पानिपत – विश्वास पाटील

मराठी माणसाला इतिहासात रमायला नेहमीच आवडतं. त्यातही तो इतिहास आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या सांगणारा असला, तर बघायलाच नको! वर्तमानातील कठोर वास्तवापासून दोन क्षण का होईना दूर जाता येणं, हा त्यातील बहुधा सर्वात मोठा लाभ असावा. त्यामुळेच कायम गतकालात, इतिहासात रमणार्‍या व्यक्तीची पलायनवादी अशा शब्दात अनेकदा हेटाळणीही केली जाते. तरीही ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काल!’ या पंक्तीवर भरवसा ठेवून असेल कदाचित, मराठी माणूस हा इतिहास आणि पुराणकथांमध्येच रममाण झालेला आढळतो. त्यातही मराठी माणसाचा सर्वात आवडता काल म्हणजे सतराव्या शतकात छत्रपती शिवरायांपासून सुरू होणारा आणि पुढे एकोणीसाव्या शतकात पेशवाईच्या अखेरीस येऊन थांबणारा, हे आता सर्वश्रुत झालं आहे. त्यामुळेच मराठीतील अनेक कादंबर्‍या आणि नाटकं ही याच कालातील गौरवशाली घटनांवर आधारित आहेत.

त्यात पुन्हा छत्रपतींनी उभं केलेलं राज्य पेशव्यांनी बुडवलं, या प्रचलित समजाची झालर या सार्‍या कालखंडास असल्यानं तर या दोनशे वर्षांच्या इतिहासाच्या दंतकथा कधी बनून गेल्या आणि त्यातून अनेक गैरसमजांचे देव्हारे कसे उभे राहिले, हे कोणाच्या लक्षातही आलं नाही.तरीही मराठी मनाचं या सार्‍या कालखंडाविषयीचं आकर्षण कमी झालेलं नाही.

पेशवाईच्या शे-सव्वाशे वर्षांच्या कालखंडात अनेक गौरवशाली घटना घडल्या. अटकेपार मराठी झेंडा फडकवण्याची घटना जशी त्याच काळातील, त्याचबरोबर पानिपतच्या युद्धात पदरी आलेला मानहानीकारक पराभवही त्याच काळातील. पानिपतवर मराठ्यांच्या पदरी आलेल्या पराभवास आज जवळपास सव्वा-दोनशे वर्षं लोटली आहेत. तरीही ती जखम कुरवाळण्यात आणि तो पराभव नेमका कोणामुळे नशिबी आला, याविषयीचं चर्वितचर्वण करण्यातच मराठी माणूस धन्यता मानतो.

अर्थात, एखादा संवेदनक्षम आणि इतिहासाचं थेट घटनास्थळी जाऊन अध्ययन करणाची इच्छा असलेला सृजनशील लेखक या सार्‍याकडे अगदी वेगळ्याच दृष्टीकोनातून बघू शकतो आणि त्यातून अद्वितीय स्वरूपाची कलाकृती उभी राहू शकते. विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ कादंबरी हे अशाच चिंतनशील लेखनाचं दुर्मिळ उदाहरण आहे. पाटील हे महाराष्ट्र सरकारच्या सेवेतील एक ज्येष्ट सनदी अधिकारी. असा माणूस हा खरं तर फायली आणि जीआर यांच्या गुंत्यातच अडकून पडायला हवा. पण पाटीलबुवांनी त्या गुंत्यातून बाहेर पडून अध्ययन आणि अभ्यास यास वाहून घेतलं. शिवाय त्यांच्या लेखणीला मराठी मातीचा एक अस्सल रंग होताच. त्यामुळेच १९८८ मध्ये ही कादंबरी प्रसिद्ध होऊन दोन दशकं उलटून गेल्यावरही तिच्या आवृत्त्यामागून आवृत्या प्रसिद्ध होत राहिल्या.

इसवी सन १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या या लढाईकडे बघण्याचा एक संपूर्ण नवाच दृष्टीकोन विश्वास पाटील यांनी आपल्या या कादंबरीतून मराठी मनाला दिला आहे. दोनशे वर्षं मराठी मनावर असलेला ठसा पुसून टाकण्याचं काम सोपं नव्हतं… पण थेट पानिपतच्या रणभूमीवर दिवसच्या दिवस काढल्यानंतर पाटलांच्या हाती अनेक नवे तपशील आले होते आणि त्यातून अनेक जुन्या संदर्भांचं वेगळंच विश्लेषण सामोरं येत होतं. बहुतेक इतिहासकालीन कादंबर्‍या वा नाटकं गतकालाचा गौरव करणार्‍या असतात. पानिपत अशा सर्व साहित्यापेक्षा वेगळी ठरते, याचं कारण पाटील हे सतत भूत-वर्तमान आणि भविष्य यांचं भान ठेवून या महासंग्रामाकडे पाहत राहिले आणि त्यातूनच मराठी लष्कर, त्याबरोबर गरज नसताना पुण्याहून गेलेले आणि पुढे अत्यंत अडचणीचे ठरलेले कुटुंबकबिले व बाजारबुणगे यांची हजारो मैलांची दौड आणि त्यांना पाठीशी घालत सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेली लढाई यांचं अत्यंत प्रत्ययकारी तसंच वास्तवदर्शी चित्रण उभं राहिलं.

राजकारणातले डावपेच, खलबतं, सत्तेच्या लालचेतून वा आपलंच वर्चस्व कायम राहावं म्हणून मराठी सरदारांनी केलेल्या दगाबाजीचं दर्शन जसं या कादंबरीतून घडतं, त्याचबरोबर अनेक मराठी सरदारांनी प्राणांची बाजी लावून दिलेली झुंजही आपल्यापुढे साकारत जाते. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, महादजी शिंदे, मल्हारबा होळकर, मस्तानीपुत्र समशेर, इब्राहिमखान गारदी अशा मराठी छावणीतील धुरंधरांच्या व्यक्तिरेखा पाटलांनी जितक्या तडफेनं उभ्या केल्या आहेत, तितक्याच ताकदीनं अहमदशहा अब्दाली, नजीब, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला, भरतपूरचा राजा सुरजमल जाट असे या संग्रामातील अन्य तालेवार खेळाडूही त्यांनी मैदानात उतरवले आहेत.

या सार्‍या चित्रणातून केवळ पानिपतची लढाईच आपल्यापुढे जिवंत होते, असं नाही तर अठराव्या शतकातील तो सारा कालखंड, त्या काळातील समाजजीवन, चालीरीती आणि जाती-जमातींमधील गुणदोषांसह डोळ्यापुढे उभा राहतो. त्यामुळेच विश्वास पाटील यांची ही कादंबरी गेली दोन दशकं मनात घर करून राहिली आहे.

— प्रकाश अकोलकर

“महान्यूज”च्या सौजन्याने

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*