आठवणीतलं पुस्तक – ‘मुंबई दिनांक’

लहानपणापासून सारं आयुष्य ग्रंथाच्या सहवासातच गेलं, तरी एखाद्याला वाचनाचा नाद लागेलच, असं सांगता येणं कठीण आहे. तसं असतं तर प्रत्येक ग्रंथविक्रेता हा चांगला वाचक झाला असता. पण तस होतं नाही. मात्र याचा मात्र नेहमीचं खरा ठरतो. आणि वाचनाचा नाद असलेला ग्रंथविक्रेता हा उत्तम पुस्तकविक्रेता होतो! मला स्वत:ला वाचनाचा नाद नव्हे वेड आहे, अगदी लहानपणीच लागलं. त्याचं कारण ग्रंथांच्या सहवासात गेलेलं बालपण हेच होय.

प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. ग. वि. अकोलकर हे वडील म्हणून लाभल्याचे जे काही फायदे झाले, त्यात वाचनाचा लागलेला नाद. हा बहुधा सर्वात मोठा फायदा असावा. ते उत्तम साक्षेपी वाचक आणि लेखकही होते. शिवाय आईलाही चांगली पुस्तकं वाचायचा नाद होता. मग घरात पुस्तकांचं संग्रहालयचं उभं राहिलं यात नवल नव्हतं. वडिलांचा अभ्यासाचा आणि व्यासंगाचा मुख्य विषय हा शिक्षणशास्त्र होता, पण खरं तर ते मराठी आणि संस्कृत साहित्याचे आस्वादक वाचक होते. अनेक प्रकाशकांशी त्यांचा दोस्ताना होता. १९४० ते ६० दशकातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकांनी त्या काळात घरातली कपाटं ओसंडून वाहत होती. त्यात मराठी पुस्तकांबरोबरच इंग्रजी साहित्याचाही भरणा होता आणि पंडित नेहरुंपासून नरहर कुरूंदकरापर्यंत आणि शरदचंद्रांच्या मामा वरेरकरांनी अनुवादित केलेल्या कादंबर्‍यांपासून ना. सी. फडक्यांपर्यंत कोणाच्याच लेखनाला घर वर्ज्य नसायचं. पण एकदा वाचायचा नाद लागला की पुढे कधी तरी स्वत:च पुस्तकं धुंडून ती वाचायची सवय लागते. अशी सवय लागेपावेतो सत्तरचं दशक उजाडलं होतं आणि मराठीतही नवनव्या लेखकांची फौज उभी राहू पाहत होती.

कॉलेज जीवन संपत आलं होतं आणि पुढे काय करायचं, असा प्रश्न चहूबाजूंनी फेर धरुन पिंगा घालत होता. त्याच सुमारास अरुण साधूंचं ‘मुंबई दिनांक :’ हे पुस्तक हाती लागलं. तेव्हा त्याच्या शीर्षकाचा नेमका अर्थही समजला नव्हता. पण आज तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावर लक्षात येतं, ते हे की पुढचं आपलं सारं आयुष्य ‘मुंबई दिनांक:’ या दोन शब्दांनी सुरु होणार्‍या बातम्या लिहिण्यातचं गेलं, त्यामागे या पुस्तकाचीच प्रेरणा कारणीभूत होती. आज या पुस्तकाचं कथानक महाराष्ट्रातल्या घराघराला ठाऊक झालं आहे. १९७२ साली ‘मुंबई दिनांक :’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि नंतरच्या पाच वर्षातच साधूंची ‘सिंहासन’ ही आणखी एक कादंबरी आली. त्या दोहोंच्या उत्कृष्ट मिलाफातून जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ हा चित्रपट काढला आणि या दोन्ही कादंबर्‍या घराघरांत जाऊन पोहोचल्या.

या दरम्यानच्या तीन दशकांच्या प्रवासात ‘मुंबई दिनांक :’ हे पुस्तक नेमकं किती वेळा वाचलं असेल ते सांगता येणं कठीण आहे. पण आज हे मात्र ठामपणानं सांगता येतं की या पुस्तकातील मुंबईचं वर्णन आणि मुंबईकरांची चित्रित केलेली जीवनशैली यामुळे मुंबईच्या प्रेमातच पडायला झालं आणि त्यातील ‘वेस्टर्न स्टार’चा चीफ रिपोर्टर अय्यर हा तर मनातला ‘हीरो’च होऊन गेला. तेव्हा असं वाटलंही नव्हतं की मुंबईतल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ या अग्रगण्य दैनिकात ‘चीफ रिपोर्टर’ म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे !

हा अय्यर आपल्यापुढे केवळ मुंबईच उभी करतो, असं नाही तर या महानगरातील राजकारण आणि समाजकारणही तो आपल्यापुढे मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे, कामगार नेता डी कास्टा आणि अन्य अनेकांच्या माध्यमातून उभं करत जातो आणि सर्वसामान्यांना कधीही पाहायला न मिळालेली मुंबईही आपल्यापुढे साकार होत जाते.

पण साधूंचा या कादंबरीच्या लेखनामागील उद्देश हा वाचकांना केवळ ‘मुंबई दर्शन’ घडवण्याइतपत मर्यादित असणं शक्यच नव्हतं. प्रस्थापित व्यवस्थेला लागलेली कीड, एका कामगार नेत्याच्या मदतीनं ती उघड करु पाहणारा एक पत्रकार आणि दयानंद पानिटकर हा स्मगलिंगच्या विळख्यात सापडलेला एक सीधा-साधा मुंबईकर यांच्या व्यक्तिरेखांमधून साधूंनी १९७० च्या दशकातील मुंबईचा लेखा-जोखाच आपल्यापुढे साकार केला आहे.

हाच लेखाजोखा मनात गेले तीन दशकं घर करुन बसला आहे. या काळात मुंबईचं राजकारण आणि समाजकारण यास लागलेली कीड अधिकाधिक वाढत चालली आहे… आणि मुंबईसंबंधात याच तीन दशकांत अनेक पुस्तकं प्रकाशित होऊनही मनातंल ‘मुंबई दिनांक :’ चं स्थान अबाधित राहिलं आहे.

— प्रकाश अकोलकर