Sale!

अिंडिया, भारत आणि हिंदुस्थान

130.00 0.00

नियतकालिकात वेळोवेळी प्रसिध्द झालेल्या गजानन वामनाचार्य यांच्या लेखांचा/स्फूटांचा हा संग्रह आहे. हे लेख सुमारे १९९८ ते २००३ या कालखंडात लिहीलेले आहेत. २००२ साली प्रसिध्द झालेले लेख प्रामुख्यानं घेतलेले आहेत.

लेखक : गजानन वामनाचार्य / Gajanan Wamanacharya
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १३०/-

सवलत किंमत : मोफत वाचण्यासाठी

हे पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

SKU: India-Bharat-Ani-Hindusthan Category: Tag:

Description

थोडं मनातलं ….

वाचन हे सुशिक्षित मनाचं सुलक्षण आहे. काय वाचावं हे ज्याच्या त्याच्या पिंडावर अवलंबून आहे. वाचनालयात अनेक विषयावरील पुस्तकं असतात. परंतू सर्वच सभासद, सर्वच विषयावरील पुस्तकं वाचीत नाहीत. मासिकांच्या बाबतीतही हाच प्रकार आढळतो. काही मासिकांवर वाचकांच्या अुड्या पडतात तर काही मासिकं अुघडूनही बघितली जात नाहीत. हाच नियम वृत्तपत्रांनाही लागू पडतो. आपण अेकाददुसरंच दैनिक, रोज विकत घेअून वाचतो. सकाळच्या चहाबरोबर, खाण्यासाठी बिस्किटं आणि वाचण्यासाठी पेपर लागतो.

कोणत्याही वृत्तपत्रात, अनेक प्रकारची माहिती असते, काही मजकूर् आणि चित्रं, तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी असतात, काही मजकूर तुमचं मन रिझविण्यासाठी असतो तर जाहिरातींसारखा बरिचसा मजकूर, कुणाचा तरी गल्लाभरू असतो.

काही मजकूर असा असतो की, तो वाचून तुमच्या भावना जागृत होतात, मन हेलावतं आणि मेंदूत विचारचक्रं सुरू होतात. अितर दैनंदिन व्यवहार अुरकीत असतांना देखील त्या मजकूरासंबंधीचे विचार तुमच्या मनात घोळत असतात. मनातल्या मनात निर्माण झालेल्या अशाच बऱ्यावाअीट प्रतिक्रिया लिहून ठेवण्याची मला सवय आहे.

मला असं वाटतं की, कोणतीही घटना किंवा क्रिया घडण्यासाठी अेखाद्या ठिणगीची आवश्यकता असते.

डिसेंबर २००१ मध्ये, घाटकोपरला, अेका सांस्कृतिक कार्यक्रमात, मी आणि `मुंबअी तरूण भारत` चे , त्यावेळचे प्रमुख संपादक श्री. लक्ष्मणराव जोशी, अेकाच व्यासपीठावर सहभागी झालो होतो. कार्यक्रमाआधी आणि नंतरही मी त्यांच्याशी माझ्या लिखाणासंबंधी बोललो. तेव्हा त्यांनी, तरूण भारतात सुरू करण्यात येणाऱ्या `मनबोली` या सदरात, दर आठवड्यात मला काही तरी लिहीण्याची विनंती केली. विषय मीच निवडावयाचे होते. मला लिहीण्याची स्फूर्ती देणारी हीच ती ठिणगी ठरली.

वृत्तपत्रं वाचतांना माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रतिक्रिया मी `मनबोली` साठी लिहील्या. त्या सदरासाठी लिहीलेले आणि `मुंबअी तरूण भारतात` वेळोवेळी प्रसिध्द झालेले लेख, या संग्रहात प्रामुख्यानं घेतले आहेत. अितरही काही लेखांचा समावेश केला आहे. हे लेख आणि पत्रं, अमृत, मराठी विज्ञान परिषद पत्रिका (मुंबअी), मराठी विज्ञान महासंघ पत्रिका (पुणे), किर्लोस्कर, लोकसत्ता, नवशक्ती, शिक्षण संक्रमण (पुणे) वगैरे नियतकालिकात प्रसिध्द झालेली आहेत.

लेख प्रसिध्द करतांना अनेक अवधानं सांभाळावी लागतात. वृत्तपत्राची ध्येयधोरणं, जनमानसाचा कल, आणि वृत्तपत्रात अुपलब्ध असलेल्या जागेची मर्यादा सांभाळायची म्हणजे थोडे संपादकीय संस्कार करून मूळ लेखाची काटछाट करावीच लागते. या संग्रहात घेतलेले लेख मात्र, संपादकीय संस्कार करण्यापूर्वीचे, मूळ स्वरूपातीलच आहेत. काही लेखात, नंतरही थोडी भर घातली आहे. काही अप्रसिध्द लेखांचाही समावेश केला आहे.

लेख लिहीतांना, कुणाच्याही भावना दुखविण्याचा अुद्देश नव्हता आणि नाही. कुणालाही कुठेतरी खटकलं असेल तर क्षमस्व.

कोणत्याही घटनेकडे, विज्ञानीय दृष्टीकोनातून पाहिल्यास, अनेक अन्वयार्थ लक्षात येअू लागतात. हे लेख लिहीतांना, वेगवेगळ्या दिशांनी विचार करून, अेक नवा दृष्टीकोन मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

कोणतीही कृती करायची म्हणजे कालबाह्यतेचा विचार करणं आवश्यक वाटतं. बहुतेक मराठी शब्दांचे तीन स्तर आहेत. अेक संस्कृतमय, दुसरा मध्यमवर्गीय मराठी आणि तिसरा बोली भाषेतला ग्रामीण. अुदा. पतीपत्नी, नवराबायको आणि कारभारीकारभारीण. पृष्ठ क्रमांक म्हणण्यापेक्षा पान नंबर म्हणणं किंवा अर्थार्जन करणं म्हणण्यापेक्षा, पैसे मिळविणं असं म्हणणं सोपं वाटतं. मी बहुतेक मध्यमवर्गीय मराठी शब्द वापरले आहेत. कारण संस्कृतमय शब्द, सध्द्याच्या पिढीला समजायला कठीण आणि जोडाक्षरांमुळे संगणकावर टाअीप करायलाही कठीण. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं, शिक्कामोर्तब करणं, नमनालाच घडाभर तेल जाळणं, अशा प्रकारचे, सध्याच्या पिढीला न समजणारे शब्दप्रयोग, शक्यतोवर टाळले आहेत.

गजानन वामनाचार्य
St. Louis (Missouri) USA.
गुरूवार, ११ सप्टेंबर २००३

लेखक : गजानन वामनाचार्य / Gajanan Wamanacharya प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com