वी जंगलात राहायचा. त्याला ना भाषा येत होती, ना त्याच्याकडे संपर्काची काही साधनं होती. माणूस जेव्हा टोळ्यांमध्ये राहायला लागला, तेव्हा तो एकमेकांना काही सांगण्यासाठी किंवा त्यांना सावध करण्यासाठी काय करत असेल ?

आपल्या मनातल्या भावना तो कशा व्यक्त करत असेल ? असे अनेक प्रश्न मला नेहमी पडायचे. कालांतरानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मिळत गेली आणि त्यातूनच माणूस इतर प्राण्यांपेक्षा कसा वेगळा आहे याचं प्रमाणही!

साधारण 30 वर्षांपूर्वी मी ‘पटणी’त असताना एरिक लार्सननं लिहिलेलं ‘ग्रेट  आयडियाज इन कम्युनिकेशन’ हे पुस्तक वाचलं. ब्रिटिश कौन्सिलमधल्या त्या 150- 200 पानी पुस्तकात ‘अल्फाबेटस्ची सुरुवात कशी झाली?’ इथपासून माणसाच्या संवादा’चा संपूर्ण इतिहास अतिशय छान पद्धतीनं सांगितला होता. त्यामध्ये त्यानं टेलिग्राफ, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, अशा त-हेची संवादामधली प्रगती कशी झाली हे सांगितलं होतं. हे पुस्तक वाचत असताना आपण सहज वापरत असलेली अनेक संवादमाध्यमं किंवा संवादाच्या पद्धती तयार करण्यामागे त्यांच्या निर्मात्यांची किती कठोर साधना होती हे लक्षात आलं आणि मी प्रचंड भारावून गेलो. हे सगळं आपण इतरांनाही सांगावं असं तेव्हापासून मला वाटायला लागलं आणि ‘संवाद’ या विषयावर मराठीत पुस्तक लिहावं असं मनात आलं.

‘पटणी’नंतर मी ‘सिंटेल’ कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आणि नंतर ‘एल.अँड.टी. इन्फोटेक’मध्ये चीफ एझग्झेक्युटिव्ह म्हणून रुजू झालो होतो. त्यामुळे तेव्हा माझ्यावर खूपच जबाबदाऱ्या होत्या. हजारो कर्मचारी असलेल्या सॉफ्टवेअरच्या कंपन्या चालवण्याची जबाबदारी तेव्हा माझ्यावर होती. त्या सुमारासच वैयक्तिक आयुष्यात एका अतिशय कठीण परिस्थितीतून जाताना ‘ऑपरेटिंग सिस्टम्स’ हे कॉम्प्युटर सायन्सवरचं पुस्तक लिहिण्याची नितांत गरज आहे हे लक्षात आलं. ऑपरेटिंग सिस्टम्स हा कॉम्प्यूटर सायन्समधला सगळ्यांत अवघड विषय. तोच मला खूप सोपा करून सांगायचा होता. म्हणजे ते पुस्तक 700 पानी तरी होईल हे मला माहीत होतं. ‘संवाद’सुद्धा 600 पानी होईल याची मला खात्री होती. ही दोन्ही पुस्तकं एवढी मोठी होती, की कंपनीतल्या जबाबदाऱ्या सांभाळून ‘ऑपरेटिंग सिस्टम्स’ आणि ‘संवाद’  या दोन्ही विषयांवर लेखन करणं मला अवघड होतं. मुळात हे सगळं आपल्याला झेपेल की नाही, याचं मला खूप ओझं वाटत होतं. त्यामुळे या दोन्ही विषयांमधला एक विषय पहिल्यांदा निवडून त्यावर लिखाण करावं असं मी ठरवलं आणि ज्यावर लिहिण्याची त्यावेळी सर्वांत जास्त गरज होती त्या ‘ऑपरेटिंग सिस्टम्स’ या विषयावर पुस्तक लिहिण्याचा मी निर्णय घेतला. त्यानंतर मग मी कॉम्प्युटर सायन्सवर ‘डेटा कम्युनिकेशन्स अँड नेटवर्क्स’, ‘वेब टेक्नॉलॉजीज्’ आणि ‘डिमिस्टिफाइंग कम्प्यूटर्स’ अशी जाडजूड पुस्तकं लिहिली आणि तीही प्रचंड गाजली. चिनी भाषेसकट ती अनेक भाषांत अनुवादित झाली; आणि जगभर अनेक देशांत वापरली जायला लागली. एकीकडे पूर्ण कंपनीचा भलामोठा कारभार चालवायचा आणि दुसरीकडे अशी पुस्तकं लिहीत राहायचं या सगळ्यांत माझी बरीच वर्षे गेली. या सगळ्यांत ‘संवाद’ हे पुस्तक मात्र मागेच पडलं होतं.

कामानिमित्त माझ्या अनेकदा परदेशवाऱ्या व्हायच्या. जवळपास दर दोन महिन्यांनी एक तरी परदेशवारी ठरलेली असायची. नोकरीत असताना ‘संवाद’चं लिखाण जरी मला हाती घेता आलं नसलं, तरी मी शांत बसलेलो नव्हतो. त्यावेळी इंटरनेटची किंवा आतासारखी अमॅझॉनवरून पुस्तकं मागावायची सोय नव्हती.

मग बंगलोर, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, बॉस्टन, सिडनी, अशा देशविदेशांत जिथे जिथे जाईन तिथे या विषयाची पुस्तकं तिथल्या लायब्ररीत बसून मी वाचत बसे किंवा अमेरिकेतली ‘बार्नस् अँड नोबल्स’ किंवा लंडनमधलं ‘फॉइल्स’ अशा पुस्तकाच्या मोठमोठ्या दुकानातून ट्रेफूल आणि जेम्स यांनी लिहिलं ‘एनसायक्लोपीडिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’, चँडलर आणि अलेड  यांनी लिहिलेलं ‘इन्व्हेंटिंग दि इलेक्ट्रॉनिक सेंच्युरी’, मॅबी आणि कार्लटन यांनी लिहिलेलं ‘दि अमेरिकन लिओनार्डो : द लाइफ ऑफ सॅम्युएल एफ. बी. मॉर्स’, कूकसन आणि गिलियान यांनी लिहिलेलं ‘द केबल टॅट चेंज्ड द वर्ल्ड’ अशी अनेक पुस्तकं विकत घेऊन गोळा करत गेलो. नुसतं पुस्तकं गोळा करून थांबलो नाही, तर त्यावर मी अभ्यासही सुरू केला. संशोधकांच्या डोक्यात एखादी कल्पना येणं, त्यानंतर ती कल्पना प्रत्यक्षात उतरवणं, तसंच ती प्रत्यक्षात उतरवल्यानंतर होणाऱ्या पेटंटसाठीच्या आणि मोठ्या कंपन्यांमधल्या मारामाऱ्या यांच्याविषयीच्या गंमतीजमती वाचून मजाही आली. त्यामुळे आपण हे लोकांपर्यंत पोहोचवायला हवं हे तीव्रतेनं वाटायला लागलं.

त्याचवेळी ‘संवाद’चा आराखडा माझ्या मनात तयार होत गेला. तोपर्यंत इंटरनेट किंवा मोबाइल यांचा जन्मच झाला नसल्यामुळे टेलिव्हिजनपर्यंतचा इतिहास लिहावा असंच मी ठरवलं होतं.

संवाद साधण्याच्या माणसाच्या इतिहासात मला प्रचंडच रंजक, भन्नाट आणि कित्येक वेळा अविश्वसनीय गोष्टी वाचायला मिळाल्या. सुरुवातीला आपला संदेश दूरवर पोहोचवण्यासाठी माणसानं आहेत त्या साधनांचा वापर सुरू केला. उदाहरणार्थ, त्यानं झाडांच्या खोडाच्या मदतीनं एन्डिमो हे ढोलसदृश उपकरण तयार केलं. मग गुहेत चित्रं काढून चक्क एक चित्रलिपी तयार केली. कबुतरांचाही अभ्यास करून त्यांना प्रशिक्षण देता येतं हे समजल्यावर कबुतरांचाही वापर संदेशवहनासाठी करता यायला लागला. याबरोबर धूर, आग, दवंडी, तुतारी, निरोपे आणि कोडभाषेतला चॅपचा मेकॅनिकल टेलिग्राफ असे अनेक प्रकार गाजले.

मला छपाईचा इतिहास सांगणारीही अनेक पुस्तकं मिळाली. पूर्वी माहिती साठवून ठेवणं ही मोठी कसरत असायची. दगडांवर कोरण्याची कला माणसानं अवगत केली होती. नंतर वूडब्लॉक प्रिंटिंगचा शोध कसा लागला, मग नुसत्या दगडावरच नाही तर कापडावरही छपाई कशी करता यायला लागली, पपायरसचा शोध लागल्यावर त्यावर छपाई कशी सुरू झाली हा सगळा छपाईयंत्र येण्यापूर्वीचा प्रवास वाचून मी थक्क झालो. छपाईयंत्राचा शोध कधी आणि कोणी लावला याची कहाणी तर फारच अफलातून आहे. छपाईयंत्राचा संशोधक गुटेनबर्ग याला छपाईयंत्राची निकड कशी समजली, त्यानं आपल्या या शोधकार्यासाठी पैसे उसने घेऊन छपाईसाठी लागणाऱ्या अक्षरांचा शोध कसा लावला आणि पहिल्या प्रिटिंग प्रेसची सुरुवात कशी झाली, त्यानंतर पुस्तकांची छपाई कशी सुरू झाली, आधी काळ्या-पांढऱ्या रंगात छापली जाणारी ही पुस्तकं रंगीत केव्हा आणि कशी झाली हे सगळंच वाचताना गंमतशीर वाटलं. गुटेनबर्गवर एक केस झाली होती, ती तर मजेशीरच आहे.

घरोघरी बातम्या पोहोचवणारी वर्तमानपत्रं आणि त्या बातम्या घेऊन येणारे वार्ताहर यांच्याबद्दलचा इतिहास आपल्याला फारसा माहीत नसतो. हासुद्धा संवादाचाच एक प्रकार आहे. बोचरी थंडी, भीषण उन्हाळा किंवा महाभयानक पाऊस या सगळ्यांत कसलीही तक्रार न करता अगदी दुर्गम भागांतून बातम्या आणणाऱ्या या वार्ताहर मंडळींचे एक एक कारनामे वाचायला मिळाले, तेव्हा तर मी अचंबितच झालो. मुळात वर्तमानपत्रं किंवा वृत्तसंस्था का आणि कधी निर्माण झाल्या, परदेशातून येणारी बातमी आपल्या  वर्तमानपत्राला सगळ्यात आधी छापता यावी यासाठी आटापिटा करणारे वार्ताहार, विल्यम हॉवर्ड रसेल या युद्धवार्ताहराच्या साहसकथा, अशा अनेक गोष्टी मला या पुस्तकांमधून वाचायला मिळाल्या. विल्यम स्टेड या वार्ताहरानं स्वत:चा जीव धोक्यात घालून कुमारवयातल्या वेश्यांच्या संदर्भात गोळा केलेली माहिती आणि पुरावे, त्यांच्या व्यथा जगासमोर आणण्याचा प्रयत्न, हे सगळं छापून आणणाऱ्या वर्तमानपत्राच्या ऑफिसवर झालेला हल्ला, शेवटी संसदेत यावर झालेली चर्चा हे सगळं वाचून वार्ताहर, वर्तमानपत्रं, तसंच वृत्तसंस्था ही नुसती बातम्या पुरवणारी माध्यम नसून त्या आपल्या समाजात किती महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात हे लक्षात आलं.

पोस्टव्यवस्था सुरू झाली तेव्हाही पोस्टमन चालत जाऊन किंवा घोड्यावर स्वार होऊनच पत्रं पोचवत. पोस्टमनना घोडे पुरवायला लागायचे. पण अनेकदा घोडे उपलब्ध नसायचे तेव्हा चक्क एखाद्या शेतात उभा असलेला घोडा दिसला, की तो कसा पळवून नेला जायचा आणि मग त्याच्या मालकाच्या ते लक्षात आल्यावर तो त्यांच्या मागे कसा धावत सुटायचा अशा अनेक गमतीजमती पुस्तकांतून वाचायला मिळाल्या. पोस्टव्यवस्था सुरू झाली तेव्हा ज्याच्यासाठी ते पत्र पाठवलंय, त्यालाच ते पत्र घेताना पोस्टमनला पैसे द्यावे लागायचे; पत्र पाठवणाऱ्याला नाही. याचं कारण ज्याला पत्र मिळतंय त्यालाच पत्रामधून काहीतरी मिळत असतं अशी भावना होती. थोडक्यात पत्र येणं हा भुर्दंडच असायचा. एवढंच नव्हे, तर आपल्या शत्रूला गारद करण्यासाठी मग लोक रोज एक फालतू पत्र पाठवायला लागले! मग लोक चक्क पत्रं घेणंच टाळायचे आणि अनेकदा  लपूनही बसायचे. पत्र पोहचवण्याची पोस्टमनची जबाबदारी असल्यानं त्याची कशी तारांबळ उडायची, पोस्टमनला पैसे न देताही पत्र वाचण्याच्या क्लृप्त्या लोकांनी कशा शोधून काढल्या, पोस्टव्यवस्थेत कशी सुधारणा आली; आपण पत्रांना स्टॅम्प चिकटवतो ती कल्पना का, कधी आणि कुणाच्या डोक्यात आली; स्टॅम्प चिकटवण्यासाठी काय वापरावं याचा शोध कसा आणि कधी लागला, पत्रं दूरदेशीही जायला लागल्यावर आंतराराष्ट्रीय पातळीवर पोस्टाचे दर कसे ठरवले गेले, हे सगळंच फारच रंजक आहे.

गंमत म्हणजे 1913 साली जेव्हा पोस्टाकडून ‘पार्सल’ची सेवा सुरू झाली तेव्हा या सेवेचा फायदा घेऊन लोक पार्सलमधून वाटेल ते पाठवायला लागले. अगदी आपली मुलंसुद्धा! या प्रतापाची सुरुवात ज्या जोडप्यानं केली त्या जोडप्याला आपल्या आठ वर्षाच्या मुलाला त्याच्या आजीकडे ‘पार्सल’ करायला फक्त 50.15 डॉलर्स इतकाच खर्च आला आणि त्यातले 50 डॉलर्स हा तर विम्याचाच खर्च होता! ही बातमी पसरली तसं पोस्टाकडे ‘मुलांचं पार्सल’ हा पार्सलचा नवाच प्रकार सुरू झाला. 2-3 वर्षांची मुलं असतील तर पोस्टमन चक्क त्यांना आपल्या झोळीत टाकायचे आणि घेऊन जायचे. त्यापेक्षा मोठी मुलं पोस्टमनबरोबर चालत जायची!! लवकरच पोस्टानं अशा ‘बेबी मेल्स’वर बंदी घातली, असली तरी काही महाभाग मात्र हे मान्य करायला तयार नव्हते. याबाबत एक दंत(कथा) आहे. 1980 साली एका चोराला म्हणे शहर सोडून जायचं होतं. पण जाणार कसं हा त्याच्यापुढे प्रश्न होता. त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्यानं एका पेटीवर  ‘म्यूझिकल इन्स्ट्रुमेंट्स’ म्हणजे ‘वाद्यांची पेटी’ असं नाव लिहिलं आणि स्वत:ला त्यात बंद केलं. ही पेटी त्यानं पार्सल करुन घेतली. गंमत म्हणजे त्यानं या पेटीत अन्नाची तर सोय करून ठेवली होतीच; पण चोरी केलेला माल आणि ऑक्सिजन टँक यांचीही सोय केली होती. हे पार्सल विमानानं जाणार होतं. ते पार्सल विमानात ठेवलंही गेलं आणि कुणाला तसूभरही शंका आली नाही. ते पार्सल विमानानं अॅटलांटा विमानतळावर उतरल्यानंतर मात्र गोंधळ झाला.

हे पार्सल विमानातून उतरवताना त्या पेटीचं झाकण चुकून उघडलं गेलं आणि हा चोर पकडला गेला. यातला गमतीचा भाग सोडला, तर पोस्टाची ‘पार्सल’ ही सेवा लोकांना प्रचंडच भावली होती यात शंकाच नाही!

विजेचा उपयोग करून एका ठिकाणाहून संदेश दुसरीकडे पाठवता येणं ही किती क्रांतिकारक गोष्ट होती हे त्यावेळी मला ही पुस्तकं वाचताना जाणवलं. त्यानंतर विजेच्या उपकरणातून टेलिग्राफ, टेलिफोन, टेलिव्हिजन असे एक एक शोध लागत गेले आणि संवादाच्या इतिहासातलं दुसरं पर्व सुरू झालं.

टेलिग्राफ हा संदेशवहनाच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरला. टेलिग्राफचा शोध लागायच्या आधी अब्राहम लिंकनचा अमेरिकेत खून झाला होता, पण तेव्हा ती बातमी इंग्लंडमध्ये पोहोचायला तब्बल दीड महिना लागला होता! त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेश पोचताना लागणारा वेळ हा फार मोठा काळजीचा विषय टेलिग्राफच्या येण्यानं दूर झाला आणि मुख्य म्हणजे जग जवळ आलं. पण या शोधामुळे संदेशवहनाच्या पोनी एक्स्प्रेससारख्या अनेक पारंपरिक पद्धती बंद पडल्या. टेलिग्राफ येण्याआधी पोनी एक्स्प्रेस  या पोस्टव्यवस्थेचं जाळं संपूर्ण अमेरिकेत पसरलं होतं. जवळजवळ 1800 मैलांचं अंतर पार करत पत्रांची देवाणघेवाण करताना या एक्स्प्रेसच्या घोडेस्वारांना किती भयंकर अडचणींना तोंड द्यावं लागायचं! या अडचणींचा ते कसं सामना करायचे, आपला जीव धोक्यात घालून ती पत्रं ते कशी पोचती करायचे आणि मग त्यांना चक्क एखाद्या हिरोचा दर्जा कसा मिळायचा अशा अनेक साहसकथा मला या पुस्तकांमधून वाचायला मिळाल्या. एवढ्या मोठ्या प्रवासात त्यांना आणि त्यांच्या घोड्यांना आराम मिळावा म्हणून ‘होम स्टेशन्स’ उभारली जायची. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना जशी जंक्शन्स असतात तशी ही स्टेशन्स असायची.

इथे घोडे आणि कधी कधी तर घोडेस्वारही बदलले जायचे. हा नवीन घोडेस्वार मग नवीन घोड्यावर स्वार होऊन पुढच्या होम स्टेशनपर्यंत पोहोचायचा. असं करत करत मग संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवला जायचा. या होम स्टेशन्समध्ये सोयी कशा असायच्या आणि तिथे मग हळूहळू हॉटेल्स, दुकानं असं जत्रेचं स्वरूप कसं येत गेलं आणि मग तिथे एक वेगळीच लोकवस्ती आणि संस्कृती कशी उदयाला आली हे सगळंही मजेशीरच आहे.

पण टेलिग्राफ आलं आणि पोनी एक्स्प्रेस जवळपास रातोरात बंद पडलं!

टेलिग्राफचा जन्म झाला तेव्हा टेलिग्राफचा उपयोग आणि महत्त्व लोकांना लक्षातच येईना.

पण एका घटनेनं मात्र लोकांना टेलिग्राफचं महत्त्व समजलं आणि टेलिग्राफची लोकप्रियता प्रचंड वाढली. स्लाऊच्या जवळ ‘स्लॅट हिल’ इथे सारा हार्ट नावाच्या एका बाईचा खून झाला.

त्या खुन्याला पळून जाताना एकानं बघितलं.

त्यानं त्याचा पाठलाग केला तेव्हा तो खुनी  स्लाऊहून पॅडिंग्टनकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून पळून जाताना त्यानं पाहिलं. त्या काळात एखाद्या खुन्यानं किंवा दरोडेखोरानं गुन्हा करुन रेल्वे पकडली म्हणजे तो पकडला जाण्याची शक्यता जवळपास शून्यच असायची. कारण त्या काळात रेल्वेपेक्षा जलद जाणारं असं काहीच नव्हतं. पण त्या खुन्याला बघणाऱ्या माणसाला तारायंत्रातून तो संदेश स्लाऊहून पॅडिंगटनच्या टेलिग्राफ ऑफिसपर्यंत पोहोचवायची कल्पना कशी सुचली, हा संदेश पुढे पाठवताना स्लाऊचा टेलिग्राफ ऑपरेटर कसा दचकला, नंतर पॅडिंगटनला तो खुनी ट्रेनमधून खाली उतरताच, स्टेशनवरच तो खुनी कसा पकडला गेला याची गोष्ट वाचताना शेरलॉक होम्सचीच एखादी कथा आपण वाचतोय असं मला वाटलं; आणि टेलिग्राफची कमालही वाटली. लोकांना टेलिग्राफचं महत्त्व पटल्यावर टेलिग्राफ अॅटलांटिकपार नेण्याचे प्रयत्न सुरू काय होतात, त्या तारा समुद्रातून टाकताना किती वेळा प्रयत्न फसतात-इतकं, की पॅपिलॉन कादंबरीची आठवण व्हावी. त्यात कहर म्हणजे अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा ती तार अॅटलांटिकपार पोहोचणार, तेव्हढ्यात त्या तारेला तण समजून त्या तारेचा एक तुकडा कापून एक कोळी आपल्या बायकोला गंमत म्हणून आणून दाखवतो काय, आणि मग सगळा प्रयोग फसतो काय, अशा अनंत अडचणींचा सामना करत आणि अनेकदा अपयश झेलत त्या तारा अॅटलांटिक पार जातात काय, हे सगळंच भन्नाट होतं. हा इतिहास लिहिताना मला खूप मजा आली. टेलिफोनचंही तसंच.

कानानं अधू असलेल्यांना शिकवताना अलेक्झांडर ग्रॅहम बेल त्यांच्यासाठी एक खास भाषा तयार करतो काय, कानानं अधू असलेल्या  एका तरुणीला तो शिकवायला तिच्या घरी जायला लागतो काय, मग तिच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न करतो काय, नंतर टेलिफोनचा शोध लावतो काय, एलिसा ग्रे नावाचा संशोधकही त्याच सुमारास टेलिफोनचा शोध लावतो काय, दोघंही पेटंट ऑफिसकडे निघतात काय आणि बेल हा त्या ऑफिसकडे ग्रेच्या काहीच मिनिटांआधी पोहोचल्यामुळे टेलिफोनचं पेटंट बेलला मिळतं काय, मग बेलचं बेल लॅब्ज आणि एटी अँड टीसारखं साम्राज्य उभं राहतं काय, ही सगळी अजब कहाणीच मला वाचायला मिळाली. सुरुवातीला टेलिफोनविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये होते. उदाहरणार्थ, टेलिफोनमधून जंतूंचा प्रसार होतो असं लोकांना वाटायचं. म्हणजे बॉस्टनमध्ये जर एखादी रोगाची साथ आली असेल, तर त्या रोगाचे जंतू त्या तारेतून बॉस्टनहून न्यूयॉर्कला येतील या कल्पनेनं बॉस्टनहून कोणी न्यूयॉर्कला फोन केला तर लोक न्यूयॉर्कमध्ये टेलिफोन चक्क फोडायचे किंवा टेलिफोनचे खांब उखडून टाकायचे. अशा खूप गमतीजमती वाचायला मिळाल्या.

टेलिफोन एक्सचेंजची कल्पना कुणाच्या आणि का डोक्यात आली याची गोष्ट तर फारच मजेशीर आहे. ती वाचून तर मी उडालोच. स्वयंचलित टेलिफोन एक्स्चेंज येईपर्यंत टेलिफोन ऑपरेटरला वॉचमन, टाईमकीपर आणि सेक्रेटरी अशी अनेक कामं करावी लागायची. अशीच कॅन्सस शहरातल्या टेलिफोन ऑपरेटरची एक (दंत) कथा मला वाचायला मिळाली. त्या शहरात दफनविधीचं सामान पुरवणारे दोघे जण होते. एक होता स्ट्रोगर आणि दुसरा त्याचा प्रतिस्पर्धी होता.

त्यातल्या स्ट्रोगरच्या प्रतिस्पर्ध्याची बायको ही टेलिफोन ऑपरेटर होती. गावात कुणी मरण  पावला आणि कोणी स्ट्रोगरला फोन लावला तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याची टेलिफोन ऑपरेटर असणारी बायको स्ट्रोगरऐवजी आपल्या नवऱ्यालाच तो टेलिफोन जोडून द्यायची. त्यातून कोणी स्ट्रोगरशी बोलण्याचा हट्टच धरला, तर ती स्ट्रोगरचा फोन एंगेज्ड आहे असंही कधीकधी खोटंच सांगायची आणि मग तिच्या नवऱ्याला तो बिझनेस मिळायचा. स्ट्रोगरचा धंदा बसायला लागल्यावर यामागची गोम त्याच्या लक्षात आली आणि मग त्यानं यावर उपाय म्हणून ऑटोमॅटिक टेलिफोन एक्स्चेंजच चक्क शोधून काढलं! ही सगळी गोष्ट खूपच मजेशीर आहे.

रेडिओचा शोधकर्ता मार्कोनी याची वेगळीच व्यथा होती. इतका मोठा शोध लावला तरी त्याला आपल्या स्वदेशी म्हणजे इटलीमध्ये कुणीच विचारलं नाही. त्याला खरा मान मिळाला तो इंग्लंडमध्ये! तोही झटकन मिळाला नाही. इंग्लंडमध्ये शिरताना विमानतळावरच कस्टम्समध्ये त्याला आपल्या उपकरणामुळे अडवलं गेलं होतं. आपल्या या उपकरणाच्या मदतीनं तारा नसतानाही आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बोलू शकतो हे त्यानं तिथल्या कस्टम्स ऑफिसर्सना परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्या अधिकाऱ्यांना काही त्याचं म्हणणं समजलं नाही. खरं तर त्यांचा त्याच्यावर विश्वासही बसला नाही. उलट ते त्याला हसले.

मार्कोनीनं नक्कीच यात काहीतरी लपवून आणलंय असा संशय त्यांना आला आणि त्यांनी ते उपकरण तपासताना त्याची चक्क मोडतोड केली. मार्कोनीला नंतर ते परत सगळं जोडावं लागलं होतं. पण त्यानंतर रेडिओ हा जगभरात आणि घराघरात कसा पोहोचला याची कहाणी अतिशय वाचनीय आहे. टेलिव्हिजनची कहाणीही अशी रंजक आहे.

रडारवर फारसं बोललं किंवा वाचलं जात नाही. रडार हाही संवादाचा एक अप्रतिम प्रकार आहे. रडार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसलं, तरी आपल्या सुरक्षिततेसाठी ते कायम सज्ज असतं. अगदी विमानांना सावध करण्यापासून ते आपल्या गाडीचा वेग मोजण्यापर्यंतची अनेक कामं ते करतं. आपल्या सिग्नल्सचा उपयोग करून आपल्या सिस्टमला माहिती देण्याचा प्रवास म्हणजे एक प्रकारचा संवादच आहे.

पण हे रडार म्हणजे काय, त्याचा शोध कसा लागला, रडारमुळे दुसरं महायुद्ध मित्र राष्ट्रांनी जिंकायला कशी मदत झाली हे सगळं एखाद्या चित्रपटात शोभेल असं आहे.

रडारपर्यंतच्या प्रवासावर माझा अभ्यास आणि त्यावरचं लिखाणही 30 वर्षांपूर्वीच झालं होतं. पण मला दर दोन महिन्यांनी मिळणारी नवीन पुस्तकं मला माझं पुस्तक पूर्ण होऊ देईनात. कारण त्यात मला आणखीन नवी आणि रंजक माहिती मिळत गेली. मग आपल्या पुस्तकात हेही घालायला हवं, वाचकांना हेही सांगायला हवं, असं वाटल्यामुळे आणि मी एक पर्फेक्शनिस्ट बनण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हे बाड अक्षरश: 30 वर्षं धूळ खात पडलं होतं. या काळात अर्थातच इंटरनेट, मोबाइल आणि फेसबुक अवतरले होते.

त्यांच्याही कहाण्या अजबच होत्या.

त्यांच्याविषयी न लिहिता हे पुस्तक पूर्ण होऊच शकलं नसतं.

दरम्यान कंपनीमध्ये माझ्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतच चालल्या होत्या. हजारो सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या कंपन्या चालवणं तसंच अमेरिका, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणची ऑफिसेस सांभाळण्याची जबाबदारी, त्यासाठी वारंवार  करावा लागणाऱ्या परदेशवाऱ्या, तसंच मोठमोठे निर्णय घेण्याची जबाबदारी, या सगळ्यामुळे मला लिखाणाकडे परत वळायला मुळी वेळच मिळेना. लिखाण करायचं म्हणजे मला नोकरी सोडावी लागली असती. त्यामुळे लेखन करावं की नोकरी हा प्रश्न मला सतत सतावत होता.

पण माझ्या मुलामुळे मला नोकरी करणं भागच होतं. असं असलं तरी लिखाण करण्याची आवड मला फार वर्ष नोकरीत बांधून ठेवू शकली नाही आणि 12 वर्षांपूर्वी दरवर्षी 2-3 कोटी रुपयांच्या दोन नोकऱ्या नाकारून मी पूर्णपणे लिखाणाकडे वळलो आणि मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे आणि त्यात आपण निदान 1% तरी भर टाकावी या उद्देशानं यापुढे मराठीतूनच लिहायचा मी निश्चय केला.

त्यानंतर मात्र मी मराठीत ‘संगणकयुग’ (संगणक), ‘बोर्डरूम’ (व्यवस्थापन), ‘नादवेध’ (संगीत), ‘किमयागार’ (विज्ञान), ‘अर्थात’ (अर्थशास्त्र), ‘गुलाम’ (गुलामगिरी), ‘थैमान चंगळवादाचे’ (चंगळवाद), ‘नॅनोदय’ (नॅनोटेक्नॉलॉजी), ‘स्टीव्ह जॉब्ज’ (चरित्र), ‘मनात’ (मानसशास्त्र), विक्रमी खपाचं ‘मुसफिर’ (आत्मचरित्र), ‘गणिती’ (गणित), ‘झपूर्झ 1’, ‘झपूर्छा 2’, ‘झपूर्झ 3’ (विदेशी साहित्य), ‘कॅनव्हास’ (चित्र-शिल्पकला), ‘लाईमलाईट’ (विदेशी चित्रपट), ‘विदेशी जीनियस (भाग 1,2,3)’, ‘भारतीय जीनियस (भाग 1,2,3), ‘तंत्रज्ञ जीनियस (भाग 1,2,3)’, ‘मनकल्लोळ भाग 1 आणि 2’ (मनोविकार), ‘रक्त’ (रक्त), ‘सिंफनी’ (पाश्चात्त्य संगीत) आणि ‘व्हिटॅमिन्स’ (व्हिटॅमिन्स) अशी काही मी एकट्यानं आणि काही सहलेखकांबरोबर अशी अनेक पुस्तकं लिहिली. ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘अर्थात’  ‘नॅनोदय’ आणि ‘मनात’ या पुस्तकांना तर राज्यशासनासह अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले.

ही पुस्तकं लोकांनाही खूप आवडली.

‘मुसाफिर’च्या 65000, ‘मनात’च्या 45000 आणि इतर 25000 ते 30000 एवढ्या प्रती खपल्या. पण ‘पुस्तक किती खपलं यापेक्षा, मला दररोज डझनावर असे आतापर्यंत हजारो फोन्स, इमेल्स आणि मेसेजेस येतात आणि या पुस्तकांमुळे आपलं आयुष्य कसं बदललं, नैराश्य कसं गेलं, विषय कसे समजले, आत्महत्येपासून परावृत्त कसे झालो, कलेची आवड कशी लागली, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा स्वीकारला’ असं भरभरून सांगतात तेव्हा मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा लिहिण्याचा हुरूप वाढतो.

एवढी पुस्तकं झाल्यावर गेल्या वर्षामध्ये आता तरी ‘संवाद’ हे पुस्तक पूर्ण करावं असं मला वाटायला लागलं आणि ते पूर्ण करण्याचा मी ध्यास घेतला. तोपर्यंत संवाद वेगळ्या स्तरावर पोहोचवणाऱ्या माध्यमांची भर पडली होती. इंटरनेट, सेलफोन, फेसबुक, व्हॉटस् अॅप आणि ट्विटर यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. त्यांच्यामुळे जगाचा चेहरामोहराच बदललेला असल्यानं त्यांचा अभ्यास करणं मला भाग होतं. अतुल कहातेची फेसबुक, गुगल, इंटरनेट ही पुस्तकं इतक चांगली आहेत, की त्यांचा या पुस्तकाकरिता मला खूपच फायदा झाला. त्या संदर्भातली इतरही अनेक पुस्तकं मी वाचली.

आपल्यासमोर ज्ञानाचं भांडार उघडून देणारं ‘इंटरनेट’ हे खरंतर पूर्वी इंटरनेट नव्हतंच.

ते ‘आप’नेट’ होतं. ते चक्क कोल्ड वॉरमुळे जन्माला आलं. ते नेमकं कसं आणि कुणी  तयार केलं आणि त्याचा इंटरनेट होण्यापर्यंतचा आणि ते घराघरापर्यंत पोहचण्याचा प्रवास कसा झाला ते वाचून मी थक्क झालो. या इंटरनेट मागचा उद्देश, त्याच्यामागे एक नाही तर अनेक जणांच्या कल्पना, त्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत, पदोपदी मिळणारं यश-अपयश, एकाच ध्यासानं एकत्र आलेले मात्र स्वभावानं अतिशय भिन्न असलेले संशोधक, असं सगळं म्हणजे इंटरनेटचा शोध! हा प्रवास लिहिताना या सगळ्या मंडळींनी हे जाळं कसं विणलं असेल याची कल्पना येते.

सेल फोनबद्दलही तसंच. आपल्या बायकोशी – ती बाहेर गेलेली असताना – बोलता यावं म्हणून टेलिफोन उपकरणाचाच वापर करून ‘तारायुक्त मोबाइल कारफोन’ची एरिक्सन निर्मिती करतो काय, कालांतरानं हातात घेऊन बोलू शकणाऱ्या मोबाइल हँडसेटचा शोध लागतो काय, सेलच्या कल्पनेवर आधारित सेल फोन तयार होतात काय, 0 जी पासून ते आता 5 जी पर्यंतचा प्रवास होतो काय, हा इतिहास खूपच रंजक आहे.

फेसबुकची निर्मिती कशी झाली हे वाचताना तर गंमत वाटली. हार्वर्ड विद्यापीठात सगळ्यांत आकर्षक मुलगी कोण आहे हे ठरवण्यासाठी झाकरबर्ग वेबसाइट तयार करतो काय, ती लोकप्रिय होते काय, ती जगभरातल्या आबालवृद्धांनाही वेड लावणारी वेबसाइट बनते काय आणि त्याचा मोठा डोलारा उभा राहतो काय, हे सगळंच भन्नाट आहे. एका कॉलेजकुमाराचा कॉलेजतरुणापासून ते एका बलाढ्य कंपनीचा मालक होईपर्यंतचा हा प्रवास खरंच कमालीचा आहे!

आपलं पुढचं जग कम्युनिकेशनमुळे संपूर्णपणे बदलणार आहे. ‘मीडियम इज द  मेसेज’ हे प्रसिद्ध वाक्य उच्चारणाऱ्या मार्शल मॅकल्युहान या कॅनेडियन विचारवंतानं इतरांप्रमाणेच ‘कम्युनिकेशनच्या साधनांमधून प्रचंड मोठी क्रांती कशी होईल’ याविषयीची केलेली अनेक भाकितं आज खरी ठरताहेत.

अनेक विचारवंतांनी उद्याच्या जगात ‘टेक्नॉलॉजिकल कॉन्व्हर्जन्स’ होईल असं भाकीत केलं होतं आणि तेही आता बऱ्याच प्रमाणात खरं ठरतंय. आपण आज मोबाइल फोनवर एकमेकांशी संवाद साधू शकतो आणि इंटरनेट वापरू शकतो; वर्ड प्रोसेसरवर काम करू शकतो; टी.व्ही. बघू शकतो; गाणी ऐकू शकतो; रस्ता शोधू शकतो – अशा अनेक गोष्टी करू शकतो. थोडक्यात, आपला मोबाइल हँडसेट संवाद साधण्याचं उपकरण असण्याबरोबरच आपला टी.व्ही., रेडिओ, कॉम्प्यूटर, घड्याळ, कॅलेंडर, डायरी, लायब्ररी, म्युझिक सिस्टीम, कॅमेरा, मार्गदर्शक असं सगळं होतोय. हळूहळू मोबाइल हा इतका प्रचंड ताकदवान होत चालेला आहे की आपल्या हातातलं हे छोटंसं यंत्र आपलं आयुष्य नियंत्रित करणार आहे. त्यावर सेन्सर्सही आता लागतील.

नुकतीच अॅपलनं आयफोनच्या एका मॉडेलची घोषणा केली आहे. तो फोन हातात घेतल्याबरोबर आपला चक्क इसीजी त्यावर दिसेल. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी तर हे एक वरदानच आहे. कारण हार्ट अटॅक यायच्या आधीच त्यांना सावध होऊन उपचार घेता येतील. म्हणजे, मोबाइल हा आपला आरोग्य रक्षकही व्हायला सज्ज झाला आहे!

हे जरी असलं आणि तंत्रज्ञानातली प्रगती प्रचंड वेगानं जरी होत गेली, तरीही माणसं मात्र एकमेकांजवळ येण्याऐवजी दूरच जाताहेत.

माणूस प्रचंड आत्मकेंद्री, स्वार्थी आणि  तितकाच ‘एकटा’ झालाय. गर्दीतही वाटणारं एकटेपण त्याला भंडावून सोडतंय. पण यासाठी ‘संवादा’मधल्या प्रगतीला जबाबदार धरता येणार नाही. त्याला सध्याची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. त्याची चर्चा करणं या पुस्तकात शक्य नाही. पण ती चंगळवाद या पुस्तकात केली आहे.

माणसाचा आतापर्यंतचा संवादाचा हा जवळजवळ इतिहास सगळाच वाचताना वाचकांसमोर तो रंजक पद्धतीनं मांडला पाहिजे, असं मला वाटायला लागलं आणि या ध्यासातूनच हे पुस्तक जन्माला आलेलं आहे.

आदिमानवापासून ते आता फेसबुकपर्यंतचा हा प्रवास मला वाचकांपर्यंत पोहोचवल्याशिवाय चैन पडणंच शक्य नव्हतं. हे पुस्तक म्हणजे एक चित्तथरारक रहस्यकथेसारखंच वाचकांना वाटेल इतक्या गमतीजमती याच्यात आहेत.

यातले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, पेटंट्सवरनं होणाऱ्या मारामाऱ्या, खूप मोठे शोध लावूनही दारिद्र्यात येणारं मरण किंवा शोध लावल्यानंतर मोठमोठ्या कंपन्या उभारून प्रचंड श्रीमंतीत गेलेलं पुढचं आयुष्य अशा अनेक गोष्टी आणि आसू-हसूचं एक मिश्रण आपल्याला या पुस्तकात गुंफलेलं आढळेल.

या पुस्तकात फक्त शास्त्रज्ञांची आणि तंत्रज्ञांची चरित्रंच नाहीयेत, तर त्यामागचं तंत्रज्ञानही सोप्या भाषेत शक्य होईल तिथे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, हे सगळं एखाद्या अथांग समुद्रासारखं आहे. त्यातले काही खास थेंब वाचकांसाठी निवडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.

हे पुस्तक लिहीत असताना माझे मित्र स्मिता आणि डॉ. नंदू कोल्हटकर, वैदेही/ ज्ञानेश लिमये, अनिता/अतुल कहाते, साधना  वझे, मधुवंती/सुहास भागवत, विद्या निकम, राधा/सुधीर महाबळ, सुजाता गुप्ते, सुरेखा/ योगेश कुलकर्णी, अमृता/अमोल देशपांडे, वृषाली/मुकुंद जोगळेकर, ॲड. माधुरी काजवे, पुष्पा/सुलभाताई, अलका/प्रदीप कुलकर्णी, अपर्णा चव्हाण, अर्चना मुळे, वैभव केवळे, डॉ. किर्ती/सतीश आगाशे, मुक्ता मनोहर, अॅड.

आनंद माहूरकर आणि त्यांचे सहकारी, राहुल टेमकर, स्नेहल वाव्हळ, सीमा/विकास धेरंगे, नीलांबरी जोशी या सर्वांनी ‘संवाद’ या पुस्तकाच्या प्रकल्पाला मला वेळोवेळी मदत केली, प्रोत्साहन दिलं तसंच सूचनाही दिल्या.

या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.

हे पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा माझ्या 18-20 वर्षांपूर्वी लिहिलेलं कच्चं लिखाण बाहेर आलं. त्या कच्च्या लिखाणावर काम करणं, त्यात नवीन मजकूराची भर टाकणं आणि त्याला आकार देणं हे काम दीपा देशमुख हिनं केलं. तसंच माझ्या ‘मनात’, ‘मुसाफिर’, ‘नॅनोदय’, ‘थैमान चंगळवादाचे’ या पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकाचं ‘संवाद’ हे शीर्षक दीपानंच सुचवलं. तिचेही आभार!

शोभानं याही पुस्तकासाठी मला नेहमीप्रमाणेच सहकार्य केलं आणि सतत प्रोत्साहन दिलं.

या पुस्तकासाठी डॉ. मानसी गोरे हिनं खूपच मदत केली. या पुस्तकातली ओळ न ओळ वाचून त्यात सुधारणा सुचवल्या. खरं तर तिचा विषय अर्थशास्त्र. पण तरीही तिनं तंत्रज्ञानाच्या इतिहासावरच्या या पुस्तकात खूपच रस घेतला हे विशेष. सीमा भानूचंही तसंच.

तिनंही उत्साहानं सगळं पुस्तक वाचून त्यावर वेळोवेळी अभिप्राय आणि सूचना कळवल्या.

या दोघींचेही आभार.

संजय सोनावणी आणि डॉ. विवेक भट  यांनी भाषेच्या विषयीचं माझं लिखाण तपासून त्यात सूचना केल्या. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

लोकसत्तेच्या लेखिका गीता सोहोनी यांनीही या पुस्तकासाठी खूप मौल्यवान मदत केली. तिचेही आभार.

मला विशेष आभार मानायचे आहेत ते प्रेरणा काळे हिचं! माझं हस्तलिखित तिनंच पहिल्यांदा कॉम्प्युटरवर टाईप केलं. त्याशिवाय हे पुस्तक शक्यच झालं नसतं.

पुस्तकासाठी आसावरी निफाडकरनंही प्रचंड कष्ट घेतले. मजकूर नुसताच टाईप करणं नव्हे, तर त्यात सुधारणा सुचवणं हे तिनं न थकता केलं. तिच्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊच शकलं नसतं. या सगळ्यामध्ये तिला पुष्कर आणि तिच्या इतरही घरच्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार!!

मनोविकास प्रकाशनाचे अरविंद आणि आशिश पाटकर यांनी तसंच त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या इतर पुस्तकांच्यावेळी जितके श्रम घेतले होते तितकेच याही  पुस्तकाच्या वेळी घेतले आहेत. त्यामुळे हे पुस्तक अतिशय देखणं आणि सुरेख झालं आहे.

मनोविकास प्रकाशनाच्या संपूर्ण टीमचे विशेषत: गणेश दीक्षित याचे मनापासून आभार. गणेशनं माझ्या अनेक पुस्तकांच्या वेळी मदत केली आहे तशीच याही पुस्तकात केली आहे. हे पुस्तक देखणं आणि उत्कृष्ट होण्यामागे त्याचाही मोठा हातभार आहे. त्याचप्रमाणे विलास भोराडे यांचेही आभार.

गिरीश सहस्रबुद्धे यांनी याही पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय सुंदर केलं आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. त्याचप्रमाणे मुद्रितशोधक अनिल जोशी यांचे विशेष आभार.

‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल याची मला खात्री आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचकांच्या हातात ठेवताना मला अतिशय आनंद होतोय.

– अच्युत गोडबोले

achyut.godbole@gmail.com

www.achyutgodbole.com