Sale!

मी अश्वत्थामा चिरंजीव

450.00 300.00

श्रीपरशुराम, श्रीहनुमान, बळीराजा, बिभीषण, महर्षी व्यास, कृपाचार्य व युगात्मा अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव मानले जातात. परंतु अश्वत्थामाव्यतिरिक्त उरलेल्या सहा महापुरुषांचे चिरंजीवित्व हे त्यांना लाभलेले वरदान आहे. याउलट अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व हा त्याला मिळालेला दुर्धर शाप आहे, असे मानले जाते. अश्वत्थाम्याने केलेल्या कुटिल आचरणाचे फलित म्हणून, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या कपाळाच्या उर्ध्वभागी असलेला जन्मजात नीलमणी उपटून काढल्यावर, ती भळभळती जखम घेऊन दारोदार तेल मागत फिरणारा भ्रष्ट योगी असा अश्वत्थाम्याचा लौकिक आहे!

लेखक : अशोक समेळ
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

किंमत : रु. 450
सवलत किंमत : रु. 300

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

SKU: mazya-sangeet-jeevanachi-vaatchal-by-malati-pande-barve-1 Category: Tags: ,

Description


प्रख्यात नाटककार व ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक श्री. अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा… चिरंजीव’ ही महाकादंबरी लिहिली आहे. श्रीमहर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली ही बहुतेक मराठीतील पहिली कादंबरी असावी. महाभारतातील लोकप्रिय विभूतींवर बेतलेल्या अनेक कलाकृती आजमितीपर्यंत निर्माण झाल्या आहेत आणि भारतीय जनमानसाच्या कौतुकाला त्या पात्र ठरल्या आहेत. परंतू अश्वत्थाम्यासारख्या काहीशा अनुल्लेखनीय व दुर्लक्षित खलात्म्यावर मराठीतून करुणामय व वात्सल्यमय चित्रण करण्याचे धाडस अशोक समेळ यांनी दाखवले आहे.

श्रीपरशुराम, श्रीहनुमान, बळीराजा, बिभीषण, महर्षी व्यास, कृपाचार्य व युगात्मा अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव मानले जातात. परंतु अश्वत्थामाव्यतिरिक्त उरलेल्या सहा महापुरुषांचे चिरंजीवित्व हे त्यांना लाभलेले वरदान आहे. याउलट अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व हा त्याला मिळालेला दुर्धर शाप आहे, असे मानले जाते. अश्वत्थाम्याने केलेल्या कुटिल आचरणाचे फलित म्हणून, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या कपाळाच्या उर्ध्वभागी असलेला जन्मजात नीलमणी उपटून काढल्यावर, ती भळभळती जखम घेऊन दारोदार तेल मागत फिरणारा भ्रष्ट योगी असा अश्वत्थाम्याचा लौकिक आहे! श्रीपरशुराम, श्रीहनुमान, बळीराजा, बिभीषण, महर्षी व्यास, कृपाचार्य व युगात्मा अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव मानले जातात. परंतु अश्वत्थामाव्यतिरिक्त उरलेल्या सहा महापुरुषांचे चिरंजीवित्व हे त्यांना लाभलेले वरदान आहे. याउलट अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व हा त्याला मिळालेला दुर्धर शाप आहे, असे मानले जाते. अश्वत्थाम्याने केलेल्या कुटिल आचरणाचे फलित म्हणून, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या कपाळाच्या उर्ध्वभागी असलेला जन्मजात नीलमणी उपटून काढल्यावर, ती भळभळती जखम घेऊन दारोदार तेल मागत फिरणारा भ्रष्ट योगी असा अश्वत्थाम्याचा लौकिक आहे!

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.


लेखक : अशोक समेळ

इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

लेखक संपर्क

पुस्तक वाचा

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कादंबरीच्या गाभाऱ्यात

तिसऱ्या प्रहराला नुकतीच सुरुवात झाली होती. भयाण काळोखाचं साम्राज्य सर्वत्र पसरलं होतं. तसंच ते काळोखाचं साम्राज्य गुजरात-महाराष्ट्र सीमेवर उभ्या असलेल्या सातपुडा या सात डोंगरांच्या पर्वतराजीवर हळूहळू पसरत चाललं होतं. त्या काळोखामुळे ती सातपुड्याची महाअरण्यांनी आणि वन्य श्वापदांनी व्यापलेली पर्वतराजी अतिशय भयावह दिसत होती. एवढ्यात त्या काळोखाला छेद देत एखाद्या योध्यासारखा आभाळातला चंद्र हळूहळू पश्चिम दिशेकडे चाल करून येऊ लागला. त्या चंद्राने घाबरून-गुदमरून अंग चोरून बसलेल्या त्या सर्व पवर्तराजीला मायेची थंडगार उब देत आपल्या सामर्थ्याच्या शीतल प्रकाशानं धीर दिला आणि सांगितलं, ‘अंधाराला घाबरू नका; मी आहे.’

‘मी कोण आहे? कुणी तरी मला सांगेल का? कोण आहे मी?’

सातपुडा पर्वताच्या प्रथम असणाऱ्या अस्तंबा पर्वतावरचा मोठा टोकदार सुळा असलेल्या गुंफेच्या वरच्या दगडी घळीच्या गवाक्षातून तो आर्त, गुदमरलेला पण भारदस्त आवाज बाहेर येत होता. गेली हजारो वर्षं हा आबाज येतच होता. फक्त नियती सोडून तो आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता. तो पुन्हा पुन्हा गर्जत होता. कदाचित त्याचा आवाज आज नियतीपर्यंत पोहोचला असावा. नियतीला आज त्याची दया आली. तिनं आवाजाच्या दिशेनं आत डोकावून पाहिलं आणि ती चंद्राच्या कानात कुजबुजली. चंद्राचे डोळे हळुवारपणे आभाळातून घळीकडे वळले. सुकोमल प्रकाशाची एक तिरीप आत घुसली. त्या प्रकाशात चंद्राला स्पष्ट दिसलं. त्या दगडी घळीत, दगडाच्या एका कातळावर एक जीर्णपुरुष पहुडला होता. तो जीर्णच होता. कारण गेली हजारो वर्षं तो तेथेच होता. लांबलचक, उंच, शिडशिडीत शरीरयष्टी, अंगावर काळीकभिन्न अशी कफनी होती. डोक्यावरचे लांबसडक काळेभोर कुरळे केस सर्वत्र विखुरले होते. डोक्यावरून हनुवटीपर्यंत बांधलेली त्याची गर्भरेशमी पिवळ्या रंगाची पट्टी उठून दिसत होती. ती पट्टी किती जुनी, जीर्ण आहे हे निश्चितपणे ती चंद्रदेवाला सांगत होती. निदान पाच हजार वर्षं तरी जुनी असावी. कदाचित जास्तच. आणि कुणा तरी बलाढ्य पराक्रमी महापुरुषाच्या उत्तरियाची ती असावी. कधी तरी त्या जीर्णपुरुषाचे डोळे कमलनयन तेजस्वी असतील. पण या क्षणाला ते निस्तेज दिसत होते. कधी तरी त्याच्या शरीराचा रंग गोरा असेल. पण अखंड वणवण करून या क्षणाला तो करपट तांबूस रापलेला दिसत होता. त्याचे गुडघ्याच्या खाली आलेले लांबसडक आजानुबाहू निर्जीवपणे, हताशपणे पसरले होते. धनुष्य, तलवार, भाला इत्यादी शस्त्रे कधी तरी वापरल्याने हाताला पडलेले घट्टे स्पष्ट दिसत होते. संपूर्ण चेहऱ्यावर डोळ्यांत होती ती फक्त अनोळखी संभ्रमी अवस्था आणि फक्त एकच प्रश्न, ‘मी कोण आहे? ‘

त्याच्या प्रश्नाचे पडसाद संपूर्ण डोंगरावर घुमून चंद्रापर्यंत पोचले. चंद्राला त्याची प्रचंड करुणा आली. आणि नियतीच्या आज्ञेने चंद्राने आपल्या माथ्यावरच्या एका देवदूत ढगाला आज्ञा केली.

त्या देवदूत ढगाला परमेश्वरांपैकी आणखीही कुणी तरी आज्ञा केली होती. ती साक्षात महादेव श्री शंकराची होती. ढग विलक्षण प्रसन्नतेने खाली उतरला. त्या ढगांचा पांढराशुभ्र रंग साक्षात पर्वतराज हिमालयाप्रमाणे होता. जसाजसा ढग खाली येऊ लागला तशी वातावरणात एक नीरव शांतता निर्माण झाली… आणि त्या क्षणाला तेथले सगळे वातावरण निर्जीव झाले. तो ढग त्या जीर्णपुरुषाच्या घळीत शिरला. संपूर्ण घळी त्या ढगाच्या दिव्य प्रकाशाने न्हाऊन निघाली. ढगाने त्या जीर्णपुरुषाकडे पाहिले आणि हसला व म्हणाला,

‘तू कोण आहेस, या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना जीर्णपुरुषा? ‘
जीर्णपुरुषाचे ओठ विलक्षण आर्ततेने हलले. ढग पुढे म्हणाला,
‘त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुला माझ्याबरोबर यावं लागेल! येतोस?’
जीर्णपुरुषाने नुसतीच मान हलवली. आणि आपली अवाढव्य आकृती पेलत उठून उभा राहिला. ढग अधिक मायेने त्याला म्हणाला,

‘हे जीर्णपुरुषा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत मी तुझी सोबत करीन. एक गोष्ट लक्षात ठेव.
इतक्या वर्षांत तुला माणसांचा सहवास लाभला नव्हता. तुझं उत्तर मिळेपर्यंत तुला यापुढे माणसांबरोबर रहावं लागेल. राहशील ना?

‘जीर्णपुरुषाचे ओठ पुटपुटले, ‘मी कोण आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी आता मी काहीही करीन. तुझी आज्ञा मला मान्य आहे.’

तो दिव्य ढग समाधानाने हसला आणि घळीबाहेर पडला. त्याच्या मागे तो जीर्णपुरुष चालू लागला. मार्गदर्शक गुरूसारखा तो ढग हळूहळू पुढे सरकू लागला. त्या ढगाला समोर ठेवून जीर्णपुरुष चालत होता. किती तरी दिवस, किती तरी रात्री… कुठल्याही स्थळकाळाचं भान जीर्णपुरुषाला नव्हतं.

एके ठिकाणी ढग थांबला. आभाळातून खाली आला आणि जीर्णपुरुषाच्या कानात कुजबुजला,

‘आता पुढची यात्रा तुला एकट्याला करायची आहे. इथे असणाऱ्या साधू, बैरागी आणि यात्रेकरूंमध्ये मिसळून जा. जेव्हा तुझी इथली यात्रा माझ्या दृष्टीने संपेल तेव्हा मी तुला परतीचा मार्ग दाखवायला पुन्हा येईन. तुझं कल्याण असो जीर्णपुरुषा. ‘

असा आशीर्वाद देऊन तो दिव्य ढग अवकाशात मिसळून गेला. ढगाची आज्ञा शिरसावंद्य मानून तो जीर्णपुरुष साधुसंत, बैरागी, यात्रेकरूंमध्ये मिसळून गेला.

पहाटेचा प्रहर संपत आला होता. सर्वत्र प्रचंड गर्दी दिसत होती. छोटे छोटे धाबे चहा, चहा ओरडत होते. लांबून येणारे बसचे वाहक मोठ्याने ओरडले, ‘

उतरा, बस खाली करा! हरिद्वार आलं, हरिद्वार !’ जीर्णपुरुषाचे ओठ पुटपुटले, ‘हरिद्वार. ‘

तो भगव्या कफनीतल्या साधूंबरोबर चालत होता. इतर साधूंच्या भगव्या कफनीमध्ये त्याची काळी कफनी उठून दिसत होती; तशीच त्याची उंचीही. त्याचा सुंदर चेहरा एखाद्या विचारवंतासारखा दिसत होता; तशीच त्याची धीरगंभीर चर्या सर्व यात्रेकरूंचं लक्ष वेधून घेऊन त्याच्याबद्दल आदर निर्माण करीत होती. तो कुणाशीही बोलत नव्हता. पण दुसरे काय बोलतात, कोणती भाषा बोलतात, हे तो श्रवण करण्याचा प्रयत्न करीत होता. त्या सगळ्या यात्रेकरूंचा एक वाटाड्या होता. हा वाटाड्या त्या भागातच राहिल्यामुळे अनुभवी तर होताच, पण पंडितही होता. त्याचा आवाज मधुर होता आणि त्या आवाजात समोरच्या व्यक्तीला आपलंसं करण्याची ताकद होती. सगळ्या यात्रेकरूंना हाताने थांबवण्याची खूण करीत वाटाड्या म्हणाला,

‘थांबा, माझ्या यात्रेकरू बंधू, भगिनींनो, मातांनो, पित्यांनो, पुत्रांनो!’ स्वत:च्याच विनोदावर हसत म्हणाला, ‘हे हरिद्वार आहे, इथून हिमालयाची खरी यात्रा सुरू होते. हरिद्वार हे परमेश्वराचं द्वार आहे. हे द्वार इथून हिमालयाकडे प्रवेश करायला उघडतं, म्हणून याला हरिद्वार म्हणतात. आता माझ्या मागे या. ‘

यात्रेकरू त्याच्या मागे चालू लागले. जीर्णपुरुष क्षणभर थांबला. हरिद्वार आणि हिमालय हे दोन शब्द त्याच्या अंतर्मनातून मेंदूपर्यंत पोचले. हळूहळू एक गोड मधमाशी त्याच्या मेंदूचा प्रेमाने चावा घेऊ लागली. तो त्या यात्रेकरूंबरोबर आपली ऐटदार पावलं टाकीत चालू लागला. एकदा हळूच त्याने आभाळाकडे पाहिलं, त्याचा वाटाड्या ढग कुठेच दिसला नाही!

हिमालयाच्या स्पर्शाने संपूर्ण वातावरण आणि प्रत्येक माणूस भारून गेला होता. वाटाड्या पंडिताची रसवंती पुन्हा सुरू झाली.

‘महातपस्वी कपिल यांनी सूर्यवंशी राजा सगर यांच्या साठ हजार पुत्रांना इथेच जाळून भस्म केलं.

कारण त्यांनी कपिलांच्या तपश्चर्येत बाधा आणण्याचा प्रयत्न केला. त्या सगरपुत्राने पश्चात्तापाने कपिलमुनींना शरण जाऊन क्षमा मागितली. तसा त्यांनी त्याला एक उ:शाप दिला, ‘जर गंगा पृथ्वीवर आली किंवा तुमच्या पुढच्या कुणी वारसांनी ती पृथ्वीवर आणली तर तुम्हाला सगळ्या सगरपुत्रांना मी जिवंत करेन.’ पुढे त्याच सगराच्या नातवाने भगिरथाने गंगेची प्रार्थना केली. प्रचंड तपश्चर्या करून गंगेला प्रसन्न केलं. गंगा पृथ्वीवर यायला तयार झाली. पण तिच्या जलाचा प्रचंड भार पृथ्वीला सहन करणं अशक्य होतं. मग भगवान शंकराने भगिरथावर कृपा करून आणि मानवाच्या कल्याणासाठी गंगेच्या जलाचा भार जटेवर घेतला आणि तो सात प्रवाहांत पृथ्वीवर सोडला. ते सात प्रवाह म्हणजे एक भागीरथी, दोन जान्हवी, तीन भिलंगना, चार मंदाकिनी, पाच ऋषीगंगा, सहा सरस्वती आणि सातवी अलकनंदा. ही सात रूपं गंगोत्रीची आहेत. चला आता आपण गंगादर्शनास जाऊ. यात्रेकरू वाटाड्याच्या मागे वळले.

जीर्णपुरुषाच्या मेंदूला मधमाशी भिडली. त्याचं विचारचक्र सुरू झालं. या सगळ्या गोष्टी त्याने पूर्वी कधी तरी ऐकल्या होत्या. इतकंच नव्हे तर अनुभवल्यादेखील होत्या. पण कधी? तो प्रत्येक वर्षी व्यास पौर्णिमेला मुनीवर्य व्यासांना भेटायला हिमालयात यायचा, पण ते रात्रीच्या वेळी. त्यामुळे त्याला हिमालयाचं हे भव्यदिव्य रूप कधीच पाहता आलं नाही. त्याची मर्यादा होती ती फक्त व्यासगुंफेपर्यंत. व्यासांच्या आश्रमावरची पाटी त्याला चांगली आठवते. वर लिहिलं आहे, ‘व्यासगुंफा’. ती आणि एक श्लोक. तो श्लोक व्यास सतत बोलत असतात. तो श्लोक आठवायचा तो प्रयत्न करू लागला, पण काही केल्या आठवेना. पुन्हा त्याने आभाळाकडे पाहिलं. सूर्य हसत हसत पूर्वे कडून त्याच्या स्वागतासाठी उगवत होता आणि सर्व यात्रेकरूंना आपल्या प्रकाशाने त्या थंडगार वातावरणामध्ये मायेची, उन्हाची ऊब देत होता. नेहमीप्रमाणे जीर्णपुरुषाचे हात त्या सूर्यनारायणाला आपोआप जोडले गेले.

यात्रेकरू वाटाड्याच्या मागे चालले होते. या यात्रेकरूंमध्ये पुण्याहून आलेलं सत्तरीचं आपटे दांपत्य होतं. श्री. वामन आपटे आणि सौ. विभावरी आपटे. एकमेकांना आधार देत मोठ्या तडफेने ते म्हातारे चालत होते. पण वयोमानानुसार मनातली तडफ शरीराला साथ देत नव्हती. त्यामुळे दोघं सगळ्यांच्या मागे राहिले होते. हिमालयाचा तो परिसर पाहताना ‘यापेक्षा स्वर्ग वेगळा असूच शकत नाही,’ हा भाव सतत त्यांच्या चेहऱ्यावर होता. आणखी त्यांचं लक्ष खिळून राहिलं होतं, ते काळी कफनी घातलेल्या त्या महाधिप्पाड उंच माणसाकडे. तो अजानुबाहू एखाद्या गजराजासारखा चालला होता. त्याच्या डोक्यावर बांधलेली गर्भरेशमी कापडाची जीर्ण पट्टी त्याच्या कपाळातून वाहणाऱ्या जखमेची ग्वाही देत होती. आपटे आपल्या पत्नीच्या कानात काही तरी कुजबुजले. त्यांची पत्नी विभावरी आश्चर्याने त्या जीर्णपुरुषाकडे पहात उच्चारली,

‘खरंच? हे आपलं भाग्य आहे!’

आणि ते दोघं अधिक कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागले. एवढंच नव्हे तर संपूर्ण यात्रेत त्या आपटे दांपत्याने त्या जीर्णपुरुषाचा ताबा घेतला. त्याची न्याहरी, त्याचं जेवण… जेवढं काही करता येईल तेवढं ते त्या जीर्णपुरुषासाठी करू लागले.

दुपारी जेवणासाठी यात्रा थांबली. जीर्णपुरुषाने आपली पावलं स्नानासाठी नदीकडे वळवली.
स्वच्छ स्नान केलं. डोक्यावरची पट्टी धुऊन, पिळून नीट बांधली. ते बर्फासारखं गार पाणी तो पुन्हा पुन्हा आपल्या तोंडावर मारून घेत होता. नंतर शांतपणे तो त्या काठावर बसला. एवढ्यात आपटे त्याच्या समोर जेवणाची पत्रावळ घेऊन उभे. जीर्णपुरुषाने अनोळखी नजरेने त्यांच्याकडे पहात ते ताट घेतलं. जेवायला सुरुवात केली.

थोड्या वेळाने पुन्हा यात्रा सुरू झाली. यात्रेकरू गंगेच्या दिशेने चालू लागले.

बघता बघता संध्याकाळ झाली, आणि हरिद्वारमध्येच गंगामातेचं प्रथम दर्शन झालं. सगळे भान हरपून पहात होते. वेगाने वाहणारा गंगेचा प्रवाह प्रचंड चैतन्यमय वाटत होता. वाटाड्याची रसवंती पुन्हा विलक्षण उत्साहाने सुरू झाली.

‘थांबा, थांबा! याला हरीची पायरी म्हणतात. इथे बरोबर सात वाजता गंगेच्या आरतीला सुरुवात होईल,’ म्हणत स्वत:च्या घड्याळ्यात पहात म्हणाला, ‘आता फक्त दहा मिनिटं आहेत. तेव्हा त्वरा करा.

‘ यात्रेकरू हात, पाय, तोंड धुण्यासाठी धावू लागले.

जीर्णपुरुषाच्या दृष्टीने तो अनुभव अतिशय वेगळा होता. प्रथम हरिद्वार, नंतर गंगामाता, हरीची पायरी, गंगामातेची आरती… बघायला उभा असलेला प्रचंड भाविक जनसमुदाय, गंगेचं पूजन.
नदीच्या पात्रातून दूरवर चमकत जाणारे दिवे जीर्णपुरुषाच्या अंगावर रोमांच उभे करत होते. एक वेगळीच अनुभूती देत होते. एरवी वेगळ्या, एकलकोंड्या, एकाकी मनस्थितीत राहणारा तो आता हळूहळू उत्साहित होत होता, प्रसन्न झाला होता. आजुबाजूची गर्दी, तिचा आवाज यांचा त्याला अजिबात त्रास होत नव्हता. त्या पांढऱ्याशुभ्र ढगाने त्याला इथे एकाच उद्देशाने आणलं होतं – ‘मी कोण?’ या त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. आणि ते उत्तर त्याला इथे मिळणार होतं. एवढ्यात गंगेच्या आरतीचे टाळ आणि ढोल त्याच्या कानांत घुमू लागले आणि त्याने तिथे नजर वळवली.

गंगेच्या आरती सोहळ्याला सुरुवात झाली होती. यात्रेकरू दाटीवाटीने उभे राहून मोठमोठ्याने आर्त स्वरात आरती म्हणत गंगेला ओवाळत होते. आरतीच्या उच्चाराने होणारा घोष मनात वेगळीच भावना निर्माण करत होता. आरतीचे स्वर आणि देवळात होणारा घंटानाद जीर्णपुरुषाच्या डोक्यात घणाचे घाव घालून सांगत होता की,

‘तू पूर्वी इथे आला आहेस. या आरत्यांचे शब्द तुझ्या आज लक्षात नसले तरीही त्या शब्दांचा एके काळी महापंडित होतास तू.’

क्षणभर त्याचे ओठ हलले. त्याचा आवाज जरी फुटला नाही तरी तो प्रश्न त्याने इतक्या वेळा स्वत:लाच विचारला होता —

‘कधी? कुठे? पुराणात? महाकाव्यात? कुणी कुणाला शिकवली?’

तो संभ्रमात उभा होता. आरती संपली, पण आरतीचे शब्द मात्र त्याच्या डोक्यात पक्के बसले.
रात्रीच्या वेळी नादमय आवाजात वाहणारी गंगा त्याला कुठे तरी आश्वासक वाटत होती. त्या यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीत त्याचं मन अंतर्मुख झालं. त्या दृश्याकडे तो विलक्षण भारावून पाहू लागला. एवढ्यात विभावरीताई त्याच्या जवळ आल्या. त्याच्या हातात आरतीचं तबक दिलं. त्यानं ते त्यांच्याकडे पहात प्रथमच ओळख पटून हातात घेतलं आणि आई गंगेची आरती केली.
आणि आरतीचं तबक विभावरी ताईंच्या हातात दिलं. चेहऱ्यावर प्रथमच कृतज्ञ भाव येणार, एवढ्यात वामनरावांनी दिवा लावलेला द्रोण त्याच्या हातात दिला. त्याने तो पाण्याच्या प्रवाहात सोडला आणि गंगेला हात जोडून तो गंगेच्या पाण्यात उतरला. स्वत:ला झोकून दिलं. आपटे दांपत्य काठावर उभं राहून विस्फारित नजरेने त्याला पहात राहिलं. गंगामाता त्याच्या कानात हळुवारपणे शिरली आणि म्हणाली, ‘पुत्रा, किती वर्षांनी माझ्या कुशीत आलास याची कल्पना आहे? ‘ गंगा स्तब्ध शांतपणे त्याच्या महाप्रवासाचा शिणवटा मायेचा पाझर घालून दूर करू लागली. तिचा तो स्पर्श त्याला जवळचा होता. अजिबात अनोळखी नव्हता.

‘पण कधी? केव्हा?’

उत्तरासाठी त्यानं आभाळात पाहिलं, ढग होते, चांदण्या होत्या, पण त्याचा तो मार्गदर्शक ढग मात्र कुठंही नव्हता.

स्नानानंतर तो बाहेर आला. डोक्यावरची पट्टी पिळून पुन्हा डोक्यावर बांधली. आज प्रथमच त्याला जाणीव झाली की, जखमेचा दाह, जखमेची आग त्याला जाणवली नाही. उलट तिथे एक विलक्षण गारवा वाटू लागला आणि दुसरा प्रश्न मनात थैमान घालू लागला.

‘ही जखम कसली? आणि कशामुळे झाली? केव्हा झाली? कुठे झाली?’

आश्वासक नजरेनं त्यानं गंगेच्या प्रवाहाकडे पाहिलं. प्रवाह स्तब्ध झाला होता. मातेकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तरं होतं; पण ते देण्यास ती असमर्थ होती. काठावरून तो हळूच उठला आणि मागे वळून चालू लागला. समोर वामनराव आपटे उभे होते आणि खुणेने त्याला ‘जेवायला चल’ म्हणून सांगू लागले. तो त्यांच्या मागे आपली लांबसडक पावलं टाकत निमूटपणे चालू लागला.

यात्रेकरूंची मोठी पंगत बसली होती. आपटेंनी त्याच्या हातांत जेवणाची पत्रावळ दिली. ती घेऊन सगळ्यांपासून दूर येऊन तो बसला. गंगेला नमस्कार करून तोंडात घास घेणार, एवढ्यात ‘उदरभरण नोहे, जाणिजे यमकर्म’ हा श्लोक त्याच्या कानी पडला. क्षणभर तो दचकला. पुन्हा यात्रेकरूंचा गजर झाला, ‘जय गंगामैय्या!’ आणि सगळ्यांच्या भोजनाला सुरुवात झाली. दुपारनंतर तो आता रात्री पुन्हा जेवत होता. त्याआधी पूर्वी कधी जेवला? कुठे जेवला? त्याला काहीच आठवत नव्हतं.

‘यज्ञकर्म’ हा शब्द डोक्यात पक्का बसला आणि त्या उपकारकर्त्या म्हातारा-म्हातारीला तो शोधू लागला. दूर बसून शांतपणे पण समाधानाने ते दांपत्य जेवत होतं. त्यांना डोळ्यांत साठवत, त्यांचे उपकार स्मरत तो भोजन करू लागला. जेवता जेवता त्याच्या मनात विचार आला,

‘पुढचा प्रवास एकट्याने रात्रीच करू या, की या साधुसंत आणि इतर यात्रेकरूंबरोबर करू या?’ दुसऱ्या विचाराने त्याच्यावर जय मिळवला. उद्या सकाळीच आपण या यात्रेकरूंबरोबर प्रवास करू या; कदाचित यांच्या सहवासात माझी स्मृती परत येईल. स्वत:ची ओळख पटेल. तशी सध्याची त्याची ओळख त्याला आठवते, ‘अस्तंब्याचा बाबा’. डोंगरदऱ्यांतले गोरगरीब पावरी आदिवासी त्याची पूजा करतात; नवस करतात. पण का करतात? या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न त्याने कधीच केला नव्हता किंवा करावासा वाटलाही नव्हता. कारण त्याचं अस्तित्वच त्याच्यासाठी अनोळखी होतं. गरज होती ती पोटाची आणि कपाळावर असलेल्या जखमेसाठी तेलाची. त्याची व्यवस्था त्याचे आदिवासी भक्त करायचे. इथे या हिमालयाच्या परिसरात त्याला एकदाही जखमेसाठी तेलाची गरज भासली नाही, का? प्रश्न, फक्त प्रश्न ! उत्तर माहीत नाही.

भोजनं संपली. यात्रेकरू गटागटाने जमून गप्पा मारू लागले. आपटे दांपत्य आपल्या खोलीत गेलं. वयोमानानुसार त्यांना विश्रांतीची गरज होती.

जीर्णपुरुषाला झोपेची कधीच गरज नव्हती. तो एका बाजूला कातळावर बसला होता. एवढ्यात त्याच्या कानांवर शब्द पडले: ‘महाभारत’. त्या शब्दाची वीज त्याच्या डोक्यात पुन्हा कडाडली आणि त्या दिशेला त्यानं पाहिलं. पाचसहा जणांचा घोळका बसला होता, आणि त्यांच्यातला एक चष्मा असणारा प्रौढ गृहस्थ बोलत होता, ‘महाभारत’. पुन्हा त्या विचारवंताने तो शब्द उच्चारला आणि जीर्णपुरुष बसल्या जागेवरून उठून त्या घोळक्याच्या दिशेने चालू लागला. तो विचारवंत पुरुष बोलू लागला,

‘विद्यार्थी मित्रहो, महाभारताला माझ्यासारखे काही धार्मिक विचारवंत प्राध्यापक भारतीय जीवनाचा, भारतीय संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ ठेवा मानतात.’

जीर्णपुरुष त्या घोळक्यात येऊन बसला आणि त्याचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकू लागला.
विचारवंत पुढे बोलू लागला,

‘याचं कारण म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हा ईश्वरी अवतार आहे आणि त्यांनी सांगितलेली जीवन-मुक्तिदायक भगवद्गीता हे अंतिम परमेश्वरी सत्य आहे. महाभारताची कथा ही दिव्यात्म कथा असली तरी यातल्या बहुतेक व्यक्ती या मानवी पातळीवरच मुनिवर्य व्यासांनी चित्रित केल्या आहेत. श्रीकृष्णाचा मृत्यूही शेवटी मानवी पातळीवर झालाय. तसाच महामाता गांधारी हिने कृष्णाला दिलेला शाप: ‘कृष्णा, तुझ्या वंशातही यादवी युद्ध होईल’! हा शाप देखील मानवी पातळीवरचाच होता. ‘

जीर्णपुरुषाची अस्वस्थता वाढू लागली. कृष्ण हा शब्द मेंदूच्या ठिकऱ्या करू लागला. दूर कुठून तरी हिमनग कोसळल्याचा आवाज आला. क्षणभर सगळे थांबले आणि निसर्गाच्या चमत्काराकडे पाहू लागले. एवढ्यात खोल विहिरीच्या अथांग मुळापासून शब्दनाद बाहेर आला: ‘पुढे -‘ तो शब्दनाद जीर्णपुरुष प्रथमच बोलला आणि तो विचारवंत क्षणभर दचकला. कारण त्या शब्दाची ताकद विलक्षण वेगळी होती. शब्द ज्यानं उच्चारला त्या व्यक्तीला तो शोधू लागला. एवढ्यात घोळक्यापैकी एक विद्यार्थी बोलला,

‘सर, पुढे सांगा ना.’

हो म्हणत त्याला सरांनी त्यांचे महाभारतासंबंधीचे विचार सांगायला पुन्हा सुरुवात केली.
‘महाभारत हे शोकात्म विश्वरूप दर्शन आहे. त्यात भव्योदात्त शोकात्म नाट्य आहे. अज्ञाताच्या पलिकडे जाणं शक्य नसल्यामुळे ज्ञाताच्या पातळीवर म्हणजे संपूर्ण मानवी पातळीवरूनच आपण महाभारताचा विचार केला पाहिजे. जिथे बुद्धी कुंठित होते, तिथे व्यासांप्रमाणे आपणही नियती, दैव यांचाच आश्रय घेतो. हे शोकात्म विश्वरूप दर्शन असलं तरी यातनादायक नाही. हे विश्व माणसाला चिंतनप्रवण करणार आहे. शोकात्म साहित्य हा मानवाचा भव्योदात्त संस्कृतीचा रमणीय आविष्कार आहे. अंत:करण विदीर्ण करणाऱ्या द्रौपदीच्या यातनाभोगातून साकारलेलं महाभारत…’

जीर्णपुरुषाचे ओठ पुटपुटले, ‘द्रौपदी… द्रौपदी…’

ओठांची पुटपुट थांबली आणि तो पुढे ऐकू लागला. विचारवंत प्राध्यापक बोलत होते,

‘दुःख भोगूनही सत्यासाठी मनाची समधातता, समतोलवृत्ती न सोडणारा धर्मराज, असे अनेक थोर पुरुष मानवी सुसंस्कृततेचे मानदंड आहेत. मानवी जीवनात दुःखं अनंत आहेत. पण या दुःखाला जेव्हा भव्योदात्तता लाभते, अर्थशून्य जीवनाला जेव्हा मूल्यात्म अर्थ प्राप्त होतो, तेव्हा मानवी संस्कृतीचं हृदयंगम दर्शन घडतं आणि महाभारतासारखं अमर साहित्य निर्माण होतं. महाभारत ही एका जातीची, एका नायकाची किंवा नायिकेची शोकात्म कथा नाही तर… दोन संपूर्ण कुलांची, मानववंशाची, एका युगान्ताची शोकात्म कथा आहे. ‘,

प्राध्यापक थांबले. वातावरणातला गारठा वाढू लागला. प्रत्येक यात्रेकरू आपआपले गरम कपडे, शाली गुंडाळून बसले होते. फक्त जीर्णपुरुष काळ्या कफनीवर तसाच बसला होता. त्याच्या काळ्या कफनीमुळे त्या काळोखात तो कुणालाच दिसत नव्हता. प्राध्यापक उठले.

‘चला मित्रांनो, विश्रांती घेऊ या. आज बराच प्रवास झाला.

‘एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, उद्या दुपारी निघायचं आहे.

अजून सांगा ना, ऐकायचं आहे. ‘

सर हसले व म्हणाले, ‘उद्या. उद्या रात्री आपण जिथे मुक्काम करू तेव्हा महाभारतातल्या व्यक्तिरेखांबद्दल आपण बोलू, ज्या महर्षी व्यासांनी उभ्या केल्या आहेत. आणि व्यास आजही चिरंजीव आहेत, जिवंत आहेत आणि या हिमालयातच आहेत.’

आपणाला त्यांना भेटता येईल?’ दुसरा एक जण अजाणतेपणी बोलला.

सर मंद हसले आणि म्हणाले, ‘नाही मित्रांनो, पुण्यात्मे दिसले तरी आपण त्यांना ओळखू शकणार नाही. ते चिरंजीव आहेत! शुभरात्री.’

म्हणत सर रुमकडे गेले. भारावलेले विद्यार्थीही उठले. आपापल्या रुमकडे गेले. सर्वत्र शांतता पसरली.

बसल्या जागी जीर्ण पुरुष एखाद्या बर्फासारखा थिजून गेला होता. त्या प्राध्यापकाचं बोलणं त्याला स्वत:चेच अनुभव वाटत होते. पण स्मृती दगा देत होती. त्यानं आकाशाकडे पाहिलं. त्याचा वाटाड्या ढग दिसत नव्हता. पण काळ्या ढगांनी प्रचंड गर्दी करून चंद्रालाही झाकोळून टाकलं होतं. जीर्णपुरुषाची संभ्रमावस्था अधिकच घट्ट होत चालली होती. विचार, फक्त विचार ! तो प्राध्यापक मघा म्हणाला, महाभारत हे व्यासांनी लिहिलंय. मग? मला कसं ज्ञात नाही? विचाराच्या आवर्तनातून त्याचे पाय हळूहळू गंगेच्या दिशेने वळले. तिच्या काठावर पाण्यात पाय घालून तो शांतपणे बसला. त्याच्या विचारांना गंगामातेने एक शांत निरलस गारवा दिला. पहाटेपर्यंत तो तसाचा बसून होता… !

पक्ष्यांचा पहाटेचा मंजुळ किलबिलाट सुरू झाला, तसा जीर्णपुरुष उठला आणि गंगेच्या पाण्यात शिरला. आणि सूर्योदय होईपर्यंत तो तसाचा बसून होता !

यात्रेकरू थंडीने गारठले होते. आपल्या कानटोपी, शाली, स्वेटरच्या बाहेर यायला ते तयार नव्हते. साधु-संन्यासी मात्र गंगेत स्नान करीत होते.

स्नान करून जीर्णपुरुष काठावर आला. त्याला शोधत वामनराव आपटे समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या हातात मातीचा कुलचा होता. त्यात चहा होता. तो चहा त्यांनी जीर्णपुरुषाला दिला आणि हात जोडून निघून गेले. हातातल्या त्या गरम मडक्याकडे जीर्णपुरुषाने पाहिलं आणि भांड्याला तोंड लावून तो संपवला. आपटे गेले त्या दिशेने पहात जीर्णपुरुष विचार करू लागला… कालपासून हा म्हातारा माणूस आणि याची पत्नी सतत माझ्या सहवासासाठी झटतात, माझ्या क्षुधेकडे लक्ष देतात, कदाचित हे मला ओळखत तर नसतील? त्या दोघांची आदरयुक्त पण चमत्कारिक नजर माझ्याकडे पहात काही तरी शोधायचा प्रयत्न करतेय. यांना विचारू या का मी कोण आहे? पण तो विचार त्यानं लगेच दूर सारला. याचं उत्तर फक्त व्यासमुनीच देतील, त्यांना विचारू या. फक्त आज रात्री त्या प्राध्यापकाच्या आसपास मात्र जरूर राहू या. त्याच्या गोष्टीचा, महाभारताचा संबंध कदाचित माझ्याशी असावा…

दुपारी यात्रेकरूंबरोबर भोजन करून जीर्णपुरुषाची यात्रा पुन्हा निघाली. यात्रेकरू सर्वत्र भारावून पहात होते. रामझुला पार करून ते निसर्गस्वर्ग डोळ्यांत साठवीत पलिकडे गेले. गंगाकिनारी ऋषीकेशला असलेले स्वर्गाश्रम, गीतामंदिर, परमार्थाश्रम हे ध्यानधारणेसाठी बांधलेले आश्रम त्यांनी पाहिले. जीर्णपुरुषास ते आश्रम ओळखीचे वाटले. कुठल्या तरी काळी अध्यात्माचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो येथे आला होता. आतादेखील अनेक ऋषिमुनी तेथे ध्यानधारणा करत बसले होते.

ऋषीकेश येथे गंगामातेला होडीतून ओलांडताना जीर्णपुरुषाला एक विलक्षण हुरहूर लागली.
तो पाण्यातून चालत जाऊ शकत होता. पण त्याचे भक्तमित्र त्याला सोडायला तयार नव्हते.
होडी हळूहळू पाणी कापत चालली होती. एवढ्यात हिमालयाच्या लहरी पावसाला सुरुवात झाली. वातावरण बदलून गेलं. अंधारून आलं. हिमालयाच्या पावसाच्या सरी त्या जीर्णपुरुषाचं स्वागत करीत होत्या. किनाऱ्याला येईपर्यंत सगळे यात्रेकरू भिजून गेले. आजचा मुक्काम तिथे जवळच होता. सर्व जण भिजलेल्या अवस्थेतल्या थंडीच्या गारठ्याने कुडकुडत होते. आपटे दांपत्याची अवस्था विलक्षण केविलवाणी झाली होती. जीर्णपुरुषाला त्यांची खूप दया आली. तो त्यांच्या जवळ गेला आणि त्यानं त्या वृद्ध दांपत्याच्या डोक्यावर हात ठेवला. आशीर्वादपर काही तरी पुटपुटला आणि पुढे गेला. अगदी क्षणभरातच थरथरणारं आपटे दांपत्य हळूहळू स्थिर झालं. त्याच्या स्पर्शाने त्यांच्या शरीरात एक ब निर्माण झाली. आपटे पति-पत्नींनी तो कोण आहे हे ओळखलं होतं. पण त्याच्या देवत्वाची साक्ष त्यांना आता पटली होती. डोळ्यांतून झरझर आसवं झरू लागली. वामनराव पत्नीला हळूच म्हणाले,

‘हा प्रसंग आणि तो कोण आहे हे कुणाला सांगू नको हं. लोक आपल्याला वेड्यात काढतील आणि त्यालाही. यात्रा इथेच संपेल. फक्त त्याच्या सहवासाची अनुभूती मात्र आयुष्यभर जपून ठेव. चल,’’ म्हणत वामनरावांनी आपल्या पत्नीचा सुरकुतलेला हात मोठ्या प्रेमाने आपल्या हातात घेतला आणि विश्रांतीसाठी निवासस्थानाकडे जाऊ लागले.

रात्रीचं भोजन झाल्यावर कालचे विचारवंत प्राध्यापक आपल्या महाभारताच्या अभ्यासू विद्यार्थ्यांना घेऊन एका बाजूला येऊन बसले. जीर्णपुरुष त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. त्यांना आपण दिसणार नाही आणि आपल्याला सगळं ऐकता येईल असा तो बसला. प्राध्यापक बोलू लागले,

‘तर मित्रांनो, आज आपण महाभारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांबद्दल बोलणार आहोत. सुरुवात आपण कौरवराज अंध धृतराष्ट्रापासून करू. या धृतराष्ट्राला शेवटपर्यंत लोभ, मोह, तृष्णा, द्वेष हे विकार नियंत्रणात ठेवता आलेच नाहीत.’

‘सर,’ एका विद्यार्थ्यानं त्यांना मध्येच अडवलं, ‘सर, माणसाला ही पातकाची अंत:प्रेरणा कोण देतो?

‘विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सर म्हणाले, ‘अगदी हाच प्रश्न अर्जुनाला पडला होता आणि अर्जुनाने तो प्रश्न श्रीकृष्णाला गीतेत विचारला.

अथकेन प्रयुकोऽयं पापंचरतिपुरुषः ।

अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ।।

अगदी ज्ञानी, सर्वज्ञ पुरुषांनाही पापाचरणाकडे कोण लोटतं? कृष्णाने उत्तर दिलं, रजो गुणांपासून उत्पन्न झालेले काम, क्रोध माणसाला सत्प्रवृत्तीपासून भ्रष्ट करतात. सत्त्व, द्वेष, असूया, रज, तम हे प्रकृतिविशेषच आहेत.’

जीर्णपुरुषाच्या डोक्यात घणाचे घाव पडू लागले… हे संदर्भ आपल्यासाठीच तर नाहीत?

सर पुढे बोलू लागले, ‘तेव्हा महाभारतातील सगळ्यांत मोठा खलनायक धृतराष्ट्र, सगळ्या कुलाच्या विनाशाचं मूळ धृतराष्ट्रच. यांनी आरंभी, मध्यकाली किंवा शेवटी एकही सत्कृत्य केलं नाही. आणि दुसरा अभिजात खलपुरुष – धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन.’ जीर्णपुरुषाचे ओठ पुटपुटले, ‘दुर्योधन… दुर्योधन… दुर्योधन…’,

सर पुढे म्हणाले, ‘अर्थात धृतराष्ट्राच्या प्रकृतितत्त्वातच तो अंकुर होता, जेव्हा अश्वत्थाम्याने…!
अश्वत्थामा या शब्दाचा उच्चार सरांनी केला आणि त्याच वेळी हिमनगाचा एक कडा मोठा आवाज करत दरीत कोसळला. सर थांबले. सगळेच अंधारातून चमकणाऱ्या त्या हिमनगाकडे पाहू लागले.

जीर्णपुरुषाचे ओठ पुटपुटले,

‘अश्वत्थामा.’

‘हा कोण? ‘ एक विद्यार्थ्याने सरांना जागं केलं.

सर पुढे म्हणाले, ‘कुठे आलो होतो मी? हां आठवलं, अश्वत्थामा, ज्याने पांडवांच्या संपूर्ण कुलाचा संहार केला आणि तो वृत्तांत जेव्हा मरणासक्त दुर्योधनाला सांगितला, तेव्हा त्या क्षणी देखील तो खलपुरुष समाधानाने हसत म्हणाला, आता युधिष्ठिर विधवांवर राज्य करेल!’ पुन्हा हिमनग कोसळला! सर उठले.

‘विद्यार्थ्यांनो, पुढची चर्चा आता उद्या करू.’ असं म्हणत रुमच्या दिशेन गेले. जाताना ‘चला’ म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले.

जीर्णपुरुषाच्या डोक्यात एकाएकी घंटानाद होऊ लागला. ‘जा सांग युधिष्ठिराला, आता विधवांवर राज्य कर!’ हे शब्द माझ्या अत्यंत जवळचे आहेत, या क्षणालाही कानांत भुंग्यासारखे घोंघावतायेत. पण हे सगळे कोण? दुर्योधन हे मला तर नाही म्हणाला? पण मी कोण?

संभ्रमावस्था त्याची सोबत सोडायला तयार नव्हती. सकाळपर्यंत तो नुसता शून्यात पहात बसला होता. त्याच्या डोक्याला चावणारी ती गोड मधमाशी आता कंटाळून निघून गेली होती.

तिसऱ्या दिवशी सकाळीच यात्रा सुरू झाली. आता हळूहळू काही इतर यात्रेकरूंचंही जीर्णपुरुषाकडे लक्ष गेलं होतं. काळी कफनी घातलेला, डोक्यावर पट्टी बांधलेला, कुणाशीही एकही शब्द न बोलणारा, प्रचंड थंडीत कुठलेही गरम कपडे न घालणारा, बर्फासारख्या थंडगार गंगेत पहाटे उठून स्नान करणारा आणि कपडे सुकेपर्यंत ओलेता चालणारा, एकटा, एका बाजूला दुर्मुख बसलेला… त्याची अवाढव्य मूर्ती आणि चेहऱ्यावरचे भाव यांवरून तो एखादा मुका, बहिरा असावा, असा इतरही यात्रेकरूंचा समज झाला. पण तरीही अशा असहाय्य, गरीब, कफल्लक माणसाच्या मदतीसाठी, पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी, त्या तीर्थक्षेत्री प्रत्येक जण तत्परतेने झटत होता. त्याला ‘बाबा, बाबा,’ म्हणत त्याची सरबराई करत होता. म्हणूनच त्या यात्रेकरूंनी या यात्रेत त्याच्याजवळ पैसे नाहीत याची कमतरता त्याला भासू दिली नाही आणि यमुनोत्रीसाठी बसमध्ये त्याला आपल्या बरोबर घेतलं. अर्थात या सगळ्या यात्रेकरूंत आपटे दांपत्याचं स्थान वरचं होतं…!

बडकोटपासून हनुमानचट्टीपर्यंत सगळे बसने गेले. तेथून चालत जानकीचट्टीपर्यंत त्यांना यमुनोत्रीचा एक टप्पा पूर्ण करायचा होता.

हनुमानचट्टी ते जानकीचट्टी हे अंतर जीर्णपुरुष एखाद्या सराईतसारखा चालू लागला. ते पाहून इतर यात्रेकरू त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. अर्थात त्याच्या लांबच लांब पडणाऱ्या उघड्या पायांना खाचखळग्यांची, चढाव-उतारांची आणि हिमालयातही चालण्याची सवय होती. पण बिचाऱ्या यात्रेकरूंना नव्हती. तेव्हा ते अंतर चालताना त्यांची भीतीने बोबडी वळली. एक तर बर्फाच्छादित हिमालयात चालणं अतिशय कर्मकठीण. कुठलाच रस्ता सरळ नव्हता. एकीकडे खोलवर जाणारी दरी तर दुसरीकडे खडा उभा पहाड. त्यावरचे अजस्र वृक्ष आणि खालून खोलवर आवाज करणारी यमुनानदी, अरुंद रस्ता, कधी सपाटी, कधी थोडा उतार, तर कधी खड्डा. यात्रेकरूंची ही अडचण जीर्णपुरुषाच्या लक्षात आली. त्याने खुणेने सगळ्यांना दिलासा दिला आणि तो त्यांचा वाटाड्या बनला. सगळ्या यात्रेकरूंना त्यांच्या वाचिक वाटाड्यासह जानकीचट्टीपर्यंत सुखरूप घेऊन आला. तेव्हा सगळ्या यात्रेकरूंनी एक मोठा सुस्कारा सोडला. जीर्णपुरुषाच्या उपकाराखाली दडलेले त्यांचे बोलके चेहरे जीर्णपुरुषाकडे पहात बरंच काही सांगत होते. जीर्णपुरुषाने फक्त हात उचलून आशीर्वादपर हलवला आणि समोरचा परिसर न्याहाळू लागला. लांबवर दिसणारे बर्फाचे पहाड, विविध प्रकारच्या रंगबेरंगी वृक्षराजीने वेढलेला परिसर, वेगाने वाहणारी यमुना, सुखद थंड हवा आणि प्रसन्न वारा जीर्णपुरुषाच्या ओळखीचा होता. ओठ हलले.

‘कधी आलो होतो इथे? केव्हा आलो होतो? कशाला आलो होतो? ‘

मन प्रसन्न होत होतं, तरी प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. स्वत:च्या व्यथेतून बाहेर येत त्या भव्य निसर्गाकडे जीर्णपुरुष पाहू लागला. पर्वत-उतारावर पायऱ्या होत्या. प्रत्येक दोन पायऱ्यांमध्ये गव्हाचं पीक लावलं होतं. वाऱ्यामुळे सगळी छोटी छोटी गव्हाची कणसं एखाद्या नर्तकीसारखी नाचत होती. महाकाय निसर्गाकडे अबोध बालकासारखा पहात असताना अंधार कधी झाला, ते त्याला कळलंच नाही.

रात्री यात्रेकरूंचा मुक्काम जानकीचट्टीला अरविंद आश्रमात होता. संध्याकाळच्या गार वाऱ्याने सगळेच यात्रेकरू गारठून गेले होते. सगळे आपआपल्या रुममध्ये जेवून गुडूप झाले होते. जीर्णपुरुष त्या विचारवंत प्राध्यापकाची आणि त्याच्या विद्यार्थ्यांची वाट पहात होता. त्याला पुढे ऐकायचं होतं. पण तेदेखील सगळेच आज गारठले होते. कुठेच दिसत नव्हते. छोटंसं गाव, छोटीशी वस्ती, छोट्याशा टपऱ्या सर्वत्र होत्या. छोट्या दिव्यात सगळे आवाराआवर करीत होते. जीर्णपुरुष मात्र एकटाच बाहेर बसून अंधाराकडे पाहत होता. सारा परिसर आता हळूहळू शांत होत होता. समोर ध्यानस्थ डोंगर उभे होते आणि ते त्या जीर्णपुरुषाला काही तरी सांगायचा प्रयत्न करत होते. पण यमुनामाईच्या पाण्याच्या जबरदस्त आवाजात त्यांचे शब्द त्याला ऐकू आले नाहीत. सर्वत्र अंधारच अंधार होता. जवळपासचे सगळे दिवे आता मालवले होते. प्रकाश होता तो फक्त हिमालयाच्या धवल रंगाचा. त्याच्याकडे पाहत तो रात्रभर तिथेच बसून राहिला.

सकाळी सहा वाजता यात्रेकरूंची गडबड सुरू झाली होती. त्याआधी जीर्णपुरुष आंघोळ करून बसला होता. स्मृतिभ्रमामध्ये देखील तो कधीही आंघोळ करायला विसरला नाही. यात्रा पुन्हा सुरू झाली. ती अधिकच कठीण होत गेली. यात्रेकरूंच्या नाकात चावरा वारा झोंबत होता. खोल दऱ्या अंगावर झेपावतात की काय या भीतीने प्रत्येक यात्रेकरूचा श्वास कोंडत होता. त्यांचा वाटाड्याही गारठला होता. जीर्णपुरुषाने सगळ्यांना धीर देऊन स्वत:च्या सोबत चालण्याची खूण केली. सगळे त्याच्या मार्गावर विश्वासाने चालू लागले. दूरवरची हिमशिखरे हाताच्या अंतरावर दिसत होती. एवढ्यात यात्रेकरूंचा बोलता वाटाड्या मोठ्याने ओरडला,

‘आता हा पुढचा पूल ओलांडला की समोर मंदिर दिसेल. मी पुढे होतो. ‘

म्हणत जीर्णपुरुषाला ओलांडून तो पुढे गेला. पूल ओलांडल्यावर दोन्ही बाजूंना पूजेच्या सामानाची दुकानं होती. यात्रेकरूंच्या जेवणाची व्यवस्था पण तिथेच केली होती. अर्थात जेवणाच्या वेळी जीर्णपुरुषाच्या हातात पत्रावळ द्यायला नेहमीप्रमाणे आपटे आजी विसरल्या नाहीत. त्यांच्या दृष्टीत आता होती फक्त कृतज्ञता.

वाटाड्या पंडित ओरडू लागला, ‘इथे लक्ष द्या, ऐका. या यमुनोत्रीला नदीच्या वरच्या बाजूला मंदिर बांधलं आहे. यमुना कालिंद पर्वतातून बाहेर पडून उगम पावते, म्हणून तिला कालिंदीही म्हणतात. समुद्रसपाटीपासून दहा हजार नऊशे फूट उंचीवर यमुनेचा उगम आहे. रामायणानंतर चिरंजीव हनुमान इथेच तपश्चर्या करत होते, म्हणून या भागाला बंदरपुच्छ असं म्हणतात. या नावाचा तिथे पर्वतही आहे. वरून येणारी यमुना आणि दुसरीकडच्या कुंडाचे गरम पाण्याचे प्रवाह इथे एक होतात. त्या गरम पाण्यात तांदूळ एका फडक्यात बांधून धरले तर भात शिजतो, बटाटे उकडले जातात. त्याच भाताचा इथे प्रसाद वाटतात. ‘

वाटाड्याची ही रसवंती चालू असताना जीर्णपुरुष दूर जाऊन उभा राहिला. त्याचं मन स्वत:चं आत्मपरीक्षण तर करत होतंच, पण त्याबरोबर युमनेच्या पाण्याकडे ओढ घेत होतं. त्याने स्वत:ला यमुनेत झोकून दिलं. यमुनामाईचा स्पर्श ओळखीचा होता. खूप जवळचा होता. मायेचा होता. सहज त्याने आजुबाजूला नजर टाकली. कुणी तरी यमुनाआईच्या मायेने त्याच्याकडे पहात होती. तिच्या पापण्या ओलावल्या होत्या. तो ओरडला,

‘माते, तू मला ओळखतेस. सांग, मी कोण आहे? ‘

यमुनेचा आवाज स्तब्ध झाला. तिला हात जोडून तो बाहेर पडला आणि तसाच वरच्या हनुमान मंदिराकडे वळला.

दुसऱ्या दिवशी सगळेच यात्रेकरू जानकीचट्टी ते हनुमानचट्टीला परत फिरले, कारण त्यांना गंगोत्री गोमुखाला जायचं होतं. उत्तरकाशी गाठायची होती. अर्थात त्यांत जीर्णपुरुष होता.

उत्तरकाशी: एक लहानसं पण तालुक्याचं गाव. तिथे यात्रेकरू संध्याकाळी पोहचले. हॉटेल मालक सरदारजी होता. जीर्णपुरुषाकडे पाहून तो सरदारजी आहे समजून पंजाबीत बोलला. जीर्णपुरुष बावचळून गेला. वाटाड्या पंडिताने त्या सरदारजीला हिंदीत ‘तो मुका आहे’ म्हणून सांगितलं. वामनराव त्या प्रसंगाकडे अस्वस्थपणे पहात होते. डोक्यावरच्या पट्टीमुळे जीर्णपुरुषाबद्दल सरदारजी मालकाचा झालेला गैरसमज त्यांच्या लक्षात आला. त्यांचा स्वार्थ एवढाच होता की तो जीर्णपुरुष नजरेसमोरून हरवता कामा नये. रात्री मुक्काम उत्तरकाशीतच होता. उद्या गंगोत्री गोमुखाचा टप्पा सुरू होणार होता.

त्या रात्री प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची महाभारतावरील चर्चा पुढे सुरू झाली. जीर्णपुरुषाने कान टवकारले. प्राध्यापक बोलत होते,

‘आज आपण विचार करणार आहोत तो कुरुश्रेष्ठ भीष्माचार्यांचा. सत्य प्रतिज्ञ भीष्माचार्य. ‘सत्याचा त्याग मी कधीच करणार नाही’ असं म्हणणारे. राजनिष्ठा की सत्यनिष्ठा या संभ्रमात अश्रू हरवून बसलेला हा माणूस! जणू कुरुकुलाचा शेवट करण्यासाठीच नियतीने भीष्माची योजना केली होती हेच सत्य आहे. सत्याचं ज्ञान असूनही त्यांनी कधी योग्य न्यायनिर्णय घेतला नाही. विद्यार्थी मित्रहो, तुम्ही विचार करा, भीष्माने फक्त ‘मी सत्य प्रतिज्ञ आहे, मी सत्य प्रतिज्ञ आहे…’ असं सांगत स्वत:चं अहंकारसुख जपण्यापलीकडे दुसरं काहीच मिळवलं नाही. अंत:करण पांडवांकडे, देह कौरवांकडे, असं हे दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व. अर्थात हे माझं भीष्मांबद्दलचं मत माझ्या महाभारताच्या संशोधनातून झालं आहे. तुम्हीही यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल पीएच. डी. करता आहात. तुमचे याबद्दल काही स्वतंत्र विचार असतील तर मांडा.’

विद्यार्थी हसले. ‘नाही सर, या हिमालयाच्या परिसरात आपल्याकडून महाभारत ऐकताना, आपली सडेतोड समीक्षा ऐकताना आमच्या ज्ञानात भर पडतेय. सर, महाभारतातल्या कर्ण या व्यक्तिरेखेबद्दल तुमचं मत काय?

‘सरांच्या कपाळावरची आठी स्पष्ट दिसली. जीर्णपुरुषही सावरून बसला. सर अत्यंत कडवट स्वरात म्हणाले, ‘कर्ण हा दुरात्मा होता. आमच्या साहित्यकारांनी उगाचच त्याचं उदात्तीकरण करून ठेवलंय. वास्तविक खलपुरुष दुर्योधनाचा हा जिवलग मित्र, दुर्योधनाच्या सगळ्या पापकृत्यांचा प्रेरक होता. महापराक्रमी अर्जुनाबद्दल त्याला नेहमीच आकस, असूया वाटत होती. एक लक्षात घ्या मित्रांनो, कर्माचा कायदा, वैश्विक न्याय, कोणालाही क्षमा करीत नाही. कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्यांचं उदाहरण घ्या. ‘

कुठे तरी प्रचंड आवाज करत बर्फाचा एक कडा पडला.

जीर्णपुरुष अधिकच बावचळला. द्रोणाचार्य? अर्जुन? ही दोन नावं त्याला सगळ्यांपेक्षा अधिक जवळची आणि अधिक ओळखीची वाटली. त्याची स्वत:ची वाटली. बर्फाच्या पडणाऱ्या कड्याकडे पाहत असलेल्या सरांना दुसऱ्या एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला,

‘सर, कर्माचा कोणता वैश्विक न्याय द्रोणांना मिळाला?

सर म्हणाले, ‘द्रोणांनी अर्जुनाला दिलेलं वचन पाळण्यासाठी निषादपुत्र एकलव्याचा अंगठा कापून मागितला. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा कापून दिला. जीवन उद्ध्वस्त करणारी ही मागणी ज्याने अगदी निरपेक्ष मनाने परिपूर्ण केली, तो एकलव्य कोठे आणि देवघेव करून औदार्य दाखवणारा कर्ण कोठे? मात्र या अमानुष कर्माचा अंगठा तोडून मागण्याबद्दलचा दैवी न्याय द्रोणांना भोगावा लागला. महायुद्धात द्रौपदीबंधू आणि पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्नाने त्याचा केलेला वध पुन्हा एकदा आठवा. कर्माचा कायदा, वैश्विक न्याय कुणालाच क्षमा करत नाही. कर्णाचा वधही तसाच झाला. मत्सर, द्वेष, सूड या भावनांनी पेटलेल्या माणसाच्या हातून अनंत प्रमाद घडतात. त्यातूनच त्याचं अध:पतन होतं. दुरात्मा कर्णाचं खरं अंतरंग सभापर्वात प्रत्ययाला येतं. इथे व्यासांनी त्याचं चित्रण खलनायक म्हणून केलं आहे. सभापर्वातील घटना महाभारत या शोकात्म महाकाव्यातील मध्यवर्ती घटना आहेत. युधिष्ठिरासारख्या सत्यनिष्ठ धीरोदात्त नायकाच्या हातून घडलेल्या द्यूताचा, जुगाराचा प्रमाद आणि धृतराष्ट्र, दुर्योधन यांचा राज्यलोभ यांतून पुढील सर्व शोकात्म घटना घडतात. कौरवांच्या राज्यसभेत दुःशासन आणि कर्ण यांनी केलेली द्रौपदीची विटंबना हेच पुढील सर्वंकष विनाशाचं मूळ कारण ठरलं. आदरणीय वृद्धांच्या उपस्थितीत द्रौपदीला कर्णाने बंधकी (वेश्या) म्हटलं. द्रौपदी ही कुरुकुलाची स्नुषा आहे. धर्माने तिचं दान लावण्याआधी ती कुरुकुलाची महाराज्ञी होती याचंही कर्णाला भान राहिलं नाही. सूडबुद्धीने कर्ण म्हणतो कसा, ‘एकोभर्ता स्त्रिया देवैविहितः कुरुनंदनाइयं, त्वनेकवशगा बंधकीति विनिश्चिता । अस्या सभामानयनं न चित्रमिति मे मतिः । एकाम्बरधरत्वं (एकवस्त्र) वाऽप्यथवाऽपि विवस्त्रतः ।।’ ती एकवस्त्रा असो वा विवस्त्र असो, तिला सभेत आणा ! महाभारतातील भीषण घटनांचा निर्माता हा कर्णच होता. दुर्योधन स्वत:च्या बुद्धीने काहीच करत नव्हता. त्याला दुष्कर्माची प्रेरणा कर्ण देतो. कर्ण मनोविकृत होता. त्याच्या मनाची क्षुद्रता असामान्य होती. कर्णाचं मरण सुंदर तर नाहीच, इतकंच नव्हे तर त्याचा मृत्यू शोकात्म पातळीवर येऊच शकत नाही. कर्णाचं सारं जीवन न्यूनगंडानं पछाडलेलं होतं. त्यामुळेच त्याचं सारं जीवन असूया, मत्सर, द्वेष या दुर्गुणांची आराधना करण्यात गेलं. ‘

क्षणभर नीरव शांतता पसरली. सगळेच अंतर्मुख झाले. जीर्णपुरुषही अस्वस्थ झाला. या भावनांचा आपल्यात हळूहळू उगम होतोय याची जाणीव त्याला विचारवंतांच्या तोंडून महाभारत ऐकताना झाली आणि त्याने मनोमन व्यासांना या संदर्भात विचारायचं ठरवलं. एवढ्यात सर म्हणाले,

‘मित्रांनो, हळवे झालात ना? दैवाने, नियतीने त्याच्यावर अन्याय केला हे खरं, पण त्याचा सूड त्यांनी नीच माणसांच्या सहवासात राहून निरपराधी व्यक्तींवर उगवून घेतला. ‘

सर खिन्न हसले आणि म्हणाले,

‘उद्या आपण महाभारतातल्या प्रमुख स्त्रियांबद्दल चर्चा करू. आज जे ऐकलंत त्याबद्दलच्या शंका असतील तर उद्या प्रवासात नेहमीप्रमाणे बोलूच. गुड नाईट.’

म्हणून सर गेले. विद्यार्थीही जड मनाने उठले. कर्णाविषयी त्यांना वाटणारी कणव आता हळूहळू ओसरू लागली. प्रत्येकाच्या मनातले विचार समजून सगळेच हताशपणे हसले आणि झोपायला निघून गेले. नेहमीप्रमाणे महाभारत ऐकलं की जीर्णपुरुष भारावून जायचा. पण आज मात्र त्याच्या माथ्यावरच्या जखमेत प्रचंड कळ उठली. बऱ्याचशा आठवणींना हळूहळू अंकुर फुटत होते. त्याचीच कळ त्याच्या माथ्याची अनेक शकलं करीत होती. त्यातून रक्त वाहत होतं. जखमेचीही जाणीव आज त्याला झाली. तो धावत नदीकडे गेला आणि त्या थंडगार पाण्यात स्वतःला त्याने झोकून दिलं!

पुढच्या दिवशी उत्तरकाशी ते भैरोवघाटी प्रवास सुरू झाला. उत्तरकाशीपासून तास-दीड तासाच्या अंतरावर पराशरमुनींचा आश्रम आला. तिथे यात्रेकरू थांबले. वाटाड्या पंडित माहिती सांगू लागला.

‘हा पराशरमुनींचा आश्रम. पराशरमुनी हे महाभारताचे कर्ते द्वैपायन व्यासांचे वडील. व्यासांची माता सत्यवती एक धिवरकन्या होती. पराशरांपासून यमुना नदीत असलेल्या एका द्वीपात तिने व्यासांना तिच्या कुंवारपणात जन्म दिला, म्हणून व्यासांचं नाव द्वैपायन असं ठेवलं. पराशरांनी वरदान देऊन त्या मत्स्यगंधेला पुन्हा कुंवारपणात ठेवलं. तिच्या अंगाला येणारा माशाचा दुर्गंध काढून कस्तुरीचा सुगंध दिला. पुढे याच सत्यवतीने कुरुकुलपती शंतनूशी विवाह केला. तो विवाह त्यांच्या गंगेपासून झालेल्या पहिल्या पुत्राने – भीष्माने लावून दिला. पुढे द्वैपायनांनी आपलं चित्त एकाग्र ठेवून घनघोर तपश्चर्या केली. माता सत्यवतीला भेटून वचनही दिलं की माते, तू जेव्हा माझी आठवण करशील तेव्हा मी कुठेही असलो तरी तुझ्यासाठी धावत येईन. द्वीपामध्ये जन्म झालेले द्वैपायन हे कृत, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगांत चिरंजीव म्हणून वावरताहेत, वावरत राहणार. कारण प्रत्येक युगात जसा धर्माचा ऱ्हास होणार तसं माणसाचं आयुष्य क्षीण होत जाणार. या दूरदृष्टीने संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी द्वैपायन मुनींनी शाखाभेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला. म्हणून त्यांना व्यास असंही म्हणतात.’

सर्व यात्रेकरूंनी व्यासांचं स्मरण करून त्यांना हात जोडले. जीर्णपुरुषाच्या मनातला गुंता सुटण्याच्या अगदी जवळ आला होता. एवढ्यात पंडित वाटाड्या ओरडू लागला,

‘ऐका, ऐका! व्यासांनी आपले चार शिष्य – वैशंपायन, सुमंत, जैमिनीपैल आणि पुत्र शुक – या सर्वांना चार वेद – ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि पाचवा महाभारत हा वेदही शिकवला. ‘

पंडित वाटाड्या पुढे बोलत राहिला, पण जीर्णपुरुषाला त्यातलं काही कळलं नाही. कारण त्याची कपाळावरची जखम भळभळून वाहू लागली. एका बाजूला जाऊन, कफनीतून काळी चिंधी काढून त्याने ती जखमेवर धरली. विभावरी आपटेंचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तत्परतेने त्यांनी त्याच्या जवळ जाऊन आपल्या पर्समधील तेलाची बाटली त्याच्या हातावर ओतली. त्याने ते तेल कपाळावरच्या जखमेवर धरलं. डोळ्यांत कृतज्ञतेची भावना तरळली. आपटे आजी हात जोडून दूर गेल्या. महाभारताचा गुंता त्याचं मस्तक पुनःपुन्हा विदीर्ण करत होता.

व्यावसायिक वाटाड्याची अत्यंत मौलिक व मार्गदर्शनपर असलेली माहिती संपली आणि यात्रेकरू गलबला करत पराशरमुनींचा आश्रम ‘गगनानी’ जवळ धावले. तिथे गरम पाण्याचे झरे वाहत होते. स्त्री-पुरुषांच्या स्नानासाठी वेगवेगळे तलाव बांधले होते. जीर्णपुरुष माथ्यावरील तेलामुळे सुखावला होता. महाभारताचं नादब्रह्म मात्र त्याच्या डोक्यात घुमतच होतं.

स्नान झाल्यावर सगळ्यांसाठी न्याहारी झाली. ती ग्रहण करून सगळे बसमध्ये बसले. जीर्णपुरुषाला बसगाडीची सवय नव्हती. पण यात्रेकरूंचा आग्रह त्याला मोडवेना. त्याचे लांबलचक पाय पोटाशी अवघडून घेऊन तो बसला आणि खिडकीबाहेर बघू लागला. बस भैरोवघाटाच्या दिशेने धावू लागली आणि बसच्या खिडकीतून एकीतून दुसरी, तिसरी करत जाणाऱ्या हिमालयाच्या रांगा, हिरवागार मखमली गालिचा अंथरावा तशी दाट झाडी, वाट मिळेल तिथून वेगाने पळत येणारं पाणी, खळखळ आवाज करत वेगाने वाहत येणारा गंगेचा प्रवाह, भक्तिगीत आळवणारे गार वारे आणि गर्दशार निळे आकाश पाहता पाहता तो सर्व वेदना विसरून गेला. एखाद्या बुभुक्षित नजरेने हा सर्व निसर्ग डोळ्यांत, मनात, स्मरणात तो साठवून ठेवू लागला. एकाएकी बसने वळणावर ब्रेक दाबला आणि पुन्हा हळुवारपणे ते दैवी पर्वत अंगावर घेत ती रस्ता कापू लागली. जसजशी भैरोवघाटी जवळ येऊ लागली तसं पर्वताचं रूप अधिक अक्राळविक्राळ होत गेलं. पंडित वाटाड्या बोलू लागला,

‘ऐका. भैरोवघाटीच्या अलीकडे मार्कंडेयाचं मंदिर आहे. हिवाळ्यात गंगेची मूर्ती या मंदिरात ठेवतात. त्याच्या जवळ जी गंगा आहे तिला जडगंगा म्हणतात. हिमालयातून गंगा वेगाने खाली आली. वाटेत जन्हूऋषींचा आश्रम तिने नष्ट केला. रागावलेल्या जन्हूऋषींनी तिला पिऊन टाकलं.
भगिरथाने जन्हूऋषींना प्रसन्न करून गंगेच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी गंगेचा प्रवाह आपल्या कानातून सोडला. म्हणून गंगेला इथे जान्हवी म्हणतात. ‘

त्या रात्री मुक्काम भैरोवघाटीत सरकारी निवासस्थानी होता. सगळे पांघरुणात गुडूप झाले.
जीर्णपुरुष मात्र त्या नीरव वातावरणात एकटा उभा राहून मनाची अंतर्मुखता अनुभवत होता. पहाट उजाडली ती त्याच्यासाठी विलक्षण सुखद वाटली. तरीही डोक्यातले असंख्य प्रश्नांचं वादळ मात्र खदखदतच होतं. निसर्गाच्या देवळात शिरताना जोडे बाहेर काढून ठेवायचे असतात याचं त्याला भानच नव्हतं. अंतरंगात उमटणाऱ्या तरंगांना जाणण्याचा तो प्रयत्न करत होता. त्यात त्या प्राध्यापकाचं ‘महाभारतातल्या स्त्रिया’ ऐकण्यास तो विलक्षण उत्सुक होता. आज यात्रेकरू सकाळी लवकर निघणार होते. त्याआधी जीर्णपुरुष स्नानास गेला.

बस गंगोत्रीकडे वाटचाल करण्यास तयार होती. वाटाड्याच्या वेळापत्रकाप्रमाणे बस निघाली.
न्याहारी सर्वांना बसमध्येच मिळाली. दुपारी चिटबासा येथे जेवणाची पाकिटं मिळणार होती. बस निघाली. रात्रीचा मुक्काम भोजबासा इथे होता. वाटाड्या म्हणाला, ‘तिथे भोजवृक्षांची झाडं आहेत म्हणून त्या गावाला भोजबासा असं म्हणतात.’ संध्याकाळी बस भोजबासाला पोहोचली. थकलेले यात्रेकरू लवकर झोपले. तो जीर्णपुरुष फक्त जागा होता.

दुसऱ्या दिवशी परत यात्रा सुरू झाली; ती ज्या पहाडात गंगा उगम पावते तिथे थांबली. तो मोठा बर्फाच्छादित पहाड आडवा पसरला होता. त्यामागे देवदर्शनी लहान-मोठे खडक होते. ते पार करत सगळ्यांनी गोमुख गाठलं. वाटाड्या म्हणाला, ‘बरं का पाहुण्यांनो, आता तुम्ही उभे आहात ते स्थान जवळजवळ बारा हजार सातशे सत्तर फूट उंच आहे. ‘

सर्व यात्रेकरूंच्या तोंडातून एक दबलेला चीत्कार बाहेर उमटला, ‘बापरे!’

जीर्णपुरुष विचार करू लागला… हरिद्वारला दर्शन घेतलेली गंगाई ते गोमुखापर्यंतची गंगाई !
तिची किती रूपं, नाद, ताल, स्वर, गोमुख, गुहेसारखं तोंड… त्यातून गंगाई आपल्या भूमीला पावन करण्यासाठी पृथ्वीवर निःस्वार्थपणे येते आणि सगळ्यांना जीवन देते! ती फक्त देते, घेत नाही कुणाकडून. हे आपल्याला जमलं पाहिजे…

तिच्या बर्फासारख्या पाण्यात तो शिरला आणि तिचा बर्फमय आशीर्वाद घेऊन बाहेर आला.
गोमुखाला पुनःपुन्हा नमस्कार केला. हे गोमुख म्हणजे गंगेच्या बालपणीचा तो काळ… इथे तिला कुणीच अडथळा करीत नाही. आनंदाचं गाणं इथं ती स्वैरपणे गात येते. आणि एखाद्या रूपगर्वितेप्रमाणे आपलं सौंदर्य मिरवत हरिद्वारला पार सपाटीपर्यंत येते! वा ! …एकाएकी तो जीर्णपुरुष दचकला. हे आपले विचार? एवढे सुंदर? हे कुठून आले? की आपल्यापाशी होते? त्या पांढऱ्या ढगाचा उद्देश या स्वर्गस्थ हिमालयात आणून माझी ओळख मला पटवून देण्याचा तर नाही?

आज यात्रेकरूंचा मुक्काम भोजबासलाच होता. दुपारचं जेवण करून सगळे विश्रांतीसाठी पांगले. रात्रीही मुक्काम तिथेच केला. उद्या पुन्हा गंगोत्रीकडे वळायचं होतं. रात्री प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थी दिसले नाहीत. जीर्णपुरुषाची नजर सहज आकाशाकडे गेली. आकाशाचा रंग राखाडी बनला होता. गुलाबपाण्याचा शिडकावा करून पाऊस एकदा हजेरी लावून गेला. त्या विराट शक्तीपुढे तो नतमस्तक झाला. निसर्गाचं हे विराटदर्शन! क्षणभर तो ‘विराटदर्शन’ हा शब्द पुनः पुन्हा ओठ हलवत उच्चारू लागला. हे विराटदर्शन कुठं तरी मी पाहिलं आहे? कुणाचं विराटदर्शन? निसर्गाचं? मानवाचं? परमेश्वराचं? कुणाचं?… आठवेना म्हणून तो अस्वस्थ झाला आणि शांतपणे बसून राहिला.

दुसऱ्या दिवशी सगळ्या यात्रेकरूंबरोबर तो जीर्णपुरुष चार तासानं गंगोत्रीला पोचला आणि बाजूला एकटा जाऊन एका खडकावर बसला. इथे नदीचा प्रवाह रुंद पसरट होता. पाण्याला कमालीचा वेग होता. पुन्हा गंगेचं विराटदर्शन ! त्यानं गंगेत स्नान करून गंगोत्रीच्या मंदिरात जाऊन हात जोडून प्रार्थना केली,

‘माते, माझा संपूर्ण भूतकाळ अंधारात आहे. मला माझ्या पूर्वकालाचं स्मरण येऊ दे. ही माझ्या कपाळावरची सतत वाहणारी जखम कसली? ती लवकर बरी होऊ दे, असा आशीर्वाद दे, माते!’

मिटलेले डोळे त्याने उघडले. मातेला वाहिलेली फुलं हळूहळू पाण्यातून सरकू लागली होती. पुन्हा सगळं शांत! तो देवळातून बाहेर आला व घाटीवर जाऊन बसला. हातात लगेच पत्रावळ आली.

देवीमातेचा प्रसाद होता तो. डोळ्यांच्या कडा ओलावल्याचा भास झाला. डोळ्याला हात लावला. पापण्या ओल्या झाल्या होत्या. त्याने देवीचा प्रसाद नमस्कार करून भक्षण केला. रात्र होईपर्यंत त्या गंगोत्रीच्या परिसरात तो फिरत होता. यात्रेकरू उतरले होते त्या निवासस्थानी, त्या महाभारतावर चर्चा करणाऱ्या प्राध्यापकाच्या ओढीने तो आला. पण आजही ते दिसले नाहीत. एका अर्थी बरंच झालं. अन्यथा माथ्यावरची जखम पुन्हा वाहू लागली असती… असा विचार करून एका कातळावर तो आडवा झाला.

दुसऱ्या दिवशी उत्तरकाशीला परत जाताना पराशरमुनींच्या आश्रमाजवळ, गगनानीजवळ सगळेच थांबले. तिथली मंदिरं पाहू लागले. जीर्णपुरुष मात्र एका मंदिरात खूप वेळ रेंगाळला. ते रुद्रमंदिर होतं. खूप सुंदर मंदिर होतं. प्रशस्त असं सुंदर नक्षीकाम केलेलं. पितळी दरवाजे, त्रिशूळावर तोललेल्या प्रचंड घंटा… एकूणच संपूर्ण वातावरण धीरगंभीर. जीर्णपुरुषाला ते खूपच जवळचं वाटलं.

वातावरणातून एकाएकी आवाज आला,

‘तू साक्षात रुद्राचा अवतार आहेस. ‘

‘कोण, मी?’ जीर्णपुरुष उच्चारला.

पण त्याला प्रतिसाद नव्हता. भास असेल कदाचित, म्हणून तो बाहेर आला. मंदिराच्या बाहेर पंडित वाटाड्या यात्रेकरूंना माहिती देत होता –

‘उत्तरकाशी म्हणजेच महाभारतातील वारणावत. इथेच महापराक्रमी पांडवांसाठी लाक्षागृह बांधून त्यांना जाळून मारण्याचा बेत कौरवांनी केला होता. ‘

जीर्णपुरुषाच्या मस्तकात पुन्हा कळ उठली. अंगावर शहारे आले. प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थी त्या पंडित वाटाड्याजवळ उभे होते. वाटाड्या पुढे म्हणाला,

‘त्या जागेवर आता एक मंदिर आहे. पण आपल्या वेळापत्रकात ते बसत नाही आणि तसं तिथे काहीही नाही. आपण या रुद्रमंदिरात जाऊ.

सगळे रुद्रमंदिरात गेले. जीर्णपुरुष मात्र विजेच्या वेगाने चालत वारणावताच्या मंदिरात गेला.
पांडवांच्या स्मरणार्थ बांधलेलं त्यांचं मंदिर. मोठ्या मनोभावे जीर्णपुरुषाने त्या मंदिराला हात जोडले. प्रदक्षिणा घालताना वारणावत, कौरव, पांडव, लाक्षागृह ही सगळी नावं त्याचे ओठ पुटपुटत होते.

महाभारत त्याची पाठ सोडत नव्हतं.

तिथून तो तड़क निघाला.

आज मुक्काम तिथेच होता.

उद्या केदारनाथाकडे जायचं होतं.

रात्रीचं जेवण झाल्यावर त्याचं लक्ष प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांकडे गेलं. वारणावतावर ते चर्चा करत होते. नंतर प्राध्यापकांनी बोलायला सुरुवात केली ती महाभारतातील प्रमुख स्त्रियांवर. मधल्या काळात प्रचंड थंडीमुळे तो त्यांचा विषय अर्धवट राहिला होता. प्राध्यापकांनी आपल्या ज्ञानपूर्ण समीक्षेला सुरुवात केली —

‘जन्मांध पतीला दृष्टिसुख पारखं झालं म्हणून आपणही दृष्टीसुखाचा आजन्म त्याग करणारी गांधारी, आपल्या पुत्राचा दुर्योधनाचा कठोर शब्दांत निषेध करते. राज्याचा अधिकार युधिष्ठिराचा आहे, हे ती स्पष्ट सांगते. शकुनी तिचा सख्खा भाऊ. या कलिपुरुषाला राज्यातून हद्दपार करण्याचा सल्लाही ती त्याला देते. द्यूतात कपटाने लुबाडलेली संपत्ती आणि आपलं नसलेलं राज्य शेवटी विनाशाला कारण होतं. ‘शमेन धर्मेण नयेन युक्ता या जे बुद्धिः सा ऽस्तु ते, मा प्रमादी: । प्रध्वंसिनी क्रूरसमाहिता श्रीर्मृदुप्रौढा गच्छन्नि पुत्रपौत्रान् ।।’ अर्थात कर्ण, शकुनी, दुःशासन यांच्या चिथावणीने दुर्योधन आपल्या मातेचा कोणताही उपदेश ऐकत नाही. युद्ध सुरू होण्याच्या आधी दुर्योधन मातेचा आशीर्वाद घ्यायला येतो. तेव्हा ती म्हणते, ‘यतो धर्मस्ततो जयः ।’ हे एका मातेचं उत्तर नसून सत्यनिष्ठ, न्यायनिष्ठ गांधारीचं आहे. विनाश टाळण्यासाठी सत्यनिष्ठ, न्यायनिष्ठ गांधारी, धर्मराज आणि कृष्ण या तिघांनी प्रयत्न करून पाहिले, पण ज्यांनी आजन्म दुःख भोगलं आहे, त्या कुंती आणि द्रौपदीने समेट घडवून आणण्यास तीव्र विरोध केला!

आता कुंती ही यादव कुलातील एक राजकन्या. पांडूशी विवाह होऊन कुरुकुलात आलेली दुर्देवी स्त्री. बालपणीच तिला कुंतिभोज राजाला दत्तक दिली. एकदा दुर्वास ऋषी आले. कुंतीने त्यांची खूप सेवा केली. तिच्या सेवेने तृप्त होऊन दुर्वासांनी तिला एक मंत्र दिला. ज्या देवतेच्या नावाने या मंत्राचं आवाहन केलं जाईल ती देवता प्रसन्न होऊन तेजस्वी पुत्र तिच्या ठिकाणी निर्माण करील, असा अनमोल मंत्र देऊन दुर्वास निघून गेले. एके दिवशी तिने कुतूहल म्हणून सूर्याला आवाहन केलं. यातून सूर्यपुत्र कर्ण जन्माला आला. कौमार्यातच पुत्रजन्म झाल्यामुळे तिने ते बालक एका करंडीत ठेवून नदीत सोडलं. अधिरथ या कौरवांच्या सारथ्यास ते बालक सापडलं. पुढे हा सूतपुत्र कर्ण या नावाने सर्वश्रुत झाला. पुढे पांडूशी तिचं लग्न झालं. पांडू कुंती, माद्री या दोन्ही स्त्रियांसह हिमालयात गेला. त्याला मृगयेचं वेडच होतं. त्यातच त्याचा अंत झाला. मृगरूपात स्त्रीशी रत झालेल्या कदंब ऋषीची त्याने हत्या केली, तेव्हा ऋषीने त्याला शाप दिला, ‘ज्या क्षणी तू स्त्रीसुखात रत होशील त्या क्षणी तुला मृत्यू येईल.’ यापुढे आपण संतती निर्माण करू शकत नाही म्हणून त्यानं कुंतीला नियोगाने संतती निर्माण करण्यास सांगितलं. कुंतीला जुन्या मंत्राची आठवण झाली. मंत्राचा जप करून कुंतीने तीन पुत्र निर्माण केले. तेच युधिष्ठिर, भीम, अर्जुन. यमधर्म, वायू आणि इंद्र यांच्यापासून तीन पांडव जन्माला आले. आणि त्याच मंत्राने माद्रीला नकुल आणि सहदेव हे पुत्र प्राप्त झाले. एकदा वनात संचार करताना पांडूला माद्रीचा मोह झाला आणि तिच्याशी समागम करताना त्याला ते शापमरण आलं. माद्री त्याच्याबरोबर सती गेली.

कुंती पाचही पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास आली आणि तिच्या जीवनातील दुसरं यातनायुग सुरू झालं. बालपणापासून सुरू झालेलं यातनायुग कधीच संपलं नाही. महायुद्धाच्या आधी युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाई करण्यासाठी आलेला कृष्ण आधी कुंतीला भेटला. संपूर्ण पूर्वायुष्यातील दुःखभोगाच्या स्मृती जागृत होऊन कृष्णाच्या गळ्याला मिठी मारून ती ओक्साबोक्शी रडू लागली. अनेकविध वेदनादायक कल्पनांनी अस्वस्थ झाली. तिने कृष्णाला निक्षून सांगितलं,

‘माझ्या पुत्रांना क्षात्रधर्माची आणि द्युताच्या वेळी केलेल्या प्रतिज्ञांची आठवण करायला सांग.’

याचाच अर्थ, कुंतीला सूड घ्यायचा होता. मात्र युद्ध संपल्यावर तिला वैराग्याची ओढ लागली.
पांडवांची राजमाता म्हणून सुखाचा उपभोग घेण्याची तिची इच्छा निमाली. शोकात्म जीवनात समाधान प्राप्त होऊन एक प्रकारच्या उदात्त समधात मनोवृत्तीत ती वानप्रस्थात गेली. ‘

क्षणभर सर थांबले. कुंतीच्या व्यक्तिरेखेत गुंतले असता ते हळवे झाले. जीर्णपुरुषही काहीही न कळता कुठे तरी गलबलला. त्याच्या भावनेच्या स्मृतीत या घटनेची भर पडली. हळूच पुटपुटला,

‘माता कुंती, माता गांधारी…’ एवढ्यात सर पुढे म्हणाले,

‘महाभारत या शोकात्म महाकाव्याची महानायिका अग्निशिखा पांचाली, द्रौपदी!’

जीर्णपुरुषाच्या अंगावरून सरसरून काटा आला आणि तो थरथरू लागला.

‘द्रौपदी…’ ओठ हलले.

सरांनी घेतलेला छोटा स्वल्पविराम संपला आणि ते पुढे बोलू लागले. ‘द्रौपदी आजन्म दुःखभोगासाठीच जन्माला आली असावी. ही रूपगर्विता, मानी, बुद्धिमान, तेजस्वी. तिच्या सर्वांगाला नीलकमलाचा सुगंध होता. ती पांचाली सहजप्राप्य नव्हती. तिच्या स्वयंवरासाठी लावलेला मत्स्यभेदाचा पण. त्या काळात सर्वश्रेष्ठ म्हणून मान्यता पावलेले दोन धनुर्धारी होते: एक अर्जुन आणि दुसरा कर्ण. स्वयंवराच्या अटीप्रमाणे ‘कुलेन रूपेण बलेन युक्तः’ अशा वीरालाच माझी बहीण माळ घालेल, असं दृष्ट्यद्युम्नाने घोषित केलं असलं, तरी सूतपुत्र कर्ण धनुष्याची प्रत्यंचा जोडून बाण लावण्यासाठी पुढे आला. द्रौपदीने ‘मी सूतपुत्राला वरणार नाही’ अशी घोषणा केल्याने अवमानित झालेला कर्ण परत आपल्या जागी गेला. द्रौपदीची वरील घोषणा प्रक्षिप्त मानली असली तरी ‘कुलेन’ हा शब्द मूळ अटीत होताच. ब्राह्मणाच्या वेषातल्या अर्जुनाने मत्स्यभेद करून तिला जिंकून घरी आणलं. भिक्षा पाचांत वाटून घ्या हे कुंतीने न बघता सांगितलं आणि द्रौपदी पांडवांची पत्नी झाली. राजसूय यज्ञ होईतोपर्यंत जे काही थोडंफार सुख मिळालं असेल तेवढंच. युधिष्ठिराच्या द्यूतक्रीडेपासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दुःखाने तिचा पाठलाग सोडला नाही. कौरव-पांडवांच्या स्पर्धेचं मध्यवर्ती केंद्र राजसत्ता हेच होतं. आता राजसभेतील द्रौपदीच्या विटंबनेचा सूड हे पण महत्त्वाचं केंद्र बनलं. द्युतात धर्मराज द्रौपदीसह सर्वच हरला. रजस्वला, एकवस्त्रा द्रौपदीला दुःशासनाने सभेत खेचत आणलं. त्या प्रसंगी त्या अलौकिक रूपसौंदर्यवती तेजस्वी बुद्धिमान द्रौपदीने बिनतोड आणि पांडित्यपूर्ण युक्तिवादाने सर्व सभेला विस्मित करून सोडलं. भीष्म, विदुरासारखे सभासदस्यही आवाक झाले. दुसऱ्या बाजूला दुर्योधन, कर्ण यांच्या प्रेरणेने दुःशासन कुरुकुलातील वधूला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यांना प्रतिकार करण्याचे धाडस कुणातही नव्हतं. तेव्हा द्रौपदी विलक्षण क्रोधाने ओरडली

धिगस्तु नष्टः खलु भारतानाम् धर्मस्तथा क्षत्रविदांच वृत्तम् ।
यत्र हृतीतां कुरुधर्मवेलां प्रेक्षन्ति सर्वे कुरवः सभायाम् ।
द्रोणस्य भीष्मस्य च नास्तिसत्वक्षत्तुस्तथैवाऽस्यं महात्मनोपि ॥
राज्ञस्तथाही मम धर्ममुग्रं न लक्षयन्ते कुरुवृद्धमुख्याः ॥

सभापर्वातील ही वेदनादायक घटना पुढील सर्व विनाशाच्या मूलस्थानी आहे. सभेतील ज्येष्ठ पुरुषांनी, तत्त्वचिंतकांनी, गांधारीसारख्या निःस्पृह राज्ञीनं आपल्या सत्त्वशून्य वृत्तीनं नैतिक न्यायाचा येथे भंग केला आहे. हा महान प्रमाद पुढील सर्व शोकात्म घटनांच्या विनाशाला कारणीभूत झाला. द्रौपदीच्या दुःखभोगाला येथून गती मिळते. तसेच विराट नियतिचक्राच्या गतीला येथूनच वेग येतो. सर्वच व्यक्ती नियतिचक्राला बांधलेल्या आहेत. राजसत्तेचा लोभ हे भारतीय युद्धाचं मध्यवर्ती केंद्र असलं तरी येथे द्रौपदीच्या विटंबनेमुळे भारतकथेला एक वेगळा आयाम प्राप्त झालाय. भीम, अर्जुन या पांडववीरांनी सूडाची प्रतिज्ञा करून भारतीय महायुद्धाला व्यापक, सर्वंकष विनाशाचं युगान्ताचं रूप दिलं. द्रौपदीचा जन्मच यज्ञकुंडातून विश्वसंहारासाठी झाला आहे. व्यासांनी द्रौपदीची विटंबना मानवी पातळीवर चित्रित करून सर्वंकष विनाशाला मानवाच्या हातून घडणारे प्रमादच कारणीभूत होतात हे लौकिक सत्य प्रस्थापित केलं आहे. ‘

सर हसले आणि म्हणाले, ‘हे सगळं ऐकून खिन्न वाटतं. चला विश्रांती घेऊ या. आणि यानंतर अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलू जो स्वत:च म्हणतोय, ‘निकृत्योपचरन् वध्यं एष धर्मसनातनः’ महाभारताचा सूत्रधार श्रीकृष्ण !’

म्हणत सर उठले.

विद्यार्थी उठले, स्तब्धपणे विचार करीत रुमकडे वळले.

जीर्णपुरुषाची अवस्था हे ऐकून वेड्यासारखी झाली होती. त्याच्या हाताच्या मुठी वळल्या होत्या.
‘केव्हा वळल्या? द्रौपदीची विटंबना ऐकून की, महाभारताच्या सूत्रधाराचं नाव ऐकून? केव्हा?’ हळूहळू मुठी सैल झाल्या. जखम वाहू लागली आणि हळूहळू पावलं नदीकडे वळू लागली.

उत्तरकाशीपासून केदारनाथासाठी प्रवास सीतापूरच्या दिशेने सुरू झाला. बारा तासांचा प्रवास जीर्णपुरुषानं यात्रेकरूंच्या कृपेनं केला. संध्याकाळच्या सुमारास बसमधून सगळे उतरले. वाटाड्या बोलू लागला,

‘हे रुद्रप्रयाग. केदारनाथाहून येणारी मंदाकिनी आणि बद्रीनारायणाहून येणारी अलकनंदा यांचा संगम याच रुद्रप्रयागापाशी होतो. या संगमाला प्रयाग असे म्हणतात. इथून दोन वाटा फुटतात. एक वाट जाते केदारनाथाकडे आणि दुसरी बद्रीनारायणाकडे. बसमध्ये बसा. आपण प्रथम पूल ओलांडून बद्रीनारायणाकडे जाणार आहोत.’

सगळे बसमध्ये बसले. दोन तासांनी सीतापूरला पोहोचले. लहानसं गाव. तिथेच यात्रेकरूंची राहण्याची सोय केली होती. यात्रेकरू आपापल्या रुमकडे गेले.

संध्याकाळला सुरुवात झाली होती. सारी वस्ती दाट झाडीने वेढलेली होती. एक मनस्वी गारवा आणि पाठीमागे मंदाकिनी नदीचं अखंड गायन. अंधार पडला आणि हळूहळू वातावरण गूढ होऊ लागलं. जीर्णपुरुषाचे ओठ निसर्गाचे बदलते स्वरूप पाहून पुटपुटले,

‘जेथे गूढ आहे तेथे मी असतो, आहे, राहणार.’ क्षणभर ओठ दचकून थांबले. प्रतिप्रश्न आला,

‘कोण तू? कोण? ‘

उत्तर स्तब्ध झालं. फक्त मंदाकिनीने तिची सम बदलली. जीर्णपुरुषाच्या कानाला तो फरक जाणवला. त्याने आकाशाकडं पाहिलं, आणि पुन्हा त्याचे ओठ हलू लागले. ही सगळी यात्रा हिमालयातच फिरवण्याचा त्या पांढऱ्या शुभ्र ढगाचा काय हेतू असेल? एक मात्र खरंय की मला माझं अस्तित्व सोडून निदान भावनेची जाणीव मात्र हळूहळू होत चाललीय. कदाचित हीच जाणीव अस्तित्वही शोधून देईल. हाच हेतू नियतीचा तर नाही ना?

मंदाकिनीने पुन्हा आपली सम बदलली आणि दुसरा प्रसन्न राग आळवायला सुरुवात केली.
जीर्णपुरुषाची पावलं तिच्या दिशेने वळली आणि त्या पाण्यात रात्रभर तो मंदाकिनीचं संगीत ऐकत बसला.

सकाळी सगळे यात्रेकरू गौरीकुंडाकडे आले. तिथे येण्याआधी त्रिजुगी नारायण आहे, तिथे थांबले. वाटाड्याची गोड रसवंती सुरू झाली. जीर्णपुरुषही ती ऐकण्यात सामील झाला. ‘या त्रिजुगी नारायण इथे शंकर पार्वतीचा विवाह झाला होता. त्या वेळचा होमकुंड येथे प्रातिनिधिक स्वरूपात ठेवला आहे. इथून जवळच सोमप्रयाग आहे. तेथे शीर नसलेल्या गणपतीची मूर्ती आहे. त्याला ‘मुंडाकट गणपती’ म्हणतात. पार्वतीने आपल्या मळाने गणपती बनवला आणि द्वारपाल म्हणून त्याची नियुक्ती केली. त्याने शंकरालाही पार्वतीस भेटण्यास मनाई केली. शंकराने त्याचं शीर छाटलं म्हणून सरकटा गणपती. त्यानंतर त्या मूर्तीला गजाचं शीर बसवलं तो गजानन आणि शिवपार्वती हे मंदिर इथे आहे.

त्रिजुगी नारायणानंतर लगेच गौरीकुंड, समुद्रसपाटीपासून सहा हजार पाचशे फुटांवर आहे. सर्वांनी मनोभावे पूजा केली, प्रार्थना केली आणि सगळ्यांनी केदारनाथाचा पहाड चढण्यास सुरुवात केली. काही घोड्यावर, काही चालत, काही पालखीतून चालले होते.

जीर्णपुरुष वाऱ्याच्या वेगाने अवघड अशी गरुडचट्टीचा टप्पा करून पुढे गेला. त्याला समोर मंदिर दिसलं. जसजसा तो पुढे जाऊ लागला तसतसं मंदिर अधिकच नजरेत भरू लागलं. मघापासून मनात घोंघावणारं विचारांचं मोहळ शांत झालं. मंदिराच्या मागे बर्फाने भरलेल्या डोंगरांची रांगच रांग पसरली होती. जणू त्या बर्फाच्या रांगेला केदारनाथ लोडाला टेकून बसले होते आणि समोर मंदाकिनी त्यांची पाद्यपूजा करत बसली होती. संध्याकाळचे आवाज करणारे वारे जणू केदारनाथांची आरतीच करीत होते. यात्रेकरू बरेच दूर राहिले होते. जीर्णपुरुषाने एकवार आकाशात गर्दी करणाऱ्या ढगांकडे पाहिलं आणि हात जोडले आणि पुन्हा मंदिराकडे पाहून त्याचे ओठ पुटपुटले…

‘न केदारात्परस्थानं न केदारत्पर तपः ।
न केदारात्परी मोक्षः स्वयंदैवेन भाषितम् ।।’

या पुटपुटण्याने तो स्वत:च दचकला. विचारात पडून स्वत:लाच त्याने प्रश्न विचारला, ‘ही भाषा कुठली? मी कुंठे शिकलो? कोठून आली माझ्या तोंडात? हीच भाषा होती माझी? …

पुन्हा संभ्रम! संभ्रम अवस्थेची दरी आता अधिकच वाढू लागली. एवढ्यात धाप लागलेल्या स्वरातला वाटाड्याचा आवाज येऊ लागला —

‘हे महापराक्रमी पांडवांनी बांधलेलं चिरेबंदी मंदिर आहे. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे समुद्रसपाटीपासून अकरा हजार सातशे साठ फूट उंचावर बर्फाने वेढलेलं आहे. त्याचं नाव केदारनाथ यासाठी ठेवलं, कारण सत्ययुगात केदारनाथ नावाचा राजा होता. त्याने त्या ठिकाणी शंकराची तपश्चर्या केली. म्हणून केदारनाथ हे नाव. पांडवांनी इथेच मंदिर का बांधलं याची कथा महाभारतात अशी आहे – महाभारताच्या भारतीय महायुद्धात पांडवांच्या हातून बरीच मनुष्यहत्या झाली. ती पण आपल्याच बांधवांची. कौरवांची त्यांनी हत्या केली. तेव्हा त्यातून पापमुक्त होण्यासाठी व्यासमुनींनी त्यांना हिमालयात जाऊन शंकराची तपश्चर्या करण्यास सांगितली. हिमालयात हिंडताना पांडवांना एके ठिकाणी खूप रेडे दिसले. रेड्याच्या रूपात शंकरच साक्षात दर्शन देणार या शंकेने भीमाने मोठ्या खडकावर पाय ठेवून आपल्या पायामधून सहदेवाला एक एक रेडा सोडायला सांगितलं. रेडा पायांतून जाईना, तेव्हा भीमानं रेड्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रेडा तिथे जमिनीत घुसला. भीमाने त्याची पाठ पकडली. ती ही जागा! पांडवांनी तेथील राजाच्या मदतीने इथे शंकराचं मंदिर बांधलं; तोच हा केदारेश्वर! जमिनीत घुसलेला रेडा जिथून बाहेर येतो तेथे पशुपतिनाथांचं मंदिर आहे. ते नेपाळमध्ये आहे. चला, आधी केदारनाथाचं दर्शन घेऊ या. ‘

सर्व यात्रेकरूंसह जीर्णपुरुष मंदिराकडं वळला. आता हिमालय त्याला अधिक ओळखीचा वाटू लागला. चालता चालता वाटाड्या पुन्हा बोलू लागला, ‘इथे पंचनद्यांचा संगम आहे. मंदाकिनी, सरस्वती, क्षीरगंगा, स्वर्गद्वारी, महोदधी. या सगळ्यांचा मिळून जो प्रवाह तो मंदाकिनी. तो केदारनाथ इथून वाहतो. दिवाळीच्या पाडव्याला केदारनाथाचं मंदिर बंद होतं. ते सहा महिन्यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दर्शनासाठी खुलं करतात. हिमालयातील मनुष्यवस्तीचं हे शेवटचं ठिकाण आहे.’

जीर्णपुरुष चौथरा चढून केदारनाथ मंदिराच्या मुख्य मार्गाने देवळात सर्वांआधी पोचला. मंदिर अतिशय प्राचीन, भव्य होतं. भितींवर कोरलेला एकेक चेहरा तो पाहत गेला. सगळे चेहरे ओळखीचे होते. त्याच्या मनात विचार आला की… या काळात तर मी नव्हतो ना? त्याला किती हजार वर्षं झाली? मी हजारो वर्षांपूर्वीचा तर नाही ना?… त्याचा विचार मनातच खुंटला. कारण वाटाड्या ओरडला,

‘हा बाहेर वरच्या बाजूला आहे तो धर्मराज. आणि आत सभामंडपात या, हे पाहा – ही पांचाली
द्रौपदी, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव.’

सर्व यात्रेकरू हळूहळू पुढे सरकत होते. जीर्णपुरुष मात्र शांतपणे एका एका चेहऱ्याशी रेंगाळत चालत होता. सगळी शिल्पं काळ्या पाषाणातली होती. प्रत्येक चित्र तो अत्यंत बारकाईने पाहत उभा होता. पुन्हा मनात विचार आला… हे सगळे माझेच आहेत. अगदी बालपणापासून मी यांच्याबरोबर खेळलो आहे. पण कुठे? इथे? केव्हा?… काही केल्या त्याचा भ्रम दूर होईना. एवढ्यात भीमाचं शिल्प त्याच्यासमोर आलं. त्याचे ओठ नकळत हलले. पराक्रम आणि उग्रतेचा प्रत्यय देणारा त्याचा चेहरा त्याला अधिकच भयावह वाटला. मनात परत विचार आला, याला मी घाबरत होतो?

एवढ्यात वाटाड्या ओरडला,

‘चला, चला. ही पाहा लक्ष्मीची मूर्ती आणि हा मंदिराबाहेर भव्य नंदी. आत या. समोरच्या गाभाऱ्यात केदारनाथ आणि त्याच्या शेजारी माता पार्वती. ‘

जीर्णपुरुषाचे हात जोडले गेले. सर्वत्र दीप पेटवले होते. धूप जळत होता. त्याचा सुवास आत्मानंदाचा अनुभव देत होता. डोळे पाण्याने झरू लागले आणि त्याचे ओठ पुटपुटले,

‘महादेवा, तुझं पूजन मी रोज करतोय. मी कोण आहे ते सांग ना, महादेवा. ‘

एक स्तब्धता. मंदिरातून यात्रेकरूंची गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. जीर्णपुरुषाने महर्षी व्यासांचं स्मरण केलं. कधी तरी व्यासपौर्णिमेला व्यासांनी त्याच्या हातावर प्रसाद म्हणून एक सोनचाफ्याची फांदी ठेवली होती आणि त्याला वरदान दिलं होतं, ‘जेव्हा जेव्हा महादेवासाठी तुला फुलं वाहायची आहेत तेव्हा हाताची मूठ घट्ट मिटून स्मरण कर. तुझ्या ओंजळीत ती फुलं येतील.’ जीर्णपुरुषाने दोन्ही हातांची मूठ घट्ट केली. महादेवाचं स्मरण करून ओंजळ उघडली. त्याच्या ओंजळीत ती फुलं होती. सोनेरी-चंदेरी चाफ्यावर पांढऱ्या मोगऱ्याचा ठिपका. ही फुलं हा हिमालय सोडून जगात कुठेच मिळणार नाहीत. हातातल्या ओंजळीतली फुलं त्यानं केदारनाथाला मोठ्या भक्तिभावाने वाहिली. पुनः पुन्हा प्रार्थना केली. केदारनाथ स्तब्ध होता. कदाचित जीर्णपुरुषाच्या प्रार्थनेला त्याच्याकडे उत्तर नसावं. केदारनाथाला डोळ्यांत साठवत, मनात त्याची मूर्ती कोरून जीर्णपुरुष बाहेर आला, तेव्हा तो विलक्षण अंतर्मुख झाला होता. यात्रेकरूंचा आणखी एक मोठा लोंढा आला. जीर्णपुरुष त्याच्या ‘विचारातून बाहेर आला. आज त्याच्या यात्रेकरूंचा मुक्काम तिथेच होता.

सकाळी सहा वाजता सगळे बद्रीनारायणाच्या दिशेने निघाले. प्रवास मोठा होता. मंदाकिनीची सोबत आता संपली होती. जीर्णपुरुष लांब पाय दुमडून विचित्र अवस्थेत बसला होता. एवढ्यात अत्यंत विद्वान वाटाड्याची रसवंती सुरू झाली. आपल्या मधुर पंडिती पण अलंकारी भाषेत तो बोलू लागला,

‘नदी मंदाकिनी मितभाषी, एखाद्या सखीसारखी, गंगा तिच्या दैवी रूपात आपल्याला खिळवून ठेवते. यमुना श्यामल आणि गंभीर प्रकृतीची. पण या सगळ्या हिमालयकन्यांमध्ये अलकनंदा मात्र एकदम वेगळी. तिची प्रकृतीच भिन्न. तिचा जागृत सहवास सतत गर्जना करत, आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करते. अलकनंदा अतिवेगाने धावत जेव्हा खाली येते, तेव्हा एखादी कृद्धकामिनी दिसते. रागावलेल्या सुंदर स्त्रीचं रूप जसं भयंकर भेदक वाटावं तसं अलकनंदेचं स्वरूप दिसतं.

‘तिचा उगम बद्रीनारायणाची वसुंधरा आहे तेथे झालाय. या ठिकाणी अलकनंदा तिबेटहून भारताच्या हद्दीत शिरते आणि चारशे फुटांवरून स्वत:ला झोकून देते. चौदा हजार फुटांवर हे ठिकाण आहे. तिथे व्यासगुंफा आहे. ‘

जीर्णपुरुष हे सगळं तन्मयतेनं ऐकत होता. व्यासगुंफेचं नाव काढल्यावर त्याने कान टवकारले.
त्याचं स्थान आलं होतं. पण एवढ्यात त्याला या यात्रेकरूंना सोडायचं नव्हतं. कारण त्याचा वाटाड्या तो ढग, त्याचं त्याला अजून दर्शन झालं नव्हतं. पंडित वाटाड्या जे सांगत होता, जे मार्गदर्शन करत होता, त्यात जीर्णपुरुषाचा कधी तरी सहभाग होता याची त्याला खात्री होती.
वाटाड्या पुढे बोलू लागला,

‘याच व्यासगुफेत व्यासांनी श्री गजाननाला महाभारत लिहिण्यास सांगितलं. त्याला बरोबर पाच हजार एकशे अकरा वर्षं झाली. ‘

क्षणभर यात्रेकरूंमध्ये कुजबुज झाली. महाभारताचे अभ्यासक प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थी कुजबुजू लागले. जीर्णपुरुषाच्या उपकारकर्त्या आपटे पति-पत्नीने हात जोडले. पंडित वाटाड्या पुढे बोलू लागला, ‘देव प्रभागपाशी अलकनंदेचं गंगेशी मीलन होतं आणि अलकनंदेच्या रागाचा सगळा आवेग ओसरतो!’

स्वत:च्या विनोदावर तो वाटाड्या स्वत:च हसला. रुद्रप्रयागपासून अलकनंदा रस्ता दाखवत होती. वाटेत अनेक नद्या तिच्या हातात हात देत होत्या. रुद्रप्रयाग सोडल्यावर कर्णप्रयाग लागलं. वाटाड्या बोलू लागला, ‘कर्णप्रयाग येथे कर्णावती नदी अलकनंदेच्या हातात हात देते. इथेच महारथी कर्ण सूर्योपासना करायचा.’

जीर्णपुरुषाची क्षणभर अस्वस्थता वाढली. वाटाड्या पुढे बोलू लागला, ‘रस्त्याच्या कडेला त्याचं मंदिर आहे. आता आपण पुढे गेलो की नंदप्रयाग. येथे नंदावती अलकनंदेकडे मैत्रीसाठी हात पुढे करते.’

बस चालत होती. वाटाड्या बोलत होता.

संध्याकाळी चार वाजता बस जोशी मठापाशी आली आणि अंधारून आलं. पाऊस रस्ते ओले करू लागला. घाट उतरल्यावर पुन्हा सांज-प्रकाश. विष्णुप्रयाग लागलं. तिथे विष्णुगंगा नदी आहे. अगदी अलकनंदेप्रमाणे उग्र गर्जना करणारी. विष्णुप्रयागनंतर तासा-दीड तासाच्या अंतरावर एक फाटा जातो, तो गोविंदघाट. तेथे पुढे ‘फुलों की घाटी’ आहे. वाटाड्या हसला आणि म्हणाला,

‘काय गंमत आहे बघा. एकाच हिमालयाच्या गोमुखाच्या वाटेवर एकही फूल दिसलं नाही आणि त्याच हिमालयाच्या कुशीत वेगवेगळ्या फुलांचा रंगीत ताफा आहे… अत्यंत दुर्मिळ असा ।’

जीर्णपुरुषाने केदारनाथाला वाहिलेली सोनेरी – चंदेरी चाफ्यावर पांढऱ्या मोगऱ्याचा ठिपका असलेली फुलं त्याला या विविध आणि अनेक आश्चर्यजनक रंग असलेल्या, सुगंधाचा घमघमाट सुटलेल्या फुलांच्या ताटव्यात दिसली. एवढ्यात वाटाड्या बोलू लागला, ‘आता पुढचा फाटा ओलांडला की पांडुकेश्वर लागते. शेवटच्या महायात्रेत निघालेल्या पांडवांनी इथे शंकराचं मंदिर बांधलं आणि इथूनच पुढे स्वर्गात गेले. ‘

क्षणभर वाटाड्याचा स्वर जड झाला. तसाच जीर्णपुरुषाचा चेहराही दगडासारखा स्थिर झाला.
वाटाड्या पुढे बोलू लागला,

‘पांडवांचे वडील राजाधिराज पंडू महाराज यांना कदंब ऋषींनी शाप दिल्यानंतर महाराज्ञी कुंती आणि महाराज्ञी माद्रीला घेऊन ते इथेच संन्यस्त वृत्तीनं राहत होते. महारथी, महाबलाढ्य अशा पाचही पांडवांचा जन्म येथे झाला. ‘

क्षणभर सगळे यात्रेकरू हळवे झाले. जीर्णपुरुषाची अवस्था विलक्षण वाईट झाली होती. त्याला रडायचं होतं, ओरडायचं होतं; पण त्याचा आक्रोश गळ्याबाहेर आला नाही! त्याच्या ओठांत पुटपुटण्याची पण ताकद नव्हती. वाटाड्या शांतपणे म्हणाला,

‘पांडुकेश्वर हे मंदिर पांडवांनी बांधलं. ‘

जीर्णपुरुषाच्या अंगावर सरसरून काटा आला. तो काटा थंडीचा नव्हता.

पांडुकेश्वराच्या पुढे घाट अधिकच बिकट होत गेला. बस आता अखेरच्या टप्प्यावर आली होती.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बद्रीनारायण आलं. बस थांबली. सगळा परिसर गजबजलेला होता. हिमशिखरं पिवळसर सोनेरी दिसत होती. वाटाड्या सांगू लागला,

‘पाहा, उजव्या बाजूला हा नारायण पर्वत, तर डावीकडे नीलकंठ पर्वत आणि मध्ये बद्रीनारायण. अलकनंदा नदीच्या पलिकडे बद्रीनारायण तर एकीकडे नरपर्वत.

‘जीर्णपुरुष पटकन पुटपुटला, ‘नर आणि नारायण.

वाटाड्या पुढे म्हणाला, ‘चौदा हजार दोनशे फुटांवर लोकपालतीर्थ आहे. हे विष्णूचं वसतिस्थान आहे. जवळच अलकापुरी आहे. चौदा हजार फुटांवर केशवप्रयाग आहे. नारदमुनींच्या आदेशावरून तिथे व्यासमुनींनी अठरा पुराणं लिहिली. त्यानंतर व्यासांनी ‘भागवत’ या श्रीकृष्णचरित्र ग्रंथाची रचना केली. आणि बद्रीनारायण वसुंधरा इथे व्यासांनी महाभारताची रचना केली. एक लक्ष श्लोकांचा सर्वांत मोठा ग्रंथ ! हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचं आर्षमहाकाव्य आहे. त्याचं लेखन याच परिसरात झालं. बद्रीनारायणापाशीही गरम कुंडं आहेत. एवढे गरम कुंड कसे तयार झाले याची एक कथा आहे. भृगु ऋषींच्या पत्नीवर एका राक्षसाची वाईट नजर गेली. मुनिवर्य भृगूंना ही घटना कळली. त्यांनी त्यांच्या कुटीतच असणाऱ्या अग्नीला ही गोष्ट विचारली आणि त्याला शाप दिला, ‘यापुढे तू दिसेल त्याचे भस्म करशील!’ अग्नी घाबरून व्यासमुनींकडे आला. व्यास चिरंजीव असल्यामुळे अग्नी त्यांचं भस्म करू शकला नाही.’

‘चिरंजीव’ हा शब्द जीर्णपुरुषाच्या डोक्यात स्वत:बद्दलही घुमला.

क्षणभर थांबलेला वाटाड्या पुढे म्हणाला,

‘व्यासांनी अग्नीला बद्रीनारायण येथे बद्रीनारायणाची तपश्चर्या करण्यास सांगितलं. अग्नी तपश्चर्या करून शापमुक्त झाला आणि जलरूपाने तिथेच राहिला. म्हणून कुंडातलं पाणी गरम असतं आणि यात स्नान केल्यावर पापमुक्ती मिळते. माझ्या यात्रेकरू मित्रांनो, आज आपला मुक्काम इथेच तोदी निवासात आहे. तेव्हा थोडी विश्रांती घेऊन हा परिसर फिरा. ‘

यात्रेकरू निवासाकडे घाईघाईने गेले.

जीर्णपुरुष कुंडात स्नान करण्यास गेला. पापमुक्तीची प्रार्थना तो पुनःपुन्हा करू लागला. पण आपण काय पाप केलंय हे त्याच्या लक्षात येईना. याचना करून तो कुंडाबाहेर आला आणि बद्रीनारायणाच्या मंदिरासमोर उभा राहिला. विस्फारित नजरेने त्या भव्य मंदिराकडे पाहू लागला. त्या भव्य मंदिराच्या प्रवेशद्वाराला लाल बुट्टी असणारी मेघडंबरी होती. आत मध्यभागी गरुडाची भव्य मोठी मूर्ती. त्या मूर्तीमुळे काळ्या पाषाणाचं मंदिर उठून दिसत होतं. त्याच्या आत तीन फुटांची शालिग्राम शिळेची उंच मूर्ती आहे. त्यावर सोन्याचा रत्नजडित मुकुट आहे. डावीकडे चौरीधारी लक्ष्मी आहे. जवळच नारायण आहे. त्याच्या डावीकडे कुबेर, गणपती यांच्या मूर्ती आहेत. सर्व सभामंडप काळ्या मूर्तींनी सजवला आहे. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना जयविजय आहेत.

जीर्णपुरुषाने मनोभावे बद्रीनारायण आणि सगळ्या देवदेवतांची प्रार्थना केली, ‘हे देवा! परमेश्वरा, मला या संभ्रम अवस्थेतून बाहेर काढ. माझ्या अस्तित्वाची मला जाणीव करून दे आणि कुठल्याही जन्मात मी केलेल्या पापापासून मला मुक्ती दे! मला मुक्ती दे.’

हे बोलताना तो विलक्षण हताश, हतबल झाला होता. एवढ्यात तिथल्या गुरुजींनी त्याच्या हातावर प्रसाद ठेवला. तो अत्यंत भाविकतेने ग्रहण करून तो मंदिराबाहेर आला. ज्या पांढऱ्या ढगाने त्याला अस्तंबा सातपुड्यापासून बद्रीनारायणापर्यंत आणलं ते अंतर पायवाटेने चालत एक हजार आठशे एकसष्ट किलोमीटर होतं. त्याचा वाटाड्या पांढरा ढग आभाळात त्याची वाट पाहत उभा होता.

मंदिराच्या बाहेर येऊन, घाटाच्या पायऱ्या उतरून जीर्णपुरुष खाली आला. समोर त्याचे सगळे ओळखीचे यात्रेकरूंचे चेहरे! सगळ्यांना त्याने हात जोडून, त्यांचे सगळ्यांचे उपकार स्मरून कृतज्ञतापूर्वक त्यांचा खुणेने निरोप घेतला. आपटे दांपत्याचा निरोप घेताना त्याचे डोळे ओले झाले. मनात विचार आला की, कधी जर तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी परमेश्वराने दिली तर जरूर भेटेन. नमस्कार! माझी यात्रा इथे संपली. म्हणून तो झटकन पाठमोरा वळला.

सगळे यात्रेकरू त्याच्या पाठमोऱ्या महाकाय आकृतीकडे पाहत उभे होते. आपटे आजींना राहवेना.

त्या मोठ्याने म्हणाल्या,

‘तो कोण होता माहीत आहे तुम्हाला? त्याला आम्ही सुरुवातीपासूनच ओळखला होता. तो
महाभारतातला…’

पुढचे शब्द बद्रीनारायणाच्या प्रचंड घंटानादात विरून गेले. तिथल्या यात्रेकरूंना ते शब्द ऐकायला आले. विस्फारित नजरेने यात्रेकरू तसेच बराच काळ थिजून उभे होते… एखाद्या पाषाणासारखे.

व्यासांचा आश्रम बद्रीनारायणाजवळ वसुंधरेकडे आहे. जीर्णपुरुष झपाट्याने केशवप्रयागच्या जवळच असलेल्या वसुंधरा नदीकडे जाऊ लागला. हा रस्ता त्याच्या परिचयाचा होता. कारण दर व्यासपौर्णिमेला त्याला इतर पाच चिरंजीवांबरोबर – हनुमान, बळी, बिभिषण, कृपाचार्य, परशुराम यांच्या समवेत हजेरी लावावी लागे. तिन्हीसांजेला तो व्यासांच्या आश्रमासमोर येऊन उभा राहिला आणि चिरंजीव व्यासांच्या आश्रमावर जो श्लोक लिहिला होता त्यावर त्याची नजर गेली. जीर्णपुरुषाला वाचा फुटली. जीर्णपुरुष तो श्लोक वाचू लागला…

ऊर्ध्वबाहू विरोम्येष न च कश्चिच्छृणोति मे।
धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते ॥

त्याचा आवाज ऐकून व्यासमुनी बाहेर आले. त्यांचा कृष्णवर्ण, पिंगट जटा, पोटापर्यंत वाढलेली पांढरीशुभ्र दाढी आणि करडा आवाज गर्जून सांगू लागला –

‘चिरंजीवा, मी येथे बाहू उभारून ओरडून सांगतो आहे, पण माझं कुणीच ऐकत नाही ! धर्मापासून अर्थ व काम प्राप्त होतात, मग तुम्ही तो धर्म का बरं आचरत नाही? ‘

जीर्णपुरुष व्यासांसमोर विनम्र भावाने हात जोडून उभा होता. आश्रमाच्या दारात उंचसडक जटा बांधलेली व्यासांची प्रेमळ मूर्ती जीर्णपुरुषाकडे पाहत दाढीतच हसली आणि त्याचं स्वागत करून म्हणाली, ‘ये चिरंजीवा, आज व्यासपौर्णिमा नसताना तुला इथे आणण्यामागे नियतीचा, महादेवाचा मोठा आशीर्वाद आहे. तो पांढरा ढग त्याचाच दूत आहे. ये, आत ये,’ म्हणत, आश्चर्याचा विलक्षण धक्का देत स्वतः चिरंजीव असलेल्या व्यासांनी दुसऱ्या चिरंजीवाचा हात धरून त्याला आश्रमात नेला आणि मृगजीनावर आसनस्थ होण्यास आज्ञा केली. त्यांच्या एका शिष्याने गंगाजलाचं पात्र भरून त्यास पिण्यास दिलं. ते पाणी मोठ्या भक्तिभावाने प्राशन करून तो नम्रपणे हात जोडून व्यासांसमोर बसला. व्यास त्याच्याकडे मायेने, करुणेने पाहत म्हणाले,

‘चिरंजीव, गेली हजारो वर्षं तू इतर चिरंजीवांबरोबर आषाढी पौर्णिमेला येतोस. त्यालाच आजचं पंचाग व्यासपौर्णिमा म्हणतं. जेव्हा येतोस तेव्हा तू कधीच काहीही बोलत नाहीस, पण आज तुझी संभ्रम-अवस्था समाप्त झालेली दिसते.’

त्यांना मध्येच थांबवत तो जीर्णपुरुष म्हणाला, ‘क्षमस्व गुरुदेव, माझी संभ्रम अवस्था संपली नाही, उलट या हिमालयाच्या परिसरात ती अधिकच वाढली. ‘

व्यास हसत म्हणाले, ‘तू माझ्या आश्रमाच्या द्वारावरचा श्लोक वाचलास म्हणून म्हणालो. आज तू प्रथमच तो श्लोक वाचल्यावर त्याचा अर्थही तुला कळला.’

जीर्णपुरुषाने सकारात्मक मान हलवली. व्यास पुढे म्हणाले,

‘अर्थ आणि काम यांचा उपयोग धर्माच्या नीतीच्या आश्रयाने घ्या. पण माझं कुणीच ऐकत नाही. हजारो वर्षांपूर्वीही कुणी ऐकलं नाही. आणि आता तर सर्वत्र भ्रष्टाचार माजलाय. इथूनच नियतीच्या अज्ञाताचा प्रांत सुरू होतो. जो प्रांत, जो प्रवास अतिप्राचीन काळापासून आजपर्यंत तुझाही चाललाय. ‘

क्षणभर व्यास थांबले. जीर्णपुरुष बावचळला. त्याच्या डोळ्यांत खोलवर पाहत व्यास म्हणाले,

‘या प्रवासाचे सोबती पूर्वी भीष्म, धृतराष्ट्र, त्याचे शंभर पुत्र, कर्ण, कुंती, द्रौपदी, पाच पांडव, तुझा पिता आचार्य द्रोण, आणि शेवटी श्रीकृष्ण. हे सारेच विराट नियतिचक्राला, कालचक्राला बांधलेले होते. नियतिचक्र गतिमान होताच, दोन्ही कुलांचा दारुण विनाश होऊन युगान्त झाला.

‘व्यास क्षणभर थांबले तेव्हा जीर्णपुरुष म्हणाला, ‘आचार्य, आपण महाभारत या महाकाव्यरूपी ग्रंथाचे कर्ते आहात, होय ना?’

व्यास म्हणाले, ‘तसं म्हण हवं तर, पण या साऱ्या नियतिचक्राचा साक्षीदार मात्र मी जरूर आहे. ‘ पुढे गंभीरपणे म्हणाले, ‘मी एकटाच साक्षीदार नाही, तर तू देखील आहेस. आणि घडलेल्या युगान्ताचा एकमेव जिवंत अवशेष आहेस. ‘

जीर्णपुरुष प्रचंड हादरला. आणि मोठ्याने ओरडला, ‘हे मला कसं आठवत नाही? कोण आहे मी? ‘

व्यास पुन्हा हसत म्हणाले, ‘त्यासाठीच नियतीने तुला हिमालयाची यात्रा घडवून माझ्यासमोर आणलंय. चिरंजीवा, या दारुण विनाशातून घडणाऱ्या भव्योदात्त शोकात्म नाट्याचं स्वरूप हे उलगडायलाच हवं. ज्ञाताच्या मर्यादेत जीवनाच्या अस्तित्वाचा विराट आणि भव्योदात्त अर्थ उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य फक्त मी लिहिलेल्या महाभारतात आहे. ‘

कुठे तरी हिमालयात बर्फाचा कडा कोसळला. क्षणभर दोघं स्तब्ध झाले. व्यासांचा तो चिरंजीव उद्गारला,

‘महाभारत तुम्ही लिहिलं ना?’

‘होय,’ व्यास अभिमानाने म्हणाले. ‘ती दर्पोक्ती नाही तर वस्तुस्थिती आहे.

चिरंजीवाच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी ओघळू लागलं. त्याने व्यासांना साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाला,

‘महर्षी, प्रवासात मी महाभारताबद्दल जे जे ऐकलं ते आपल्या रूपाने साक्षात माझ्यासमोर उभं राहिलं. आता या तुमच्या दुर्बोध चिरंजीवावर दया करा. मला आता या सगळ्या यातना सोसवत नाहीत. केवळ मस्तकाच्याच नव्हे तर माझ्या सर्वांगाचा आता दाह होतोय. हरिद्वारपासून इथे येईपर्यंत या भव्य शोकात्म विश्वरूप दर्शनात यातनादायक जीवन भोगणारा मी देखील एक अंश आहे याची जाणीव सतत मला होत होती. हे सगळं विश्व माणसाला चिंतनप्रवण करणारं आहे. मला मार्ग दाखवा, गुरुवर्य. आपण मला सतत चिरंजीव म्हणता, मी खरा कोण आहे? सांगा, मी…’

व्यासांनी त्याला हातानं ‘थांब’ अशी खूण केली आणि म्हणाले, ‘तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकतो. पण या घडीला ती उत्तरं देण्याची मला आज्ञा नाही आणि मी देणारही नाही. कारण ती वेळ अजून आली नाही. ‘

जीर्णपुरुष काही विचारणार, एवढ्यात व्यासांनी त्याला पुन्हा थोपवलं आणि म्हणाले,

‘काहीही प्रश्न विचारू नकोस, या घडीला मी तुझं जन्मरहस्य सांगतो ते फक्त ऐक. ‘उग्र तपश्चर्या करणाऱ्या भारद्वाज महर्षीचं वीर्य पर्वताच्या दरीतल्या द्रोणात द्रवलं. त्या वीर्यापासून तुझ्या पित्याची, द्रोणाचार्यांची उत्पत्ती झाली. शर नामक गवताच्या बेटावर स्खलित होऊन द्विधा झालेल्या शरद्वान गौतमाच्या वीर्यापासून तुझी माता गौतमी ऊर्फ कृपीचा जन्म झाला आणि तुझे मामा महाबलाढ्य कृपाचार्य यांचाही जन्म झाला. कृपी आणि कृप ही दोघं जुळी भावंडं. द्रोण स्वत: अयोनिज आणि वडिलांप्रमाणे तप:श्रेष्ठ! भगवान भारद्वाज स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार द्रोणांनी शरद्वनाची कन्या कृपी हिच्याशी विवाह केला. कृपीही द्रोणांप्रमाणे अयोनिज. अग्निहोत्र, धर्म आणि दम यांमध्ये सतत रत असलेल्या कृपीला आणि द्रोणाचार्यांना उग्र तपश्चर्या व व्रताचरणाने त्र्यंबकाची आराधना करून एक मुलगा झाला. अर्थात तोही अयोनिजच. तो जन्मत:च ‘उच्चैःश्रवम्’ अश्वाप्रमाणे ओरडला. तो तू या क्षणाला माझ्यासमोर बसला आहेस.’

जीर्णपुरुषाचा चेहरा आक्रसला, पण चेहऱ्यावर गोंधळ कायम होता. भ्रम दूर झाला नाही. ओठांची उगाचच हालचाल होत राहिली. त्याची अवस्था व्यासांनी जाणली आणि त्याचं सांत्वन करीत म्हणाले,

‘तुझी मानसिक तळमळ मी जाणतो, पण ती लवकरच दूर होईल. ज्या त्र्यंबकाचा तू प्रसाद आहेस, त्या त्र्यंबकेश्वरी तू जा. तिथेच तुझी संभ्रम-अवस्था दूर होईल. तो त्र्यंबकच ती दूर करेल. तू संभ्रमातून बाहेर येशील. आणि तुझ्या स्मृतीची कवाडं आपोआप एखाद्या गुलाबपुष्पाच्या पटलांप्रमाणे उघडतील. सर्व काही आठवेल तुला. हे सर्व आता या क्षणाला लक्षात ठेव. चिरंजीव, पूर्वी जे तू पापाचरण केलंस तसं आता पुढे करू नकोस. जमलं तर धर्म, अर्थ, काम यांचा उपयोग कसा करायचा याचं मानवाला ज्ञान दे. सर्व मानवजातीचं कल्याण कर.’ व्यास स्वत:शीच हसले आणि म्हणाले, ‘हे असं मला वाटतं. पण कदाचित तू शापमुक्त होशील.’

पुढचं बोलण्याचं त्यांनी टाळलं, कारण ते त्यांच्या हातात नव्हतं. त्याला शापमुक्त करणारा कर्ता कुणी वेगळाच होता. या स्तब्धतेला जीर्णपुरुषाने वाचा फोडली –

‘हे त्र्यंबकाचं स्थान त्र्यंबकेश्वर आहे कोठे?’ व्यास काही बोलणार एवढ्यात त्यांचा शिष्य फलाहार घेऊन आला. व्यास म्हणाले, ‘चल ऊठ चिरंजीवा, हात-पाय धू. फलाहार घे. मी पण थोडी विश्रांती घेतो. मग आपण बोलू. मी तुला त्र्यंबकेश्वरी कसं जायचं ते सर्व सांगेन.’

चिरंजीव आज्ञाधारक लहान मुलाप्रमाणे मान हलवत उठला. उठल्यावर त्याच्या मस्तकात कळ
आली. इतके दिवस कपाळावरची स्थिर असलेली जखम भळाभळा वाहू लागली. व्यासांची दृष्टी त्याच्या भळभळणाऱ्या जखमेकडे गेली. त्यांनी मान फिरवली आणि आश्रमाच्या कवाडातून आरपार पाहिलं. भूतकाळ त्यांच्या समोर जसा घडला तसा जिवंत उभा राहिला. रथांचा प्रचंड खडखडाट, घोड्यांच्या खिंकाळ्या, भीमाच्या गर्जना, यांसमोर दीनवाण्या दिसणाऱ्या चिरंजीवांनी काढलेलं ते महाभयंकर ब्रह्मास्त्र! व्यासांनी पटकन डोळे मिटून घेतले. जेव्हा उघडले तेव्हा वर्तमानात आले होते. स्वत:शीच पुटपुटले… पाच हजारांपेक्षा कदाचित जास्त वर्षंही झाली असतील! ‘कृष्ण, कृष्ण,’ म्हणत मोठ्याने कृष्णाचे नाव घेतलं.

जीर्णपुरुषाला तो विचारवंत प्राध्यापक यात्रेकरू आठवला. तो म्हणाला होता, महाभारताचा खरा सूत्रधार श्रीकृष्ण.

व्यासांनी त्याला त्याच्या विचारमंथनातून बाहेर काढलं आणि हात-पाय धुण्यास सांगितलं.
जीर्णपुरुषाने हात-पाय धुऊन ती कपाळावरची जखम स्वच्छ केली आणि तो आश्रमात येऊन व्यासांच्या समोर बसला. व्यासांनी पुन्हा ‘कृष्ण कृष्ण’ म्हणून हात जोडून फलाहारास सुरुवात केली. जीर्णपुरुषानेही त्यांच्याप्रमाणे ‘कृष्ण कृष्ण’ म्हणून हात जोडून फलाहारास सुरुवात केली… आणि एक आश्चर्य घडलं. जखमेतून एकाएकी गारवा जाणवू लागला. व्यासांनी त्याच्याकडे पाहिलं. समाधानाने ते हसले. त्या हसण्यामागे उभा होता पाच हजार वर्षांपूर्वीचा काळ आणि संहारही. समोर काळी कफनी घातलेला जो चिरंजीव बसला होता, त्यानं तर लाखो निरपराध माणसं बेसावध झोपलेली असताना त्यांच्यावर अमानुष प्रहार केला. हत्ती, घोडे आदी जनावरांचीही कत्तल केली ! व्यासांनी एक सुस्कारा सोडला.

ज़ीर्णपुरुषाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. मान खाली घालून तो शांतपणे फलाहार करत होता. ‘अन्न परब्रह्म.’ हिमालययात्रेत तो शिकला होता, ‘उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म.’

फलाहार संपल्यावर व्यासमुनी थोडा वेळ नुसतेच ध्यानस्थ बसले. जीर्णपुरुष त्यांच्या शिष्याबरोबर आश्रमाबाहेर येऊन स्तब्ध बसला. व्यासांच्या शिष्याबरोबर त्याचं काहीही संभाषण झालं नाही. अंधार पडला, चंद्रानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि त्याच्या दैवी प्रकाशाची बरसात व्यासांच्या आश्रमावर तो करू लागला. व्यास बाहेर आले. त्यांचा शिष्य न बोलता उठून आत गेला. व्यास चिरंजीवाच्या बाजूला बसले. चिरंजीव काही विचारणार एवढ्यात व्यास म्हणाले,

‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर फार पुराणकाळापासून आहे. गंगोत्पत्तीस छत्तीस लक्ष एक हजार चौसष्ट वर्षं झाली आहेत. पुराणकाळात इंद्रादि देव, नारदादि महर्षी तेथे येऊन गेल्याचे दाखले मिळतात. अर्थात त्यांत मी देखील होतो. चिरंजीव, भगवान परशुरामने याच क्षेत्रात तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्रांनी सिंहस्थ यात्रेस येऊन आपल्या वडिलांचं – दशरथाचं श्राद्ध तिथेच केलं. श्री गुरू दत्तात्रेय यांना इथेच सिद्धी मिळाली. त्र्यंबकेश्वरास जाऊन गोदावरीत स्नान केल्याने गोमेध यज्ञाचं फल मिळतं. राजा युधिष्ठिर तीर्थयात्रा करत गोदावरीच्या कुशावर्त तटावर आला होता. तू तिथे जा. भारतवर्षातील मुख्य नद्यांमध्ये गोदावरी नदीची गणना होते. त्र्यंबकेश्वरश्चैव, घृष्णेशस्तथैवच । त्र्यंबकेश्वर हे गोदावरी तटावर महाराष्ट्र राज्यात नाशिकला आहे.

‘आता तुला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासंबंधी पौराणिक कथा सांगतो. ‘एकतः सर्व तीर्थानि त्र्यंबकं क्षेत्र मेकतः । तुलया तोलयद्धाता त्र्यंबकं तु विशिष्यते ।।’ एकदा अत्यंत दीनवत्सल भगवान त्र्यंबकराज (शंकर) भूतलावर येण्यासाठी निमित्त पाहू लागले. ते निमित्त निर्माण करण्यासाठी पार्वती ब्रह्मलोकास गेली. तिने ब्रह्मदेवाच्या शरीरात प्रवेश केला. त्या आदिमायेच्या योगानं ब्रह्मदेवास वाटू लागलं, मीच सर्वश्रेष्ठ सर्वज्ञ! महादेवाचा महिमा फक्त मलाच ज्ञात आहे. ब्रह्मदेवाची ही दर्पोक्ती विष्णूस सहन झाली नाही. ते स्वत:शी विचार करू लागले, की मला महान तपश्चर्या करूनही शिवमहिमा समजला नाही, आणि ब्रह्मदेव? मग विष्णूंनी ब्रह्मदेवाची भेट घेऊन दोघांत ठरवलं की विराटस्वरूपी शिवमस्तकाच्या शोधासाठी आपण बाहेर पडायचं. ब्रह्मदेवाने ऊर्ध्वभाग शोधीत जावं आणि विष्णूंनी पादवंदनार्थ अधोभागी शोधावं. गरज ही सगळ्या शोधांची जननी आहे. दोघंही शोधत होते. पण फार काळ शोधूनही ना ब्रह्मदेवांना शिवमस्तक सापडलं ना विष्णूंना शंकराचे पाय ! पण आपण कसे श्रेष्ठ आहोत दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाने केतकी पुष्पं आणि गाय यांना निर्माण करून खोटी साक्ष देण्यास तयार केलं आणि आपण शंकराच्या मस्तकाचा शोध लावला अशी घोषणा केली. हे ऐकून इंद्रदेव साशंक झाले आणि शिवलोकी शंकरास विचारण्यास गेले. तिथे शंकराने अंतर्दृष्टीने ब्रह्मदेवाचं कपट ओळखून त्यांना शाप दिला की भूलोकी तुझी कोणीही पूजा करणार नाही. खोटी साक्ष देण्यास तयार झालेल्या केतकी पुष्पास शाप दिला की तुला माझ्या पूजनाचा मान मिळणार नाही. आणि गाईस शाप दिला की तू तोंडाने अपवित्र होशील. या शंकराच्या शापाने ब्रह्मदेव क्रोधित झाले आणि त्यांनी शंकराला शाप दिला की तू भूलोकी पर्वत होऊन राहशील. याप्रमाणे शाप-प्रतिशाप झाल्यावर शंकर पर्वतरूप धारण करून येताना त्यांच्या पतनाच्या वेगाने सर्व वस्तूंचा संहार होऊ लागला. त्यामुळे ब्रह्मादि देव भयभीत होऊन गेले. इतक्यात आकाशवाणी झाली की ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र या तिघांनी पर्वतरूपाने या शंकरस्वरूप पर्वतास समुद्रापर्यंत आडवं व्हावं, म्हणजे प्रलय थांबेल. आणि या ठिकाणी आपण तिघांनी शंकराची प्रार्थना करावी. याप्रमाणे मार्गामध्ये असलेल्या या तीन देवांना शंकरांनी आपल्या त्रिनेत्रांनी पाहिलं. यावरून या शंकररूपी पर्वतास त्र्यंबकारव्यागिरी असं नाव मिळालं. नंतर त्रिवर्गाने त्र्यंबकेश्वराची स्तुती केली. शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, ‘जे घडून गेलं ते माझ्या इच्छेनुरूपच. आता तुम्ही स्वस्थानी परत जा.’ पण विष्णूंनी हट्ट धरला की जोपर्यंत आपण इथे पर्वतरूपाने राहाल तोपर्यंत आम्ही त्रिवर्ग आपल्या आसपास राहू. त्याप्रमाणे नवक्रोशात्मक श्री त्र्यंबकेश्वर क्षेत्र असून, आसमंतात भागीहरी (विष्णू), विधी (ब्रह्मदेव) आणि शचिपती (इंद्र) हे पर्वतरूपाने राहू लागले. काही काळाने ब्रह्मदेवाने त्र्यंबकगिरीवर येऊन शंकराची आराधना केली. शंकराने त्याला आशीर्वाद दिला की तुझं नाव धारण करून मी या ठिकाणी प्रसिद्ध होईन. आणि अभेद भावाने तू लोकी पूज्य राहशील. त्यामुळे या पर्वतास ब्रह्मगिरी असं नाव प्राप्त झालं. ब्रह्मगिरीनजीकच पर्वतरूपाने असणारा इंद्र (अंजनाचल) अंजनेरी नावाने प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे हरीशगिरी अथवा हर्षाचा डोंगर ब्रह्मगिरीनजीक आहे. त्याचं नाव हरीश आहे. ब्रह्मगिरीच्या सान्निध्यात आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर याचं स्थान आणि इतर पवित्र तीर्थं, गोदावरीचं उगमस्थान, निवृत्तिनाथ साधूंचा निवास, या सर्व गोष्टींमुळे या क्षेत्राची पवित्रता अनंत द्विगुणित, वृद्धिंगत झाली आहे. ‘

तिसरा प्रहर सुरू होत होता. व्यास थांबले. क्षणभर त्यांनी आकाशाकडे पाहिलं. चंद्र माथ्यावर होता. तो हळूच हसला. त्याला व्यासांचा संकेत कळला. व्यास पुन्हा चिरंजीवाकडे वळले. त्याच्या मस्तकावर मायेने हात ठेवत म्हणाले,

‘तिथे तू जा. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घे. तू आपोआप तुझ्या संभ्रम – अवस्थेतून बाहेर येशील.’ चिरंजीवाने त्यांना हात जोडले. डोळे पाण्याने भरून आले. व्यासांनी त्याच्याकडे आर्द्रतेने पाहिलं आणि म्हणाले,

‘वत्सा चिरंजीवा, मनुष्ययोनीत जन्म घेतलेला मनुष्यप्राणी हा चुकाच करतो. तशा तू पण महाभयंकर चुका केल्या आहेस. आता तुला एक सुधारण्याची संधी मिळेल. त्यासाठी तुला मी माझ्या तपोबलाने, माझ्या मर्यादेत काही वरदानपर शक्ती देतोय. एक लक्षात ठेव, या आशीर्वादस्वरूप शक्ती फक्त तुझ्या मर्यादेत असतील. त्यांचा गैरवापर होता कामा नये. नाही तर त्या शक्ती पुन्हा माझ्याकडे परत येतील. चिरंजीवा, या घडीला तू एक महाभयंकर शाप भोगतोयस.’

अग्नीचा प्रचंड चटका बसावा असा तो चिरंजीव दचकला आणि म्हणाला,

‘कोणता शाप? ‘

‘तुझ्या मस्तकावरची खोलवर गेलेली सतत भळभळणारी तुझी जखम, तुझ्या शरीराला येणारी दुर्गंधी आणि रानावनातली सतत वणवण, हा तुझा शाप आहे. हा तुझा शाप मी बदलू शकत नाही. कलियुगात सर्वत्र एवढी दुर्गंधी पसरली आहे, तेव्हा तुझ्या दुर्गंधीची कालमर्यादा संपलीय.’ व्यास बोलायचे थांबले.

चिरंजीव अवाक होऊन त्यांच्याकडे पाहू लागला.

व्यास पुढे अधिक गूढतेने म्हणाले, ‘चिरंजीवा, तू आता त्याची चिंता करू नकोस. तुझ्या शापाचं रहस्य स्वत: त्र्यंबकेश्वर तुला सांगेल. मी फक्त माझं तपोबल तुला देतोय, ते घे.’

पाणी भरलेला तांब्याचा गडू त्यांनी हातात घेतला आणि म्हणाले,

‘मी आता तुला जे देतोय ते पाणी आचमन करून ग्रहण कर. ही साक्षात गंगा आहे.’

व्यासांनी क्षणभर डोळे मिटले. स्तवन केलं आणि म्हणाले,

‘आजपासून तुला कुठलीच बंधनं राहणार नाहीत. आचमन कर. दुसरं, तुला हवा तेथे पारदर्शी प्रवेश करता येईल. आचमन कर. तिसरी शक्ती, तुझं स्वरूप परिस्थितीनुसार बदलता येईल – म्हणजे आज जी तुझी शारीरिक उंची आहे, महाभारतातला सर्वांत उंच पुरुष तू होतास.’ चिरंजीवाच्या कपाळावर बद्रीनारायणाच्या मंदिरातला प्रचंड घंटानाद सुरू झाला. व्यास पटकन म्हणाले, ‘ती तू तुझी उंची, त्याचं स्वरूप तुला परिस्थितीनुसार बदलता येईल. आचमन कर. चौथं वरदान, तुला स्वत:ला भळभळणाऱ्या जखमेचा प्रचंड गलिच्छ दर्प येतो. त्यासाठी तू सतत स्नान करत असतोस. त्या जखमेची दुर्गंधी यापुढे तुला येणार नाही. आचमन कर. पाचवं, आजपासून कलियुगात या भारतातल्या नव्हे तर जगातल्या सगळ्या भाषा तुला अवगत होतील आणि बोलताही येतील. आचमन कर. आणि शेवटचं, त्र्यंबकेश्वरी गेल्यावर त्यांच्या दर्शनाने तुला स्वत:ची ओळख तर पटेलच पण स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव देखील होईल. त्यानंतर तू वाऱ्याच्या वेगाने चालूही शकशील आणि सगळा भूतकाळ या क्षणी तुला समोर घडल्यासारखा किंवा घडतोय असा तुझ्या स्मृतिपटलातून झरझर बाहेर येईल. आज सातपुड्याच्या सर्वात उंच ज्या अस्तंबा शिखरावर तुझं वसतिस्थान आहे, तिथे अश्विनाच्या द्वादशीला रात्री लाखो भाविक तुझी पूजा करायला येतात. ते तुझीच पूजा करायला का येतात? आणि दिवाळीच्या धनत्रयोदशीला सकाळी पर्वत का उतरतात? याचंही उत्तर तुला मिळेल, त्याचा अर्थ तुला कळेल. आचमन कर. उरलेली गंगा मी तुझ्या मस्तकावर सोडतो.’ व्यासांनी गंगा त्याच्या मस्तकावर रिकामी केली आणि म्हणाले, ‘जे मी तुला आशीर्वाद दिले ते खरे होतील. हा महाभारतकर्त्या, या चिरंजीव व्यासाचा शब्द आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू चिरंजीव आहेस. पण तू शापित चिरंजीव आहेस.’ पुन्हा देवळात प्रचंड घंटानाद सुरू झाला. ‘जा, त्र्यंबकेश्वरी जा. तथास्तु.’

त्या जराजीर्ण चिरंजीवाने व्यासांना साष्टांग नमस्कार केला. त्याला व्यासांनी खांद्यांना धरून उठवलं, पित्याच्या मायेने मिठीत घेतलं. त्याचे अश्रू पुसले, आणि म्हणाले,

‘महाभारतातल्या माझ्या पुराणपुरुषा, त्र्यंबकेश्वर तुझं रक्षण करो. वर आभाळाकडे बघ. तुझा वाटाड्या पांढराशुभ्र ढग तुला त्र्यंबकेश्वरी त्र्यंबकाच्याच आज्ञेवरून नेण्यासाठी आलाय. शुभास्ते पंथानामसन्तु.’ व्यास आपले अश्रू लपवीत पर्णकुटीकडे वळले.

चिरंजीवाने एकवार त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला वंदन केलं आणि म्हणाला, ‘व्यासपौर्णिमेला येईन. ‘

एक नाद आसमंतात घुमला. आवाज कुठे तरी व्यासांसारखा होता.

‘कदाचित शापमुक्त होशील !’

हिमनग कडकडाट करत पडला. चिरंजीवाने ढगाकडे पाहिलं. त्याने आकाशातून चालायला सुरुवात केली. त्याच्या माथ्याखाली चिरंजीव चालू लागला. पुन्हा हरिद्वारमार्गे. उत्तराखंडाची यात्रा हरिद्वारापासून सुरू होते आणि संपतेही तेथेच. हिमालयाकडे पाहत त्याने हात जोडले. गंगोत्री, यमुनोत्री आणि सर्व नद्यांसाठी हात जोडले आणि मोठ्या समाधानाने तो म्हणाला,

‘मी चिरंजीव आहे, पुन्हा तुमच्या भेटीला येईन तेव्हा मला स्वत:ची ओळख असेल. एक नाव असेल. देवात्मा हिमालया. येतो मी.’

हात जोडून, पाठ फिरवून तो झपझप चालू लागला. ढगही थांबत नव्हता आणि चिरंजीवही.

मध्येच झाडावरची फळं आणि नदीनाल्याचं पाणी त्याची क्षुधा आणि तृष्णा भागवत होती. तो

त्र्यंबकेश्वराचा पांढराशुभ्र ढग त्याला रस्ता दाखवत होता. निबीड अरण्यातही दिवसा-रात्री त्या ढगाचा प्रकाश त्याला सावली देत, मायेचं पांघरूण घालून निर्विकारपणे चालत होता. किती दिवस? किती रात्री? मोजमाप करणं कठीण होतं. जेव्हा मोठमोठ्यानं महाघंटानाद सुरू झाला, तेव्हा प्रवास थांबला होता. आकाशातला तो वाटाड्या ढग या चिरंजीवाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन निघून गेला होता. चिरंजीवाने त्या दिव्य महाभागाला, कृतज्ञतेने हात जोडून त्याचे आभार मानले.

चिरंजीव जेव्हा त्र्यंबकेश्वरला पोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. चिरंजीवाची वाट पाहत सूर्य अस्ताला जाण्याचा थांबला होता. अस्ताला जाणाऱ्या सूर्यदेवाकडे चिरंजीवाने मनोभावे हात जोडले सूर्यही मनापासून हसला, कारण तो पण जाणून होता की या चिरंजीवाच्या यातना आता संपणार होत्या.

चिरंजीवाला समोरच त्र्यंबकेश्वराचं देवालय दिसलं. ते देवालय काळ्या पक्क्या दगडांनी बांधलं असून, त्यावरचं नक्षीकाम अप्रतिम तऱ्हेने केलेलं दिसलं.

क्षणभर ते पाहत तो थांबला. सभोवार त्याने पाहिलं त्याला ब्रह्मगिरी पर्वत दिसला. ‘हा शिवस्वरूप आहे. ब्रह्मदेवास सृष्टिउत्पत्तीचं ज्ञान या ठिकाणीच झालं म्हणून त्यास ब्रह्मगिरी म्हणतात. ‘

व्यासांचा आवाज चिरंजीवाचा पाठलाग करू लागला.

ब्रह्माद्रीयापासून गोदावरी नदीची उत्पत्ती झाली.

सह्यस्य प्रथमो मूधी ब्रह्माद्रिरिति विश्रुतः ।
यत्र गोदा समूदभूता सर्व पापप्रणाशिनी ॥

वामदेव हे दुसरे शिखर. त्यापासून वैतरणेचा उगम झाला. तिसरं अघोर. या शिखरापासून अहिल्या नदीचा उगम झाला. चौथं ईशान. या शिखरापासून बाणगंगा नदीचा उगम झाला. तत्पुरुष या पाचव्या शिखरापासून रामगंगेचा उगम झाला. अशा पाच नद्या या पर्वतापासून निघाल्या आहेत.

डोंगरात कोरलेले दोन जिने लागतात. हे जिने चढून गेल्यावर किल्ल्यावरील उंचसखल मैदान लागतं. रस्त्यात कोटीतीर्थ म्हणून एक तीर्थ आहे आणि त्याच्या मागील बाजूस त्र्यंबकेश्वराचं देवालय आहे. देवालयाजवळ एक कुंड आहे चिरंजीवा, त्याच्या बाजूस लहान लहान ओवऱ्या आहेत. देवळाच्या सभोवार दोन पुरुष उंचीच्या चिऱ्यांचा मजबूत कोट बांधला आहे. कोटास चार दिशेस चार दरवाजे आहेत आणि पूर्वोत्तर दरवाजे मोठे आहेत. उत्तरेस महादरवाजा आहे. त्यावर नगारखाना आहे. तेथेच चौघडा चालू असतो. सभामंडपात मध्यभागी संगमरवरी दगडाचं मोठं कासव आहे. सभामंडप घुमटाच्या आकाराचा बांधला असून बरोबर कासवाच्या माथ्यावर सभामंडपाचा कळस आहे. सभामंडपास चोहोकडे भिंतीस कोनाडे कोरून त्यात अष्टभैरवादिकांच्या अनेक मूर्ती बसवल्या आहेत. सभामंडपाच्या पश्चिम दरवाजातून तीन हात खोलीवर देवळाचा मुख्य गाभारा आहे. गाभाऱ्यात बाहेरच्या बाजूने प्रकाश येण्याची सोय नाही. तिथे कायमच नंदादीप तेवत असतो.

महत्त्वाचं लक्षात ठेव चिरंजीवा, पारमार्थिक साधनाभ्यासाला प्रखर प्रकाश बाधक असून, अंध:कार हा साधक असतो. म्हणून शंकराच्या देवळात मंद प्रकाश असतो आणि देवालयाच्या गाभाऱ्यास फक्त एकच दरवाजा असतो. आता पुढे हो चिरंजीवा, माझ्या सूचनेप्रमाणे देवळाचा सगळा आराखडा लक्षात आला ना?’ ‘होय मुनिवर्य,’ चिरंजीव उद्गारला. त्यावर समाधानाने हसत व्यास त्याच्या कानात पुन्हा धीरगंभीर स्वरात म्हणाले,

‘आता पुढे चाल चिरंजीवा, जेव्हा सहस्र जन्मांत केलेला पुण्यसंचय एकीभूत होतो तेव्हाच त्या मानवास त्र्यंबकक्षेत्री जाण्याची बुद्धी होते.

यस्य जन्म सहस्त्राणां पुण्यं भवतिसंचिताम् ।
तस्यैव त्र्यंबके गन्तुं बुद्धिर्भवति नान्यथा ।।

‘जा, आता कुशावर्त तीर्थात स्नान कर. कारण हे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. गौतम ऋषींनी दर्भांनी अभिमंत्रित करून गंगेचा ओघ धान्य तयार करण्यासाठी अडवला. तिथेच त्यांनी गंगेत समंत्रक स्नान केलं. म्हणून या तीर्थास ‘कुशावर्त’ असं म्हणतात. याच ठिकाणापासून गंगेस ‘गोदा’ म्हणू लागले. कारण गौतम ऋषींनी तेथे स्नान केल्यावर त्यांचं गोहत्येचं पाप नाहीसं झालं आणि गाईसही जीवदान मिळालं. म्हणूनच गोदा. गौतमस्य गां जीवनं ददाति इति गोदा. गोदावरी ही संज्ञा गंगेस कुशावर्त तीर्थावरच मिळाली. ही महानदी आहे. आता योग्य वेळ आहे. पुढे हो. काही अडचण आली तर स्मरण कर. पण शक्यतो तुझी वाट तूच शोध. त्र्यंबकेश्वर तुला मार्ग दाखवेल. तथास्तु, चिरंजीवा. ‘

व्यासांचा आवाज थांबला आणि सूर्य अस्ताचलाकडे गेला. तिथूनच चंद्राने हळूच डोकावलं आणि म्हणाला,

‘घाबरू नकोस चिरंजीवा, पुढचा प्रकाश मी देईन तुला.

चिरंजीवाने त्याला हात जोडले. त्याचे पाय कुशावर्त तीर्थाकडे वळले आणि त्याने आपला देह पाण्यात सोडला. तिथेही यात्रेकरूंची गर्दी होती. ज्यांच्या पूर्वजांनी जे गुरू केले होते, त्याच पुरोहितांना गुरू मानण्याची प्रथा आजही इथे कायम आहे आणि पाळलीही जाते.

त्र्यंबकेश्वराच्या आवारातले दिवे लागले. चिरंजीव अजूनही कुशावर्ताच्या पवित्र पाण्यातच होता.
तिथूनच ब्राह्मणपुरोहिताने तारस्वरात म्हटलेली त्र्यंबकेश्वराची आरतीही त्याने ऐकली. त्यानंतर यात्रेकरू सर्वत्र पांगले. सर्वत्र शांतता पसरली. आभाळातलं धुकं हळूहळू खाली येऊ लागलं.
कुशावर्तात गंगेची प्रार्थना करून आणि पाच वेळा अर्ध्यदान करून, ब्रह्मगिरीस मनोभावे नमस्कार करून चिरंजीव भव्य सभामंडपाच्या पश्चिम दालनाकडे वळला. व्यासांनी त्याच्या अंतर्मनाला आधीच सूचना दिल्या होत्या. पण त्याहीपेक्षा कुणी तरी त्याला आत गाभाऱ्याकडे खेचत होतं. पश्चिम दरवाजातून आत शिरल्यावर त्याला देवळाचा मुख्य गाभारा लागला. दोन नंदादीप तेवत होते. विलक्षण भारावून चिरंजीव त्या त्र्यंबकेश्वराच्या सगुण रूपाकडे पाहू लागला. सर्वत्र एक नीरव शांतता होती आणि आता संवाद होता तो फक्त चिरंजीव आणि त्र्यंबकेश्वरात त्या सगुणाकडे पाहताना चिरंजीवाच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. तोंडातून एक एक शब्द ध्यानाच्या रूपाने आपोआप बाहेर फूटू लागला आणि उच्चरवाने बाहेर येऊ लागला…

शुद्ध स्फटिक संकाशं त्रिनेत्र पंच वक्त्रकम् ।
गड्:धारं दशभुजं सर्वाभरण भूषितम् ।
नीलग्रींव शशाङ्कं नाग यज्ञोपवीतिनम्।
व्याघ्रचर्मोत्तरीयं च वरेण्यमभयप्रहम ||

‘ज्याचा देह स्फटिकाप्रमाणे शुभ्र आणि तेजस्वी आहे, ज्याला तीन नेत्र आणि पाच मुखं आहेत, ज्याच्या मस्तकावर गंगा विराजमान आहे, ज्यास दहा हात असून त्यामध्ये ज्याने निरनिराळी आयुधं धारण केली आहेत, ज्याचा कंठ नीलवर्ण आहे, ज्यानं मस्तकावर चंद्रकला धारण केली आहे, सर्प हेच ज्याचं भूषण आहे, ज्याने व्याघ्रचर्म उत्तरीय वस्त्र म्हणून परिधान केलं आहे, जो ध्यान करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो, जो दुःखपीडितांना त्यांच्या दुःखापासून मुक्त करतो, त्या त्र्यंबकेश्वराचं मी ध्यान करतो.’ सर्वत्र स्तब्धता. त्र्यंबकेश्वराचा चेहरा तसाच अचेतन. चिरंजीवाला काय करावं समजेना. कानात एक हळूच कुणी तरी फुंकर मारली आणि उच्चस्वराने चिरंजीव बोलू लागला.

‘ॐ त्र्यंबकम यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् ।
उर्वाएकमिव बंधनान्मृत्यो मुक्षीयमाम्हतात ।।’

चिरंजीवाने हा मंत्र जेव्हा म्हटला तेव्हा बाहेर विजेचा प्रचंड कडकडाट झाला. बाहेरचा प्रकाश किंवा वारा आत येण्याची कुठलीही शक्यता नसताना गाभाऱ्यातले नंदादीपाचे दिवे जोरात फडफडू लागले. बाहेर जोरात पाऊस पडत होता, जसा चिरंजीवाच्या डोळ्यांतून पडत होता. आणि त्र्यंबकेश्वराचा आवाज गाभाऱ्यात घुमू लागला.

‘ये माझ्या चिरंजीव पुत्रा. हा त्र्यंबकेश्वर तुझीच वाट पाहत गेली कित्येक हजार वर्षं उभा आहे,’ विजेचा पुन्हा प्रचंड कडकडाट झाला. एवढंच नव्हे तर वीज कोठे तरी दरीत कोसळल्याचा आवाज आला. कारण त्र्यंबकाचा तो आवाज पंचमहाभूतांचाही थरकाप उडवू लागला. पंचमहाभूतं त्या त्र्यंबकेश्वराच्या आवाजाला जणू आपलं अस्तित्व दाखवत वंदन करत होती.

चिरंजीवाने हात जोडले आणि आपल्या दोन्ही हातांची ओंजळ करून मुठी आवळल्या. व्यासांचं स्मरण केलं. हातात सोनेरी चंदेरी चाफ्यावर ठिपका असलेली ती दैवी फुलं त्याच्या हातात आली. त्यानं ती फुलं विलक्षण एकाग्र होऊन तन्मयतेने त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर वाहिली. पुन्हा हात जोडले.

त्र्यंबकेश्वराच्या देवळांत घंटानाद सुरू झाला. बाहेर विजेचा कडकडाट. कित्येक हजारो वर्षांपूर्वीचं रहस्य आज त्र्यंबकेश्वर स्वत: सांगणार होते. त्याची सुरुवात त्यांनी त्या चिरंजीवाला ‘पुत्रा’ अशी हाक मारून केली होतीच. इतकंच नव्हे तर ते त्याची वाट पाहत होते. थोडा वेळ दोघंही स्तब्धपणे एकमेकांना पाहत उभे होते.

मराठी पंचांगाप्रमाणे आजचा दिवस होता शुक्रवार. पौष महिन्यातील द्वितीया होती. नक्षत्र होतं आश्लेषा. थंडीचे दिवस होते. त्यामुळे रात्र मोठी होती. दिवस लहान होता.

क्षणभर त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात विषण्ण स्मशानशांतता पसरली होती. त्या शांततेचा भंग करत चिरंजीव हळूच म्हणाला,

‘हे देवाधिदेवा, महादेवा, त्र्यंबकेश्वरा, मी कोण आहे?’

चिरंजीवाने वाहिलेल्या साक्षात महादेवाच्या निवासस्थानातून – हिमालयातून आलेल्या त्याच्या आवडत्या सोनेरी चंदेरी चाफ्यावरच्या मोगऱ्याचा दैवी सुगंध घेत त्र्यंबकेश्वर शांतपणे म्हणाले,

‘आता शांतपणे ऐक तू कोण आहेस. पाच हजार वर्षांपूर्वी मार्गशीर्ष अमावास्येला कुरुक्षेत्री सख्ख्या चुलत भावांमध्ये, कौरव, पांडवांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आणि महाभयंकर महायुद्ध झालं. सारा भारतखंड या युद्धात ओढला गेला. हे महायुद्ध अठरा दिवस आणि अखंड एक रात्र चालू होतं. त्यात कौरवांच्या अकरा अक्षौहिणी सैन्याचा नाश झाला. त्या कौरवसैन्यातून लढताना वाचलात फक्त तुम्ही तिघे जण. तू, आचार्य कृपाचार्य आणि यादवराज कृतवर्मा. महाबलाढ्य पांडवांकडून वाचले ते फक्त सात जण, पाच पांडव – युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, आणि यादववीर भगवान श्रीकृष्ण आणि सात्यकी. पांडवांच्या सात अक्षौहिणी सैन्यापैकी द्रौपदीचे पाच पुत्र, पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि अनेक पांचालवीर. कौरवांचा राजा दुर्योधन हा घायाळ होऊन एका सरोवरात लपला होता. त्या भीषण रात्री त्यानं तुला कौरवांचा पाचवा सेनापती केला. कृपाचार्यांच्या हातून जल घेऊन त्यानं तुला सेनापतिपदाचा अभिषेक केला आणि त्याच महाभयंकर भीषण रात्री मला, साक्षात या रुद्राला प्रसन्न करून पांडवांच्या शिबिरात जाऊन तू प्रचंड नरसंहार केलास! पांडवांचं उरलेलं सैन्य ते झोपेत, निःशस्त्र असताना अमानुषपणे कापून काढलंस! द्रौपदीच्या पाच पुत्रांसह सर्व निजधामास गेले.

‘ हे ऐकून चिरंजीव प्रचंड हादरला. त्याची जीभ चाचरायला लागली आणि शब्द बाहेर फुटले,

‘हे सगळं भयानक कृत्य मी केलं?’

त्र्यंबकेश्वर शांतपणे म्हणाले, ‘होय, तूच केलंस. तुझ्याबरोबर या नरसंहारात ते दोघे महावीर कृपाचार्य आणि कृतवर्मा हत्याकांडाला विरोध करत असताना देखील त्यांनाही तू स्वत:बरोबर या पापात ओढलंस. अर्थात या संहाराची प्रेरणा मीच होतो, मी!’

बाहेर विजेचा प्रचंड कडकडाट झाला. चिरंजीव थरथर कापू लागला. त्र्यंबकेश्वर पुढे म्हणाले,

‘जेव्हा असुरांनी पृथ्वीवर मानवरूप धारण केलं, तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी पांडवांच्या रूपाने देवाने आपले अंश पृथ्वीवर सोडले. नव्हे, सोडावेच लागले… आणि महाभारत घडवून आणलं. तरीही या हत्याकांडाची संपूर्ण जबाबदारी तुझी होती. तुझ्या एकट्याची. झोपेत असलेल्या द्रौपदीपुत्रांची, बांधवांची तू हत्या केलीस. त्या संपूर्ण पांचाल कुलाचा तू निःपात केलास! हे ऐकून पांडवपत्नी द्रौपदी प्रचंड संतापली आणि तिने तुला ठार मारण्याचा आग्रह धरला. तू दुर्योधनाला कौरव जिंकल्याची बातमी दिलीस. तेव्हा दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिराला सांग, आता विधवेवर राज्य कर, असं म्हणून त्याने प्राण सोडले. तू, कृपाचार्य, कृतवर्मा जंगलात वेगवेगळ्या दिशांना पळालात. तू व्यासांच्या आश्रमात त्यांच्या पायांशी शरण गेलास. पण तिथे तुला श्रीकृष्णांनी भीम – अर्जुनासह गाठलं. भगवान श्रीकृष्णांनी तू पांडवांचा गुरुबंधू म्हणून ठार नाही मारलं, पण अर्जुनाला तुझ्या मस्तकावर असलेला माझ्या कृपाप्रसादाने तुला मिळाला होता तो जन्मजात सहजमणी, अवध्य नीलमणी तुझ्या अत्यंत लाडक्या मित्राला – अर्जुनाला तलवारीने कापून काढायला सांगितला ! अर्जुनाने तो मणी तलवारीने कापून काढला. वेदनेची आणि रक्ताची प्रचंड चिळकांडी तुझ्या मस्तकात उठली. आजही गेली पाच हजार वर्षं त्या जखमेचा दाह आणि भळभळ कायम आहे. पण ही शिक्षा देखील कृष्णाला कमी वाटली, म्हणून अजून एक भयावह शाप त्याने तुला दिला. पुढील तीन हजार वर्षं तू पृथ्वीवर वणवण करत फिरशील! या मण्याच्या जागी खोलवर जे विवर पडलं आहे ना त्यातून सतत तुझी जखम रक्त आणि पू यांनी भळभळेल… त्यासाठी तुला तेलातुपाकरता भीक मागत हिंडावं लागेल.
पण बऱ्याच वेळा ते पण तुझ्या नशिबात असणार नाही. असा तुला शापित चिरंजीवाचा शाप देऊन कृष्ण पांडवांसह परत फिरला. ‘

क्षणभर त्र्यंबकेश्वर थांबले. चिरंजीव गांगरला. त्याचे ओठ थरथरायला लागले. आणि पुटपुटले, ‘माझं नाव काय, महादेवा? मी कोण? कोहम? तसं हिमालयातून व्यासांपर्यंतच्या प्रवासात बरंच काही आठवलं; पण ते विलक्षण अस्पष्ट. कदाचित माझं नाव कळल्यावर या पातकांची मला आठवण होईल. ‘

गाभाऱ्यात आवाज पुन्हा घुमला,

‘तू माझ्या कृपाप्रसादान आचार्य द्रोण आणि माता गौतमी यांचा अयोनिज महापंडित, महातेजस्वी, महाकाय, महापराक्रमी पुत्र अश्वत्थामा आहेस.’

‘अश्वत्थामा! अश्वत्थामा!!’ या नावाचे पडसाद संपूर्ण दऱ्याखोऱ्यांतून उमटले. त्र्यंबकेश्वराचा गाभारा या आवाजाने भरून गेला. चिरंजीवाच्या संभ्रमाचे ढग पटापटा फुटू लागले. डोळ्यांसमोरच्या धुक्याचा पडदा दूर झाला आणि त्याला सगळं स्पष्ट आठवलं. त्याची स्मृती परत आली. कपाळावरची जखम सर्वांगावर भळभळू लागली. त्र्यंबकेश्वराचा प्रेमळ स्वर त्याच्या कानी पडला

‘शांत हो, अश्वत्थामा. ती जखम आधी पूस. त्यावर माझ्या समोर तेवत असलेल्या नंदादीपाचं तेल लाव. शांत होशील. ‘

अश्वत्थाम्याने आपल्या कफनीतल्या फडक्याने ती जखम पुसली. त्या जखमेवर त्र्यंबकेश्वराचा प्रसाद म्हणून नंदादीपातील तेल लावलं. शांत झाला. त्र्यंबकेश्वर पुन्हा म्हणाले,

‘पुत्रा अश्वत्थामा, तुझ्या शापाची मर्यादा तीन हजार वर्षं होती. या अज्ञाताच्या प्रवासात दोन हजार वर्षं तू मरणयातना भोगत अधिक काढलीस. एक लक्षात ठेव, भगवान श्रीकृष्ण आपलं वचन कधीच विसरत नाही. पण तरीही तू आता तुझ्या स्थानाकडे जा. ते स्थान तुला माझ्याच प्रेरणेने मिळालं आहे. रोज भक्ती करतोस ना माझी? ‘

अश्वत्थाम्याने हात जोडले. पुढे महादेव म्हणाले,

‘तेथे जाऊन कृष्णाला हाक मार. आठवण कर आणि या मरणप्राय शापातून लवकर मुक्त हो.
स्वर्ग तुझी वाट पाहतोय. ‘

अश्वत्थाम्याला धाप लागली होती. हे सर्व ऐकून श्वास उसासू लागला होता. आपलं सर्वांग त्याने त्र्यंबकेश्वराच्या पायांशी झोकून दिलं. भगवान त्र्यंबकेश्वरांनी त्याची ही अवस्था ओळखली आणि रसाळ स्वरात पुन्हा आज्ञा केली,

‘ऊठ, माझ्या पाच हजार एकशे सत्तर वर्षांच्या पुत्रा, ऊठ! आणि सत्वर अस्तंब्याकडे जा. कृष्ण दयाळू आहे. तो जरूर तुझ्या हाकेला साद देईल. जा. तथास्तु!’

अश्वत्थामा झटकन उठला. हात जोडले. त्याने एकवार त्र्यंबकेश्वराकडे पाहिलं. गाभारा पूर्ववत होता. नंदादीप शांतपणे तेवत होते. अश्वत्थामा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यातून नव्हे तर संभ्रमाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडला. त्र्यंबकेश्वर हे आपल्या पित्याचं तीर्थक्षेत्र सोडून स्वत:च्या तीर्थक्षेत्राकडे अस्तंब्याकडे चालू लागला.

चालता चालता स्मृतींची कवाडं उघडू लागली… एखाद्या कमळाच्या पटलाप्रमाणे! आणि त्याचं मन आक्रंदून उठलं. ‘मी अश्वत्थामा, चिरंजीव !’ ओठ स्पष्ट हलत होते. आवाजही स्पष्ट येत होता. पुन्हा तो ओरडला,

‘होय, मी अश्वत्थामा… चिरंजीव !’