Sale!

पासबुक आनंदाचे – दिवाळी अंक 2022

200.00 0.00

व्यास क्रिएशन्सचा दिवाळी अंक २०२२

प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations
छापील अंकाची किंमत : रु. २००/-

हे इ-पुस्तक विनामूल्य वाचण्यासाठी पुस्तक वाचा या टॅबवर क्लिक करा. 

SKU: vyas-passbook-aanandache-diwali-2022 Category:

Description

व्यास क्रिएशन्सचा दिवाळी अंक २०२२

प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations
छापील अंकाची किंमत : रु. २००/-

हे इ-पुस्तक विनामूल्य वाचण्यासाठी पुस्तक वाचा या टॅबवर क्लिक करा. 

प्रकाशक संपर्कव्यास क्रिएशन्स्
डी-१, सामंत ब्लॉक्स, श्री घंटाळी देवी मंदिर पथ, नौपाडा, ठाणे (प.) ४०० ६०२.
दूरध्वनी : २५४४७०३८ / ९९६७८३९५१०
Email : info@vyascreations.comvyascreations@gmail.com
Facebook : www.facebook.com/joinvyascreations

संपादकीय

यंदाची दिवाळी जरा औरच आहे. गेल्या दोन वर्षातील मळभ आता दूर झाले आहे. भीतीची, अस्थिरतेची, निराशेची भावना काही अंशी मिटली आहे. पुन्हा हे चराचर आनंदाने, चैतन्याने, समाधानाने भरून जात आहे. दिवाळीचा सणच असा आहे अंधाराचा, दु:खाचा नाश करून अनंत दिव्यांच्या साथीने मनामनात सुखाची लहेर निर्माण करतो.

उत्साहाचा आणि चैतन्याचा उदय होत असताना आपल्या समोर यंदाचा ‘पासबुक आनंदाचे’ हा दिवाळी विशेषांक सादर करताना अतीव समाधान लाभत आहे. यंदा आपल्या या अंकाचे दहावे वर्ष. ही दशकपूर्ती वर्ष साजरे करताना प्रकाशक या नात्याने निश्चितच आनंद होत आहे.

यशस्वी उद्योजकापासून प्रत्येक सामान्य माणसाच्या जिवाभावाची असते ती बँक. आपण बँकेशी तिथल्या व्यवहाराशी जोडले जातो. कधी फक्त व्यवहाराने तर कशी भावनेने. पण ही भावना जपतात आपले बँक कर्मचारी. प्रत्येक माणूस का कलाकार असतो. फक्त त्याला तशी संधी मिळत नाही. म्हणून जरा हटके विचार करत आम्ही बँकर्स साहित्यिकांचा शोध घेतला आणि जाणवलं बँकेतील आकडेवारी करत करत शब्दांशी असलेली यांची मैत्रीही विशेष आहे. म्हणूनच बँकिंग साहित्यिकांना लिहिते करण्यासाठी ‘पासबुक आनंदाचे’ या अंकाचं घाट घातला. आज बघता बघता या अंकाने बँक, बँकिंग सहयोगी आणि सारेच रसिक वाचक यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. आम्ही सार्‍यांचे शतश: ऋणी आहोत!

दरवर्षी एक विशिष्ट विषय आपल्यासमोर मांडतो. यंदाचा विषय हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. ‘पैसा’. ज्याच्यावर आपली अवघी जिंदगी अवलंबून आहे, हा पैसा नक्की काय आहे, तो आपल्या आयुष्यात कसा आला आणि पर्यायाने उभी राहिलेली वित्त व्यवस्था या सार्‍यावर प्रकाश टाकणारा ‘पैसा : उत्क्रांती ते वित्तव्यवस्था’ हा विशेषांक प्रकाशित करीत आहोत.

खरं तर ‘पैसा’ ही संकल्पना मोठी आहे. भौतिक, व्यावहारिक, मानसिक, अशा विविध पातळ्यांवर ती विराजमान आहे. जसा प्रत्येकाला त्याचा श्वास प्रिय असतो, तसा त्याचा पैसा प्रिय असतो. पैसा हा आपल्या जगण्याचा आधार आहे. पैसा म्हणजे सगळं काही मानणारी एक मानसिकता आहे, तर पैसा म्हणजे सगळं काही नाही असं मानणारीही आहे. पैसा म्हणजे काय याचं वर्णन आपल्या प्राचीन साहित्यात वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे. आपल्या संत साहित्यात सर्वच संतांनी या विषयी लिहिले. ‘पैसा’ याला प्रतिशब्द धन, वित्त, अर्थ, पुंजी, संपदा, लक्ष्मी, दौलत, संपत्ती, माल, रुपया अशी कितीतरी आहेत. पण संत साहित्यात ‘धन’ हा शब्द अधिक वापरला आहे. धन या शब्दातच त्यांना समजावून सांगायचे होते की, पैसा हे दुधारी शस्त्र आहे. त्याला किती महत्त्व द्यायचं आणि तो कसा जपायचा याचं सखोल मार्गदर्शन आपल्याला संतसाहित्यात वाचायला मिळतं. संत ज्ञानेश्वर सांगतात, ‘धनत्यागे दवडणे, भय जैसे’. पैशाचा त्याग केला की आपोआप भयाचा त्याग होतो. संत नामदेव पुढे जाऊन सांगतात, ‘संपत्तीच बळे, एक जाले आंधळे’. पैशाने लोक आंधळे होतात.

यापुढे जाऊन संत एकनाथांनी पैशावर जवळपास पन्नास-साठ ओव्या लिहिल्या आहेत. पैसा कसा घातक आहे याचे अनेक दाखले ते देतात. ‘निधी सापडलिया सांग, अत्यंत वाढे विषयभोग’ ‘द्रव्यापाशी आधिव्याधी, द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी, द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निरवधी, द्रव्यापाशी अति विकल्प, द्रव्यापाशी असे पाप, द्रव्यापाशी अति संताप, पूर्ण दुःखरूप ते द्रव्य.’ रामदासांनी राष्ट्रप्रेम आणि शक्ती उपासना हेच धन मानले. सारे काही पैशाने होत नाही तर इच्छेने होते, असे ते सांगतात. संत तुकाराम म्हणतात , ‘तुका म्हणे धन भाग्य आशाश्वत जाण’. धनाने मिळालेले भाग्यही आशाश्वत असते.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
शब्दचि आमुच्या जीवीचें जीवन,
शब्द वाटे धन जनलोका
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव,
शब्देचि गौरव पूजा करू

अशी शब्दांचीच पूजा बांधणारे तुकाराम महाराज लेखकांचे आश्रयस्थान आहेत. दिलेला शब्द कधी मोडू नये असे का म्हणतात तर शब्द हे धन आहे. शब्द धनासारखे वापरले तर धन आपोआप हाती येते. तेव्हा शब्द जपून वापरा, तेच धन होते, हे खरे आहे.

वस्तुस्थिती आणि भविष्य याची सांगड कशी नैतिकतेने घालायची यासाठी हे विचार मोलाचे ठरतात. बाकी काही असलं तरी पैसा हा आता अविभाज्य घटक बनला आहे. पण ती मिळवण्याची साधनसूचिता ही ज्याने त्याने ठरवली पाहिजे. पुन्हा एकदा संत तुकारामच आठवतात –

जोडोनिया धन, उत्तम व्येव्हारे।
उदास विचारे वेच करी॥

जीवन जगत असताना माणसाला धनसंपत्तीची गरज असते. ही धनसंपत्ती आपण नीतिमत्ता किंवा नीतिभावाच्या व्यवहाराने संपादन केली पाहिजे. संपत्तीची जपणूक करत असताना त्यात कुठलीही आसक्ती नसावी, मोह नसावा. केवळ आपल्याच सुखाचा विचार करून आपण कृतिसिद्ध होणे हे अधमपणाचे लक्षण आहे. त्यामुळे समाजजीवनाच्या गतितत्त्वात खीळ निर्माण होते. म्हणूनच आपल्या बरोबरच आपण इतरांचाही विचार करणे ही बाब सर्वांच्याच हिताची असते.

ही दिवाळी अशा उच्च विचारांनी साजरी करू या! आपण अंगणात दिवे उजळतो, ते अंधारावर मात करण्याच्या उमेदीनेच ना? अर्थ तेजाची दिवाळी साजरी करत घराघरातला आनंद भरभरुन उतू जाऊ दे! शुभंकराचा स्पर्श लाभलेलं सुखाचं भरलं माप घराघरात ओसंडून वाहू दे! या वर्षीच्या ’व्यास दीपोत्सवा’चा तोच तर सांगावा आहे! या दिवाळी अंकाच्या निर्मितीत हातभार लावणारे लेखक, वाचक, निर्मिती प्रक्रियेतील सर्व घटक, विक्रेते या सगळ्यांनाच, येत्या काळात प्रकाशाचे पर्व अनुभवण्यास मिळो. याच शुभेच्छा!

–  नीलेश वसंत गायकवाड

मोफत वाचा....