साता समुद्रापार
₹100.00 ₹80.00
(सात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रथम प्रकाशित पुस्तक)
जहाज जेव्हा घरापासून लांब सातासमुद्रापार असतं, तेव्हा त्याच्यावर काम करणाऱ्या खलाशांची मानसिक अवस्था कशी असते याची अनुभूती व प्रत्यय खलाशी बनल्याशिवाय कोणालाच येणार नाही. पांढरा स्वच्छ युनिफॉर्म, खांद्यावर चमकणाऱ्या सोनेरी पट्ट्या, अमेरिकन डॉलर्स, काही महिने काम आणि काही महिने सुट्ट्या, एनआरआय स्टेटस्, रॉयल लाईफ, परदेशात बघायला मिळणारी असंख्य शहरे आणि पाचही महासागरात असलेली हजारो बेटे आणि शेकडो लहान मोठे समुद्र बघायला मिळणे यासारखी अनेक कारणे मर्चंट नेव्हीतील करिअर निवडण्यासाठी पुरेशी आहेत. परंतु दुरून डोंगर साजरे असतात तसाच काहीसा प्रकार मर्चंट नेव्हीत जहाजांवर काम करणाऱ्या बहुतांश लोकांना येतो.
लेखक : प्रथम रामदास म्हात्रे
प्रकाशक : सृजनसंवाद
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
किंमत : रु. 100
सवलत किंमत : रु. 80
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
Description
सातासमुद्रापार या पुस्तकाला कवी श्री अरुण म्हात्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना.
शांत, समंजस जहाज – आख्यान…
अनंत अमुची ध्येयासक्ती
अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!
कविवर्य कुसुमाग्रजांनी दर्यावर्दी जवानाच्या गौरवार्थ लिहिलेले हे सूक्त केवळ खलाशांसाठी नाही तर जगण्याच्या संघर्षात प्रत्येक तुफानाशी दोन हात करीत टिकून राहिलेल्या सर्व लढवय्यांसाठी आहेत. मात्र ह्या ओळी वाचल्या की भयाण वादळात प्रलयंकारी लाटांशी सामना करीत आपली बोट, आपले गलबत आपल्या मनातील इच्छित बंदराला नेणारा कोलंबससारखा समुद्र शिलेदारच डोळ्यांसमोर येतो.
मला मात्र या ओळींची सतत याद आली ती प्रथम रामदास म्हात्रे या माझ्या विचक्षण भाच्याचे सातासमुद्रापार हे त्याच्या बोटीवरच्या अनुभवांचे, कधी थरारक कधी सुखकारक असे रसाळ कथन वाचताना. कैक दिवस मी पुन्हा पुन्हा त्याच्या सागरी प्रवासाच्या कधी न ऐकलेल्या, वाचलेल्या वा अनुभवलेल्या गोष्टी वाचतो आहे आणि पुन्हा पुन्हा त्या लाटांवर हेलकावणाऱ्या प्रचंड मोठ्या गलबतावर येरझारा घालतो आहे.
एखादे रसभरीत प्रवासवर्णन वाचावे असे मला वाटते आहे आणि प्रत्येक प्रकरणागणिक काहीतरी अद्भुत, काहीतरी विलक्षण वेगळे वाचायला मिळेल ह्या आशेने पान पान उलटतो आहे. प्रथमच्या लेखणीत एक सुबोध संवाद आहे, तो याला कारणीभूत आहेच, पण ह्या व्यवसायातील बारीकसारीक तपशील देत वाचकाला तिथे घेऊन जाण्याची एक विशेष हातोटी प्रथमच्या कथनात आहे ती दाद देण्यासारखी आहे. यातले एकही प्रकरण ना चुकवावेसे वाटते, ना पान पलटून पुढे निघावे असे वाटते. साऱ्या लाटा अंगावर घ्याव्यात, तसे लेखन फारसे येत नाही. आलेले नाही. मराठीत तर हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लेखकांनी ह्या समुद्राच्या पाण्याला स्पर्श केलाय. प्रथमच्या ह्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की त्यानी लेखक वगैरे म्हणून पोझ घेऊन हे लिहिले नाही. ह्या अफाट अनुभवाने तोही अवाक झालाय, भारावून गेला आहे आणि त्याच भारावल्या स्थितीत त्याने हे अनुभव भराभर डायरी लिहावी तसे लिहिलेत. लिहिताना त्याच्या मनात ना ह्याचे पुस्तक करण्याचे होते ना आपण लेखक वर्गात जाऊ अशी कल्पनाही त्याला नसेल. त्यामुळेच त्याचे हे लेखन इतके पारदर्शी, इतके सुबोध, इतके वाचनीय आणि वाचणाऱ्याला थेट बोटीवर घेऊन जाणारे झाले आहे.
कवयित्री नीरजा त्याची मावशी, मी त्याचा मामा, डॉ. म. सु. पाटील हे त्याचे मावस आजोबा. आम्ही सारे तसे मुख्यतः कवितेच्या प्रांतातले. प्रथम हा कवितेपासून तसा लांबच. त्यामुळे गद्यलेखनाचे संस्कार त्यानी घरातून घेतले असावेत असे नाही. प्रथमची आई पूर्तता – त्याची मम्मा ही वाचनवेडी. तिच्या वाचनाचा संस्कार घेऊन प्रथम लिहिता झाला असावा. त्याने कविता जरी लिहिल्या नसल्या तरी त्याच्या या गद्यलेखनात अनेक काव्यमय प्रसंग आहेत आणि एकूण लेखनात जे मार्दव, जो गोडवा आहे तो कवितेतील लयप्रवण नादाचा परिचय देणारा आहे. त्याचे लेखन असे की वाचत जावे, वाचत राहावे असे आहे. एक तर त्याने निवडलेला लेखनविषय आपल्याला काहीसा अपरिचित आणि साहसी सिंदबादच्या सफरीसारखा चक्रावून सोडणार आहे. अफाट समुद्राच्या अजस्र लाटांवर माणूस जेव्हा आपले घरदार, आईवडील पोरेबाळे, आणि मित्रपरिवार सोडून अधांतरी हेलकावत असतो तेव्हा मला वाटते तो अंतर्मुख होतो आणि गंभीरपणे आपल्या जीवनक्रमाचा विचार करू लागतो. खरे तर गंभीर व्हावे, अंतर्मुख व्हावे असे प्रथमचे वय नाही. पण त्यांच्या विचारातील समंजस लेखनाचे वाचनीय तरंग झेलत राहावे असे वाटत राहते.
फार वर्षांपूर्वी विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ ही कादंबरी मग आमचे मित्र कादंबरीकार अनंत सामंत यांचे ‘एम टी आयवा मारू’ ही कादंबरी आणि अलीकडे वाचायला मिळालेले ‘समुद्रायन’ हे कॅप्टन वैभव दळवी यांचे समुद्रावरील त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांचे कथन हाच समुद्रावरील अनुभवांचा आपला संबंध. एरवी हे जग संपूर्ण मराठी विश्वाला अपरिचित. प्रथमच्या लेखनाने पुन्हा एकदा मराठी लेखनविश्वाचे समुद्रद्वार किलकिले केले आहे आणि तेही एखाद्या प्रथितयश लेखकाच्या थाटात !
प्रथम हा आमच्या कुटुंबातील बहुतेक पहिला माणूस जो मर्चंट नेव्हीच्या माध्यमातून सातासमुद्रापार आणि तेही बोटीवरून गेलेला. आम्हा अलिबागकरांच्या समुद्राशी खूप संबंध आहे. रेवस ते रेवदंडा हा समुद्रकिनारा थेट अरबी समुद्राला सामोरा गेलेला. त्या किनाऱ्यावरचे मांडवा हे गाव हे प्रथमचे आजोळ. प्रत्यक्ष किनाऱ्यावर जाण्याची गरज व वेळ आली नाही तरी समुद्रावरचे खारे वारे खातच आम्हा अलिबागकरांचे आयुष्य संपन्न होत असते. लाटेकडे तासन्तास डोळे लावून बसणाऱ्या काहीशा कविमनाच्या व्यक्तींमध्ये प्रथम असावा आणि त्यातूनच त्याने जहाजावरचे हे करिअर स्वीकारले असावे. चिकाटी, संयम आणि अपार मेहनत हे आम्हा अलिबागकरांचे वैशिष्ट्य आहे. प्रथम इतक्या लहान वयात जहाजावरच्या नंबर एक इंजिनियर होतो हा त्याचाच पुरावा. खूपदा अशी कामात व्यग्र आणि तत्पर असलेली माणसे लेखनाकडे वळत नाही. आपले काम बरे नि आपण बरे अशी एक वृत्ती त्या लोकांत असते. प्रथम मात्र बोटीवरचे ते सारे अनुभव घेता घेता त्याच्या नीट नोंदी मनात करीत होता आणि निगुतीने त्या लिहूनही काढत होता. सर्व जग हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले जरी असले, तरी साहित्यात हे ‘चहूकडे पाणी’ आणि विचारपूर्वकता ही चकित करणारी आहे. समुद्र आपल्याला कसे विशाल बनवतो, खोल बनवतो आणि तरंगांसारखे तरल करतो याचा वस्तुपाठ म्हणजे प्रथमचे सातासमुद्रापार हे आत्मकथन. हे काही आत्मचरित्र नाही किंवा हे प्रवासवर्णनही नाही. हे आहे प्रथमचे समुद्र आख्यान किंवा जहाज आख्यान. साहित्याला अपरिचित असलेल्या या विषयाची अशी भरभरून ओळख करून दिल्याबद्दल प्रथमचे अभिनंदन करावेसे वाटते. बोटीवरील माणसे जशा प्रेमाने गळाभेटी घेतात, तशी गळाभेट घ्यावीशी वाटते.
खरंतर ही काही कादंबरी नाही. त्यामुळे कादंबरीत जशी पात्रे उभी करतात, तशी पात्रे उभी करण्याचे लेखकाला बंधन नाही. आणि इथे तर सारी माणसे खरी, अस्तित्वात असलेली. पण प्रथम त्यांचे तपशील देताना इतक्या सूक्ष्मपणे त्यांची माहिती देतो की, त्याचे कथन विश्वासार्ह वाटेल अशी पात्रे उभी करतात उभी राहतात आणि ही पात्रे उभी करण्यासाठी लागणारी पात्रांविषयीची आत्मीयता, जवळीक आणि त्यांचे – लेखकांचे अदृश्य नाते ही या पात्रांशी प्रथमला जोडणारी भावना आहे हे आपल्याला जाणवते. या पुस्तकाच्या सर्व प्रकरणात ही आत्मीयता, ही सहानुभूती आणि मित्रत्वाची भावना दिसते. अंत:करणातील ओलाव्याने जोडले गेलेले जहाजावरचे एकेक पात्र आपल्याला जवळचे वाटते याचे कारण प्रथमने त्यांना आपलेसे करून आपल्यासमोर उभे केलेले आहे. वेगळ्या धर्मीयांच्या माणसांनाही अत्यंत नितळपणे आपले वा जवळचे मानणे हे प्रथमच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे आणि ते संपूर्ण लेखनात असे प्रतिबिंबित होते की बोटीवरचा सर्व परिवार प्रथमबरोबरच आपल्यासोबत प्रवास करीत आहे असेच आपल्याला वाटते. या आत्मकथनाचा हा गाभा आहे. सारे आपले, आपल्यासारखेच लोक आहेत आणि त्यांची कहाणी मी सांगतो आहे ही अत्यंत नम्र भावना या लेखनात आहे. हे कथन वाचनीय होण्यामागचे हे एक कारण आहे. प्रथमच्या लेखनात जो एक चित्रदर्शीपणा आहे, त्याची मजा त्याचे हे लेखन सलग वाचल्यावर लक्षात येते. जहाजावरची फिल्म पहावी तसे हे लेखन आहे. प्रथम आपणास इंजिन रुममध्ये, बोट केबिनमध्ये, डेकवर, त्याच्या स्वत:च्या रूममध्ये, इतकेच काय पण रेस्क्यू बोटीतपण घेऊन जातो. कथनाची ही विलक्षण प्रभावी पद्धत आहे. पूर्वी श्री. दा. पानवलकरांच्या कथा वाचताना, डॉकमधले चित्र असे लेखनातून पाहायला मिळायचे. हीच कथनशैली श्री. ना. पेंडसे यांच्या लेखनात आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या लेखनात आहे. योगायोगाने तेही दोघे कोकणातले लेखक आहेत, त्यामुळे ‘गोष्टी’ सांगण्याचा हा गुण खास कोकणी किंवा समुद्रालगत राहणाऱ्या लोकांचा आहे की काय असे मनात येते.
प्रथमच हे लेखन वाचताना पुन्हा पुन्हा समुद्राचे संदर्भ आल्याने मला सारखी अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ‘ Old Man and the Sea’ ही आणि रिचर्ड बाखची ‘जोनाथन लिव्हिंगस्टोन सिगल’ ही अशा दोन कादंबऱ्या सारख्या आठवत राहिल्या. समुद्राशी नाते जुळणे म्हणजे काय ते या दोन कादंबऱ्यांनी जगाला दाखवले आहे. प्रथम, बोटीवरच्या या नोकरीच्या निमित्ताने, समुद्राशी जोडला गेलाय आणि त्याच्या या कथनात जगभरातले समुद्र बॅकग्राउंडसारखे सतत हेलकावत, वर-खाली होत येत राहतात. हे लेखन वाचताना मनात सतत येत राहिले की प्रथम हा उत्कृष्ट कथालेखक होऊ शकेल, कारण कथेसाठी लागणारा माणूस, भवताल आणि निसर्ग यांच्याविषयी आत्मीयता त्याच्यापाशी ठासून भरलेली आहे.
सोबत काम करणाऱ्या माणसांविषयीही प्रथमने जे लिहिले आहे ते त्यांची व्यक्तिमत्त्वे उभी करणारे आहेच, पण ज्या एका अनुबंधाने प्रथम त्या माणसांशी जोडला गेला ते अनुबंध आपल्यालाही त्यांच्याशी जोडून घेतात. कोणतेही पुस्तक वाचताना, त्यातील माणसे, त्यातील स्थळे आणि त्यातील वातावरण ह्याची वाचकांशी जवळीक होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आधी लेखक त्या गोष्टींमध्ये गुंतणे आवश्यक असते. प्रथमकडे ही सायुज्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेक लेखकांकडे या गुणाचा अभाव असतो. साऱ्या समष्टीकडे ते एका तटस्थतेने पाहतात आणि मग त्यांचे लेखन नीरस होते. प्रथमचे लेखन जसे तशा चित्रदर्शी शैलीमुळे वाचत रहावेसे वाटते; तसे त्यातील माणसांच्या वर्णनामुळे जवळचे वाटते. बोटीवर प्रथमसोबत काम करणारे सर्व सरदारजी, सर्व इंडोनेशियन, मलेशियन आणि साऊथ इंडियन, बत्तीबाबा हे सारे आपल्या परिचयाचे, काहीसे नात्यातले होतात. कारण प्रथम त्यांची ओळख करून देताना त्याची जवळची माणसे अशीच ओळख करून देतो.
एकूण रमून जावे असे हे ललित लेखन झालेले आहे. प्रथमचे हे पहिले पुस्तक आहे ह्यावर आपला विश्वास बसत नाही. महत्त्वाचे म्हणजे या लेखनाने, प्रथमने मर्चंट नेव्हीतील नोकरीविषयीचे सर्व तपशील एकेका प्रकरणात वाचकांना अवगत केले आहेत. मराठी तरुण विश्वापासून काहीसे दूर राहिलेले हे क्षेत्र प्रथमच्या या पुस्तकामुळे मराठी वाचकांच्या चांगले परिचित होणार आहे. मराठीत यापूर्वी असे लेखन झालेले नाही. एका अर्थाने ह्या पुस्तकाची ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. अर्थात प्रथमच्या लेखनाचा हा हेतू नाही. अत्यंत प्रांजळपणे त्याने आपल्या आयुष्यात आलेले हे जहाजावरचे नोकरीपर्व शब्दबद्ध केलेले आहे. पण त्याच्याही नकळत या लेखनाचा आवाका इतका वाढत गेला आहे की, त्याने नकळत किती गोष्टींना स्पर्श केला आहे हे त्याच्याही ध्यानात आले नसावे.
समुद्रवर्णनाच्या वेळी, रात्रीच्या आभाळाचे वर्णन करतानाच्या वेळी आणि घरची आठवण आल्यावर प्रथमच्या लेखणीला जे भरते येते, ते पाहण्यासारखे आहे. आतल्या कोयीतून उमलून काही यावे तसा तो उत्कट, अधीर आणि तरतरीत होतो. ही एका समर्थ सृजनशील लेखकाची लक्षणे आहेत. ‘समुद्रां’वरचे लेखन संपल्यावर प्रथम निश्चितपणे ‘जमिनी’वरच्या गोष्टी लिहायला घेईल यात मला शंका वाटत नाही. आणि त्यातही हाच जिव्हाळा, हीच आत्मीयता आणि हाच जिवंतपणा अनुभवायला मिळेल याची मला खात्री वाटते.
— अरुण म्हात्रे
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
लेखक : प्रथम रामदास म्हात्रे
प्रकाशक : सृजनसंवाद
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
पुरस्कार
1) ठाणे ग्रंथसंग्रहालयाचा प्रतिष्ठित असा वा. अ. रेगे पुरस्कार, ठाणे.
2) सारांश राज्यस्तरीय पुरस्कार, मिरज.
3) दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा मानाचा असा राज्यस्तरीय पुरस्कार.
४) पद्मगंधा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार, नागपूर.
५) राष्ट्रीय संत नामदेव पुरस्कार,हिंगोली.
प्राप्त झाले आहेत.
६) क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय, देगांव. राज्यस्तरीय ललित साहित्य वाङ्ममय पुरस्कार – २०२२-२३
७) कोकण मराठी साहित्य परिषदेचा (कोमसाप) ललित गद्य या वाङमय प्रकारातील सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे द्वितीय पुरस्कार.
