ग्रंथ मनीचे गूज
₹0.00
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी चा वैशिष्टयपूर्ण उपक्रम.
संस्कृत साहित्याचे नाव घेतले की महाकवी कालिदास, भास, भवभूती, बाणभट्ट अशी विविध नावे समोर येतात. क्वचित प्रसंगी त्यांच्या ग्रंथाची नावे देखील वाचनात असतात. मात्र या ग्रंथात नेमके काय वर्णन केले आहे ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचत नाही.
या उपक्रमात अशा विविध ग्रंथांचा परिचय करून देण्याची लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीच्या विद्यार्थ्यांची आणि आयोजकांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने त्या ग्रंथांची निदान तोंड ओळख सगळ्यांना होईल. पुढे जाऊन ते मूळ ग्रंथ पाहण्याची इच्छा वाचकांमध्ये निर्माण होईल हे नक्की.
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
हे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
Description
प्रस्तावना – विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड
उपक्रम संयोजक आणि संपादक, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम ग्रंथ मनीचे गूज चा हा तिसरा ग्रंथाविष्कार. तिसऱ्या वर्षातील लेखांचे संकलन. आज मनामध्ये “बहु आनंद ! बहु कृतज्ञता !!” असा विलक्षण भाव आहे.
सलग तीन वर्ष विद्यार्थ्यांच्या द्वारे एखादा उपक्रम राबवणे हे किती कष्टदायक आणि आनंददायक देखील असते याचा आगळाच अनुभव या निमित्ताने घेता आला.
भलेही बरेचदा मागे लागलो. क्वचित प्रसंगी थोडा ओरडलो देखील. तरीपण त्या मागे लागण्याने का होईना अनेक विद्यार्थी ” लिहू लागले ” हे फार महत्त्वाचे आहे. यापैकी अनेकांनी आयुष्यात लिहिलेला हा पहिलाच लेख असेल. प्रकाशित होण्याची संधी तर तीन वर्षात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रथमच मिळाली. आपला लेख वृत्तपत्रात छापून आला याचा त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला पहिल्याच वर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभिनव उपक्रम म्हणून गौरविणे तथा महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षीच्या लेखांचे संकलन स्वरूप पुस्तकाचे प्रकाशन करताना माननीय कुलगुरूंनी केलेली मुक्तकंठ प्रशंसा उपक्रमाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व अधोरेखित करणारी होती.
अनेक विद्यार्थी/ विद्यार्थीनींनी मी दुसरा लेख लिहू शकतो / शकते का ? असा विचारलेला प्रश्न खरोखरच रोमांचकारी अनुभव आहे. तांत्रिकदृष्ट्या ती पूर्ण करता येणार नसली तरी त्यांच्यात ती इच्छा जागृत झाली हीच उपक्रमाची खरी फलश्रुती आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्रजी नगरवाला, उपाध्यक्ष माननीय रमेश बोहरा, सचिव ऍड.लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के यांच्यासह सर्व संचालक मंडळ तथा संस्थेच्या विविध आजीव सदस्यांनी वेळोवेळी उपक्रमाचे केलेले कौतुक पुढील कार्यासाठी शक्तीवर्धक होते. संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय श्री.रमेश काका अणे यांनी सुरुवातीला सातत्याने केलेल्या कौतुकाला नंतर मुकलो याची खंत कायम राहील.
मध्यंतरीच्या लॉकडाउनच्या अत्यंत विपरीत काळात आणि सध्या महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारतीच्या पुनर्निर्मितीच्या काळात ग्रंथांची प्राप्ती अत्यंत कठीण असताना देखील विद्यार्थी वर्गाने उपक्रमात राखलेले सातत्य निःसंशय कौतुकास्पद आहे. माझ्या या सर्व विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात त्यांना देदीप्यमान यश प्राप्त व्हावे अशा हार्दिक हार्दिक शुभकामना.
सगळ्यात महत्त्वाचे सहाय्य म्हणजे साप्ताहिक स्वदेश चे संपादक डॉ राहुल एकबोटे आणि त्यांच्या तांत्रिक सहकारी चमूचे. अत्यंत सुंदर आकर्षक सजावटीसह सर्व लेख प्रकाशित करून त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सुवर्णसंधी बद्दल हार्दिक कृतज्ञता.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, माननीय प्राचार्य, स्वदेश संपादक डॉ. राहुल एकबोटे महाविद्यालयाचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि सर्व वाचकांच्या प्रती उपक्रम संयोजक म्हणून हार्दिक हार्दिक कृतज्ञता.
जय गजानन.
स्वानंद गजानन पुंड
उपक्रम संयोजक
ग्रंथ मनीचे गूज.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
हे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीचाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com