साहित्याच्या अवकाशात यशस्वी भरारी घेणारी ‘वारसा’ कादंबरी

ललित लेख, प्रवास वर्णन, दीर्घ कथा, लघु कथा, काव्य संग्रह ह्या अनेक लेखन प्रकारांमधीलच ‘कादंबरी’ हा वाङमय प्रकार मराठी साहित्याचा एक अविभाज्य आणि लोकप्रिय लेखन प्रकार आहे. भाषेतील कादंबऱ्यांनी आपल्या मराठी साहित्याचा ठेवा समृध्द केला आहे.

प्रत्येक वाचन प्रेमी मराठी तसेच अमराठी रसिकांची मराठी साहित्याशी असलेली नाळ जोडून ठेवण्याची महत्त्वाची भूमिका कादबंऱ्यांनी बजावली आहे. आज फक्त मराठी कादंबऱ्या वाचणारा एक स्वतंत्र वर्ग आहे जो प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक कादंबरीला आवर्जून दाद देत असतो. लेखक व्यंकट पाटील यांची ‘वारसा’ ही नवी कादंबरी अशाच कादंबरीवेड्यांसाठी पर्वणी आहे.

‘वारसा’ ही एक कौटुंबिक कादंबरी आहे. ज्याचे कथानक मुंबई आणि सोलापूर आसपासच्या ग्रामीण भागात घडते. मुंबईतल्या एका गजबजलेल्या समुद्र किनारी एका संध्याकाळी या कथेची सुरुवात होते आणि कथानक वेगवेगळी वळणं घेत सोलापूर जवळच्या भागात येऊन कथेच्या पहिल्या प्रकरणात कथेचा नायक दिनकर उर्फ दिनूशी आपली ओळख होते.

नायकाच्या मनात चाललेली चलबिचल, अस्वस्थता आपल्यालाही अस्वस्थ करून जाते. पुढील प्रकरणातून इतर पात्रांची ओळख होते आणि दिनूच्या अवस्थेतचं कारणही उलगडतं. पुढे दिनूचा शोध सुरु होतो आणि गोष्ट अधिकाधिक रंगत जाते. कथेचा याहून अधिक भाग इथे सांगून मी आपला रस भंग करु इच्छित नाही. कादंबरीचा विषय वेगळा आहेच, पण अनोख्या सादरीकरणामुळे ही कादंबरी अधिक रंजक झाली आहे हे मात्र खरे.

कादंबरी म्हणजे केवळ डोक्यात घोळणारी चमकदार विषय-कल्पना नाही. त्याला एक वैशिष्टयपूर्ण मांडणी असते, घाट असतो आणि त्याला अनुसरून लेखक आपली गोष्ट पुढे नेत असतो. लेखक व्यंकट पाटील यांनी आपली कथा मांडताना कथाबीज, पात्र, प्रसंग, संवाद या सर्वच पातळ्यांवर सखोल विचार केलेला आहे त्यामुळे ही कादंबरी अधिकच रंजक बनली आहे. प्रत्येक पात्र आपल्यापुढे उलगडताना लेखकाने त्यांच्या मनात येणारे विचार, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, लकबी अगदी बारकाईने मांडल्या आहेत. त्तसेच प्रत्येक प्रसंग फुलवत असताना त्यात घडणाऱ्या घटनांचे आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. ज्यामुळे ते प्रसंग आपल्या डोळ्यांपुढे जिवंत होतात आणि आपणही त्या प्रसंगाचा एक भाग आहोत असल्यासारखं वाचकाला वाटतं. पण हे प्रसंग रंगवत असताना ते फार मोठे आणि कंटाळवाणे होणार नाहीत याचीही काळजी लेखकाने घेतली आहे. संवादात्मक शैलीतून आणि छोट्या छोट्या प्रकरणातून लेखक व्यंकट पाटील यांनी आपली गोष्ट पुढे नेली आहे.

व्यंकट पाटील ह्यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ आणि ‘घात’ ह्या दोन्ही कादंबऱ्यांना वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या ‘वारसा’ या तिसऱ्या कौटुंबिक कादंबरीलाही वाचक असाच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे.

लेखक व्यंकट जी. पाटील, तुमची लेखणी, साहित्याचे असेच दालनं व्यापत राहो हीच अपेक्षा आणि शुभेच्छा !

श्रीमती प्रज्ञा पंडित

 

पाने : किंमत : रु. सवलत किंमत : रु. पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : पोस्टेज / डिलिव्हरी : आयएसबीएन क्रमांक : आवृत्ती : बांधणी :