मीच एव्हढा शहाणा कसा?
₹100.00 ₹50.00
गंभीर लिखाणाला जसा एक हेतू असतो तसाच तो विनोदालाही असतोच असतो. या पुस्तकातील सर्व लेखही याच पद्धतीचे आहेत. विविध निमित्तानं ते विविध ठिकाणी लिहिलेले असले तरी त्यात हा समान धागा आहेच. शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या निष्ठांना वाहिलेले विनोद यात आहेत.
स्मार्ट डिजिटल पुस्तक
लेखक : श्रीकांत बोजेवार
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी वरील Add to Cart या बटणवर क्लिक करा…
छापील पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
आपल्या आजबाजूला पाहिलं की आपणच एकटे एवढे शहाणे कसे, असा प्रश्न नेहमीच आणि हमखास पडतो. उदाहरणार्थ पावसाचंच घ्या ना. पावसाळा म्हटलं की अनेकांचा उर नुसता भरुन येतो. जरा चार थेंब पडले की व्हाट्सॲपवर कांदाभजी आणि वाफाळलेल्या चहाच्या कपांचा पाऊस पडतो. बरं, आपल्याला ना त्या भजांचा उपयोग ना चहाचा. मराठी भाषा तयार करता करता ज्या कुठल्या शहाण्या माणसानं ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ ही म्हण तयार केली त्याला भविष्यात व्हाट्सअॅप नामक एक भयंकर प्रकार जन्माला येणार याची नक्कीच कल्पना आली असावी. ‘बोलाचीच भजी आणि बोलाचाच चहा’, एवढाच काय तो फरक या म्हणीमध्ये झाला आहे. एकदा तर असंही वाटून गेलं की ज्याने व्हाटस्अॅपवर भजी आणि चहा पाठवला आहे, त्याच्या घरी जावं, मोबाईलच प्लेटमध्ये ठेवून त्याच्या समोर धरावा आणि म्हणावं, ‘खा किती भजी खायची ती आणि ढोस वाफाळलेला चहा ! ‘ नाही खाल्ली तर गरमागरम भज्यांच्या चित्रासह तो मोबाईलच त्याच्या घशात घालावा. पण मी स्वतःला आवरलं, कारण मोबाईल स्वस्त झाले असले तरी अजून भज्यांपेक्षा महागच आहेत.
पाऊस येण्याआधी मोर नाचतो वगैरे जनरल नॉलेज आम्हाला ग. दि. माडगूळकरांच्या गाण्यातून झालं होतं. पण आता बघावं तर टीव्हीवाले, पेपरवाले सगळेच आपले ‘मान्सून येणार, मान्सून येणार’ म्हणत नाचत असतात. हवामान खातं तर सारखं आपलं कमी दाबाच पट्टा म्हणून काहीतरी सांगत असतं. पाऊस जास्त झाला तर तो कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि कमी पडला तरीही कमी दाबाचा पट्टा तयार झाला म्हणून. त्यामुळं एकदा मी पट्टा विकत घ्यायला गेलो तेव्हा चक्क त्या दुकानदारालाच, ‘कमी दाबाचा पट्टा आहे तुझ्याकडे? ‘, असं विचारलं होतं. तो गोंधळला आणि म्हणाला, ‘साहेब, पोट सुटलं असेल तर एक छिद्र वाढवून देतो, म्हणजे दाब कमी होईल. ‘
पाऊस पडल्याचं काय एवढं कौतुक असतं तेच कळत नाही! पाऊस पडला म्हणून काही आपल्या बँकेच्या अकाऊंटमध्ये अतिरिक्त रक्कम जमा होत नाही, पाऊस पडला म्हणून काही आपला पगार वाढत नाही, पाऊस पडला म्हणून काही बायकोचा मेकअप लवकर संपत नाही, पाऊस पडल्याचा एवढा कसला आनंद? उलट, पावसाळ्यात टेन्शन वाढतं. ऑफिसातून घरी पोहचता पोहचता चार-चार वेळा, बॅगेत पाहून छत्री विसरलो तर नाही ना कुठे, याची खात्री करुन घ्यावी लागते. कारण आपण छत्री कुठेतरी विसरणार याची बायकोला खात्री असते. मी तर छत्री विकत घेताना नेहमीच एकसारख्या दोन छत्र्या घेतो आणि एक छत्री बॅगेत लपवून ठेवतो. म्हणजे, एक हरवली तरी बायकोला दाखवायला दुसरी तयार ! पण कधी कधी ही दुसरी छत्रीही कुठंतरी हरवते त्यामुळं पंचाईत होतेच.
निसर्ग हा आणखी एक डोक्याला नसता ताप. निसर्गाचं नाव काढलं रे काढलं, की व्याकूळ होऊन लगेचच, जाऊया का या रविवारी? असा प्रश्न विचारणारे बरेच असतात. पैसे आणि वेळ खर्च करुन, तंगड्या तोडत कुठंतरी निसर्ग बघायला जायचं म्हणजे काय? बरं, काश्मीरला गेलो काय आणि स्वीत्झर्लंडला गेलो काय, तीच ती झाडं, नद्या, पहाड आणि धूकं वगैरे. तिथं जाऊन करायचं काय? तर फोटो काढायचे !
लोक निसर्ग बघण्यापेक्षा फोटो काढण्यातच जास्त वेळ घालवतात. पाऊस पडला की हिरवंगार होणारंच सगळीकडे आणि पहाडाच्या माथ्यावर पडलेलं पाणी धबधबा होऊन खाली वाहात येणारच. त्यात पाहण्यासारखं काय असतं? आणि त्याचं काय एवढं कौतुक? धूकं पसरलं की एक तर काही नीट दिसत नाही, उगा डोळे फाडून फाडून पहावं लागतं. एकदा तर मी असाच सामाजिक दबावाखाली येऊन बायकोसोबत हिल स्टेशनला फिरायला गेलो. तिथं खूप धूकं होतं, काहीच दिसत नव्हतं म्हणून बायको आणि मी हातात हात धरुन फिरत होतो. थोड्या वेळानं धूकं कमी झाल्यावर लक्षात आलं की आपण भलत्याच बाईच्या हाती हात दिला होता. ती सॉरी म्हणून निघून गेली. मी काही सॉरी म्हटलं नाही, तिनंच माझा हात धरला होता, मी कशाला सॉरी म्हणू? तेवढा बाणेदारपणा माझ्यात नक्कीच आहे. पण माझ्या एक लक्षात आलं, धुक्याची आवड पुरुषांपेक्षा बायकांनाच जास्त असते. पण तेवढ्यासाठी लाखभर रुपये खर्च करुन हिल स्टशेनला जायची गरज काय? घरी मातीची चूल आणून त्या चूलीत चार लाकडं ढणढणा पेटवली तर अगदी घरभर चांगलं धूकच धूकं होईल. मग बघा किती डोळे फाडफाडून बघायचं ते. उगा आपलं त्या धुक्याचं कौतुक. घरी आल्या गेलेल्यांवर सूड घ्यायचा म्हणून त्यांना फोटोचे अल्बम दाखवून दाखवून बेजार करायचं असेल तर फोटोशॉपमध्ये जाऊन वाट्टेल ते करता येतं. ताडोबाच्या जंगलात काढलेले फोटो जिम कार्बेटमध्ये काढले आहेत म्हणून सांगितलं तरी कुणाच्या बापाला काय फरक पडतो? अल्बम पाहणारी व्यक्ती एवढी कंटाळून गेलेली असते, की ती काहीही सांगितलं तरी मान डोलावते आणि वाहं ! किती मस्त… असं म्हणंत म्हणंत मोठ्या कष्टानं जांभया दाबून धरत असते.
गिरीमित्र, ट्रेकिंग करणारे, उगाच डोंगरदऱ्यांमध्ये भटकायला जाणारे यांचंही जरा जास्तच कौतुक होतं. माणूस एकेकाळी कमरेला केळीची पानं बांधून असाच भटकायचा. त्याची प्रगती होत गेली आणि मग तो घर बांधून घरी राहू लागला. प्रगतीचं लक्षण असलेलं असं सुखाचं घर सोडून भटकायचं आणि काळाची चक्र उलटी फिरवायची, यात काय अर्थ आहे? बरं फिरुन आल्यावर तिथल्या कथा सांगून आपल्याला बेजार करतात. ‘अरे कसली थंडी होती म्हणून सांगू… ‘ नकोच सांगू ना मला. बेडरुमची दारं बंद करुन एसी ३५ वर ठेवला तर अर्ध्या तासात हिमालयातलं वातावरण तयार होतं. घरच्या घरी. दुसरं कौतुक तर अधिकच कंटाळवाणं. ‘डावीकडे खोल दरी, उजवीकडेही दरी आणि मध्ये फक्त तीन फुटांचा रस्ता… जीव मुठीत धरुन चालावं लागत होतं.’ याला काय म्हणावं? पैसे खर्च करुन, परक्या ठिकाणी जायचं आणि जीव मुठीत धरुन चालायचं. त्यापेक्षा मुंबईतल्या कुठल्याही टॉवरच्या गच्चीवर जायचं आणि कठड्यावर चढून चालायचं.. कुठं जायची काय गरज आहे?
ट्रेकिंगवाले तर कमरेला दोया बांधून आणि पहाडांना खुंट्या ठोकत ठोकत शिखरं वगैरे सर करतात. आज काय तर डाव्या बाजूनं शिखर गाठलं, आज काय तर उजव्या बाजूनं शिखर गाठलं. तिथं पोहचल्यावर हातात झेंडे वगैरे घेऊन फोटो काढायचे.
कुठल्याही मोठ्या बिल्डिंगमध्ये पायऱ्यांवरुन चढण्याऐवजी मागच्या बाजूनं पाईप धरुन, खिडक्यांचे गज धरुन दहा मजले चढलं तर तेवढीच मजा येईल की नाही? पण नाही. असं काही करायला गेलं तर पोलिस त्रास देतात, सोसायटीचा चेअरमन, सेक्रेटरी दम भरतात.
माझा एक कविमित्र एकदा म्हणाला, ‘शांत वातावरणात, नदीच्या वाहत्या पाण्यात पाय सोडून बसावं मस्त… कितीही वेळ गेला तरी उठावसंच वाटणार नाही, कारण नदीच्या प्रवाहाचा आवाज तुमच्याशी बोलत असतो…’ त्याचं सांगून झाल्यावर मी त्याला म्हणालो, ‘भूक लागली म्हणून दोन तासांनी उठलास ना तिथून, तर कानाखाली आवाज काढेन तुझ्या.’ नदीच्या पाण्यावर उमटणारे तरंग मोजायचे, समुद्राच्या लाटांचा हिशेब करायचा, बांबूच्या वनात वाजणारी शीळ ऐकायची, एकांताचा आवाज ऐकायचा.. सगळे रिकामपणाचे उद्योग. एका मित्रानं एकदा माझ्या कानात त्याचा इअरफोन खुपसला आणि दुसरं टोक मोबाईलमध्ये खूपसून मला म्हणाला, ‘ऐक… ‘ मी दोन-तीन मिनिटं ऐकलं, पण काहीच आवाज येत नव्हता. शेवटी मी म्हटलं, ‘अरे काहीच येत नाही ऐकायला.’ त्यानं माझ्या कानात खुपसलेला इअर फोन रागानं काढून घेतला आणि म्हणाला, ‘मी हिमालयात गेलो होतो, कसली गाढ शांतता आहे तिथं. तिथली शांतता रेकॉर्ड करुन आणली मी… तू अरसिक आहेस, तुला नाही कळणार त्यातली मजा.’
मी त्याचा इअरफोन परत त्याच्या कानात खूपसत म्हटलं, तुझी शांतता तुलाच लखलाभ. कुठंही गेलास तरी शेवटी माणसांच्या या कोलाहलात, गोंगाटात परत येतोस ना तू? निसर्ग, शांतता, धूकं सगळं चार दिवस बरं वाटतं. हा गोंधळ, हा आवाज, गर्दी यातलं काव्य तुला कधी कळणार? मी काय म्हणत होतो ते त्यानं ऐकलंच नाही, कारण तो शांतता ऐकत होता. मला नेहमीचाच प्रश्न पडला, मीच एवढा शहाणा कसा?
लेखक : श्रीकांत बोजेवार
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
Meech Evadha Shahana Kasa ?
Shrikant Bojewar
Anagha Prakashan
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com