काळाराम ते केदारनाथ

अध्यात्म व तत्त्वज्ञानावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. पण ते ग्रंथ वाचून झाल्यावर मनात निर्माण झालेल्या सार्वत्रिक प्रश्‍नांची उत्तरे देणारे ग्रंथ मराठी वाङ्मयात फारसे आढळत नाहीत. ‘काळाराम ते केदारनाथ’ या आत्मशोधाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या ग्रंथाने ही उणीव भरून काढली आहे. आयुष्याचे ध्येय काय असावे, आनंदप्राप्ती कशी होते, जप, तप, आहार, विहार, संन्यास, साधना ह्यांचे आध्यात्मातील महत्त्व, रोजच्या जीवनात षङ्रिपूंवर विजय मिळवून प्रेमाने कसे जगावे हे व यासारखे असंख्य प्रश्‍न सर्वसामान्य वाचकाला पडत असतात. ओढ शाश्‍वत अनुभूतीची हा ग्रंथ वाचल्यानंतर वाचकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी आत्मियतेने केला आहे.

अत्यंत सरळ, सोप्या व सुलभ भाषेत, रोजच्या जीवनातील रेडिओ, नळ, बुलडोझर, लाकूड, अग्नि, समुद्राच्या लाटा इ. साध्या साध्या उदाहरणांच्या साहाय्याने तत्त्वज्ञानातील गहन संकल्पना हा ग्रंथ उलगडत जातो. अध्यात्म, भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान हे सर्वसामान्य वाचकाला एरव्ही दुर्बोध वाटणारे विषय, पण ‘काळाराम ते केदारनाथ’ हा ग्रंथ वाचकाला प्रवास वर्णनाच्या अनुभूतीतून या दुर्बोध वाटणार्‍या विषयांच्या दालनात लीलया केव्हा घेऊन जातो ते ग्रंथ एका बैठकीत वाचून झाल्यानंतरही लक्षात येत नाही ! हिमालयाच्या उंचीवर मिळालेले हे जीवनविषयक मंथन व ज्ञान वाचकाच्या अंतर्मनाची खोली गाठते. उंचीतील बहिर्मुखता व खोलीतील अंतर्मुखता यांना स्पर्श करीत असतांनाही चित्ताच्या समस्थितीतील आनंद-अवस्थेची सम्यक ज्ञानप्राप्ती हे या ग्रंथाचे सौंदर्य आहे.

डॉ. सुनील कुटे

अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी

Rakesh Kadam