द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही
₹100.00 ₹80.00
(मराठी वाङमय परिषद, बडोदे यांचा मराठी अभिरुची गौरव पुरस्कारासह अन्य तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रथम प्रकाशित पुस्तक)
मर्चंट नेव्हीतल्या नाविकांना सततच्या सागरी प्रवासात जगभरातील विविध बंदरे, शहरे, गावे यांना भेट देण्याची संधी मिळत असते. तिथल्या विविध भाषा बोलणाऱ्या, विविध संस्कृतीतून आलेल्या, विविध देशांतल्या लोकांना भेटण्याची संधीही ह्या नोकरीत मिळत असते. असं म्हणतात; ‘केल्याने देशाटन येते शहाणपण!’ देशाटनामुळे विविध प्रदेश, विविध देश, संस्कृती, चालीरीती यांचा परिचय घडतो. त्या संस्कृतीत घडलेली वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात. व्यवहारज्ञान, जीवन जगण्याची कला उमगते आणि जसजसं अनुभवविश्व समृद्ध होत जातं; तसं माणसाचं एकंदर व्यक्तिमत्त्वही संपन्न होत जातं. हे सारं जरी खरं असलं तरी ह्या क्षेत्रातले अनुभव शब्दबद्ध करून सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविणारे असे लिहिते नाविक अधिकारी वा खलाशी मात्र खूपच कमी प्रमाणात आहेत. मराठीत तर अगदी विरळच. ह्याची कारणे अनेक असू शकतील. जसं की ह्या अत्यंत जबाबदारीच्या, शारीरिक कष्टाच्या नोकरीत असताना जहाजावर मिळणारा मर्यादित मोकळा वेळ किंवा सुट्टीवर असतानाही करावे लागणारे विविध कोर्सेस, द्यावा लागणाऱ्या विविध परीक्षा इत्यादी. ह्या सर्व अडचणींवर मात करून श्री. प्रथम म्हात्रे हे अनुभव लिहिण्याचे, ते शब्दबद्ध करून पुस्तक रूपात मांडण्याचे काम करू शकले; हे खरंच कौतुकास्पद आहे.
लेखक : प्रथम रामदास म्हात्रे
प्रकाशक : सृजनसंवाद
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
किंमत : रु. 100
सवलत किंमत : रु. 80
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
Description
प्रस्तावना
‘द फ्लोटिंग लाइफ इन मर्चंट नेव्ही’ हे श्री. प्रथम म्हात्रे यांचे पुस्तक वाचताना खूप आनंद झाला. एक तर ते माझ्याच व्यवसायातील म्हणजे व्यापारी नौकानयन क्षेत्रातील अधिकारी आहेत म्हणजे माझे समव्यवसायी आहेत. दुसरं म्हणजे त्यांनी हे पुस्तक खूप अभ्यासपूर्वक लिहिलं आहे. शेकडो नाविक अधिकारी आणि खलाशी दरवर्षी विविध प्रकारचे कोर्सेस करून जहाजावर नोकरीसाठी जात येत असतात. या अतिशय धाडसी व नवलपूर्ण जीवनात विविध प्रकारचे अनुभव ते घेत असतात. जहाजावर सोबत काम करत असताना दर्यावर्दी सहकाऱ्यांचे अनुभव ते ऐकत असतात. व्यापारी नौदलातील जहाजावरचा प्रत्येक दिवस वेगळा असतो. केवळ सतत बदलणाऱ्या समुद्राच्या, तिथल्या निसर्गाच्या रुपांमुळेच नव्हे; तर दररोज मिळणाऱ्या नवनवीन अनुभवांमुळे!
मर्चंट नेव्हीतल्या नाविकांना सततच्या सागरी प्रवासात जगभरातील विविध बंदरे, शहरे, गावे यांना भेट देण्याची संधी मिळत असते. तिथल्या विविध भाषा बोलणाऱ्या, विविध संस्कृतीतून आलेल्या, विविध देशांतल्या लोकांना भेटण्याची संधीही ह्या नोकरीत मिळत असते. असं म्हणतात; ‘केल्याने देशाटन येते शहाणपण!’ देशाटनामुळे विविध प्रदेश, विविध देश, संस्कृती, चालीरीती यांचा परिचय घडतो. त्या संस्कृतीत घडलेली वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात. व्यवहारज्ञान, जीवन जगण्याची कला उमगते आणि जसजसं अनुभवविश्व समृद्ध होत जातं; तसं माणसाचं एकंदर व्यक्तिमत्त्वही संपन्न होत जातं. हे सारं जरी खरं असलं तरी ह्या क्षेत्रातले अनुभव शब्दबद्ध करून सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविणारे असे लिहिते नाविक अधिकारी वा खलाशी मात्र खूपच कमी प्रमाणात आहेत. मराठीत तर अगदी विरळच. ह्याची कारणे अनेक असू शकतील. जसं की ह्या अत्यंत जबाबदारीच्या, शारीरिक कष्टाच्या नोकरीत असताना जहाजावर मिळणारा मर्यादित मोकळा वेळ किंवा सुट्टीवर असतानाही करावे लागणारे विविध कोर्सेस, द्यावा लागणाऱ्या विविध परीक्षा इत्यादी. ह्या सर्व अडचणींवर मात करून श्री. प्रथम म्हात्रे हे अनुभव लिहिण्याचे, ते शब्दबद्ध करून पुस्तक रूपात मांडण्याचे काम करू शकले; हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या कुटुंबाची शैक्षणिक, साहित्यिकदृष्ट्या संपन्न पार्श्वभूमी त्यासाठी नक्कीच कारणीभूत झाली आहे असं मला वाटतं. आपल्या मुलाने उत्तम साहित्य वाचावे असे वाटणारी आणि वाचनाची स्वतःला आवड असलेली आई, साहित्यप्रेमी मामा, मावशी यांचे कळत-नकळत झालेले संस्कार; तसेच प्रतिभावंत आजोबांचा वारसा ह्या साऱ्यामध्ये श्री. प्रथम यांच्या लेखन प्रेरणेचे मूळ आहे असे प्रकर्षाने वाटते.
व्यापारी जहाजावर नोकरीसाठी रुजू व्हायची इच्छा असणाऱ्यांना ‘मर्चंट नेव्ही’ म्हणजे व्यापारी नौदल हे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडू पाहणाऱ्या तरुणांना स्वानुभवावर आधारित असलेलं हे पुस्तक जहाजावरील आयुष्य कसं असतं हे समजून घेण्यासाठी खूप उपयोगी पडण्यासारखं आहे. या पुस्तकात श्री. प्रथम म्हात्रे या मरीन इंजिनीअर अधिकाऱ्याने जहाजासंबंधी सर्व प्राथमिक ज्ञान व माहिती दिली आहे. व्यापारी नौदलातील विविध कामासाठी वापरले जाणारे प्रचलित शब्द, त्यांचे अर्थ त्यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. व्यापारी जहाजावरील अधिकारी, त्यांची चढती व उतरती श्रेणी, त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या याविषयी लिहिले आहे. श्रेणीनुसार त्यांना लाभणारे गणवेश, त्यांच्या खांद्यावरील फिती, त्यांचे रंग व त्यातील फरक इत्यादी बाबतचा तपशील त्यांनी लेखांमधून नोंदविला आहे. जहाजाच्या वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबोधताना वापरायचे शब्दही त्यांनी नमूद केले आहेत. व्यापारी जहाजावरील कामकाज कॅप्टनच्या नेतृत्वाखाली कसे चालते याची माहिती ह्या पुस्तकात दिलेली आहे. हे कामकाज डेक किंवा नॉटिकल विभाग, इंजिनिअरिंग विभाग व तिसरा महत्त्वाचा विभाग म्हणजे चीफ कुकच्या अधिपत्याखाली असलेला केटरिंग विभाग अशा तीन विभागांमध्ये विभागलेले असते. डेक विभागाचा प्रमुख हा चीफ ऑफिसर तर इंजिनीअरिंग विभागाचा प्रमुख हा चीफ इंजिनीअर असतो इत्यादी माहिती त्यांनी पुस्तकातील ललित लेखांमधून उत्तम तऱ्हेने मांडली आहे. जहाज कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या जरी विभागलेल्या असल्या तरी सर्वांनी संघभावनेने काम करणे अपेक्षित असते. या संघाचे सामायिक उद्दिष्ट असते; आपले जहाज सुरक्षितपणे आणि उत्तम कार्यक्षमतेने कार्यरत ठेवणे. जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांनी मग ते कोणत्याही पदावर/ हुद्यावर काम करणारे का असोत; एक संघ म्हणून एकोप्याने काम केल्याशिवाय हे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही; हे ह्या पुस्तकातील ‘टीमवर्क ऑनबोर्ड अ शिप’ या लेखातून लक्षात येईल. एक संघ म्हणून काम करत असताना संघातील प्रत्येकाचे अनुभव व अनुभवी कर्मचाऱ्यांचा सल्लाच कामी येत असतो.
जहाजावर काम करताना हे माझे काम नाही, हे मला माहीत नाही असे सांगून जमत नाही. जहाजावरचे एकंदर वातावरण कसे असते याची कल्पना श्री. प्रथम यांच्या विविध लेखांमधून वाचकांना येईल. पुस्तकातील ‘कॅरम बोर्ड’ हा लेख जहाजावर परस्परांमधील वैयक्तिक संबंध चांगले असणे कसे गरजेचे असते, त्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी पार्श्वभूमी, संस्कृती, आवडी-निवडी याबद्दल आदर राखणे किती महत्त्वाचे असते हे उत्तमरीत्या अधोरेखित करतो. श्री. प्रथम म्हात्रे त्यांच्या जहाजावरील नोकरीच्या काळात जगभर फिरले आहेत, फिरत आहेत. युक्रेन, सिंगापूर, इंग्लंड, ब्राझील, साल्वाडोर, भूमध्य समुद्रातील माल्टा, अॅमस्टरडॅम, रॉटरडॅमसारखी जागतिक समुद्री वाहतुकीतली महत्त्वाची बंदरे अशी अनेक ठिकाणे पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे. पनामा, सुवेझसारखे कालवे पार करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. या साऱ्या भ्रमंतीचे वर्णन त्यांच्या या पुस्तकातील दुसऱ्या विभागात वाचायला मिळतं.
तिसऱ्या विभागातील ‘फ्यूचर व्हिजन’ नावाच्या एका लेखात लेखकाने जहाजावर पाहिलेल्या एका सहकाऱ्याच्या मृत्यूचा प्रसंग मांडला आहे. मला वाटतं हा प्रसंग वेगळ्या अर्थानं जीवनाकडे पाहायची दृष्टी देऊन जातो. वाचकाला अंतर्मुख करून जातो. जहाजावर असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृताचे शव योग्य रितीने बंदिस्त करून ते जहाजावरील मासे, मटण इत्यादी खाद्यपदार्थ ठेवायच्या शीत-खोलीत कसे राखून ठेवले जाते. नियमांनुसार मृत व्यक्तीची सर्व कागदपत्रे तयार करून ती शवासोबत पाठविण्याची व्यवस्था करावी लागते. हे अतिशय दुःखद असं काम सहकाऱ्यांना करावं लागतं. जहाजावरील वातावरणही तेव्हा तसेच नैराश्याने भरलेलं असतं; परंतु काही झाले तरी जहाज कोणासाठीही कधीच थांबत नाही. काही प्रसंग आयुष्यात खूप काही शिकवून जातात. श्री. प्रथम म्हात्रे यांनी लिहिलेला हा अनुभव वाचकांनाही बरंच काही देऊन जाईल. ‘स्टिवर्ड’ हा असाच एक लेख मनाला चटका तर लावून जातोच पण जहाज समुद्र प्रवासात असताना जहाजावर वैद्यकीय साधन सामुग्री मर्यादित असल्याने आपत्कालीन परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते व त्यातले गंभीर धोके काय आहेत हे देखील दाखवून जातो.
श्री. म्हात्रे यांनी आपल्या घरी एक फिश टँक बसविली आहे. त्याविषयी ‘फिश टँक’ या त्यांच्या लेखात लिहिताना त्यांनी जहाजावरील नाविकांच्या जीवनाची तुलना त्या पेटीतील माशांच्या जगण्याशी केली आहे. जहाज म्हणजे समुद्रातलं एक वेगळं असं जगच असतं हे सांगणाऱ्या या लेखातील काही ओळी जशाच्या तशा देण्याचा मोह मी आवरू शकत नाही. इथे श्री. म्हात्रे म्हणतात; ‘“कदाचित त्यांना त्यांचे जग हे फिश टँकच्या मर्यादित जागेत आहे असेच वाटत असेल म्हणून ते शांत आणि मुक्तपणे आहे तेवढ्या जागेत विहार करत असतात. दिवसा रात्री कधीही बघावे तेव्हा ते पाण्यात इकडून तिकडे फिरत असतात. मासे झोपत असावेत का? माशांना रडू येत असेल का? रडू येत असेल तर पाण्यात त्यांचे अश्रू कोणाला आणि कसे दिसत असतील? किंवा घरी आल्यावर एका फिश टँकमधून बाहेर आलोय म्हणून खूप आनंद होतो पण त्यासोबतच परत त्याच किंवा दुसऱ्या फिश टँकमध्ये पुन्हा जावे लागेल हीच चिंता सतावत असते. पुन्हा तेच किंवा त्यातले काही मासे किंवा सगळेच नवीन मासे सहकारी म्हणून मिळतील याची शाश्वती नसते. जहाजावर राहून आल्यावर घरी असताना फिश टँकमधून बाहेर पडून खुल्या समुद्रात पोहतोय असा काहीसा भास होत असतो.” वाह! सुंदर ! एक दर्यावर्दी आणि एक कवी म्हणून ही कल्पना मला खूप भावली. या पुस्तकातली अशी अनेक सौंदर्यस्थळे हे पुस्तक वाचताना आनंद देऊन जातात. श्री म्हात्रे यांनी त्यांच्या माध्यमातून जहाजावरील जीवनावर केलेले हे अत्यंत चपखल भाष्य आहे असे मला वाटते.
ते म्हणतात ते अगदी खरं आहे; जहाजावर राग-लोभ असूनही एका कुटुंबासारखेच राहावे लागते. आज अगदी मोजकी क्षेत्र अशी दिसतात की ज्यामध्ये काम करत असताना माणसाला आपल्या कुटुंबापासून, घरादारापासून दूर राहण्यावाचून पर्याय नसतो. आपले कुटुंब, मित्रमंडळी यांच्याविषयी प्रेम, या प्रियजनांविषयी ओढ हा माणसाचा स्थायीभाव आहे. या क्षेत्रात काम करत असताना अनेक आनंदाच्या क्षणांना माणूस मुकत असतो. आपले वाढदिवस तसेच गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळीसारखे सण बऱ्याचदा आपल्या कुटुंबासमवेत साजरे होत नसतात. अनेक प्रसंगात जहाजावरचे आपले सहकारीच आपली काळजी घेत असतात. ते एक कुटुंबच असतं. आपल्यावर प्रेम करणारी आपल्या कुटुंबातील माणसे दूर मायदेशी राहतात; ही चुटपुट जहाजावरच्या प्रत्येक नाविकाला लागून राहतेच. त्याला कोणताच इलाज नसतो. ह्यातून निर्माण झालेली भावनांची आंदोलनं, व्याकुळता, घरच्या ओढीने मनात निर्माण होणाऱ्या आठवणींच्या लाटा. हा सारा मनातला कल्लोळ ह्या पुस्तकात आलेला आहे. या क्षेत्रात काम करताना करायला लागणारा त्याग आणि कष्ट याची उत्तम कल्पना हे पुस्तक देतं. ह्या क्षेत्रातल्या कामाचं स्वरूपच असंच आहे. ते डोळसपणे स्वीकारूनच या क्षेत्रात तरुणांनी प्रवेश करायचा असतो.
ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मी जहाजावर एक प्रशिक्षणार्थी नाविक म्हणून गेलो त्याला आता चौतीस वर्षे होऊन गेली. हे पुस्तक वाचताना माझ्याही जहाजावरच्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. त्यावेळी जहाजावर संपर्कासाठी आजच्यासारखी प्रगत साधने नव्हती. आधुनिक सोयी नव्हत्या. जहाजावरून लिहिलेली आणि जहाजावर आलेली पत्रे; तीही २/३ महिन्यानंतर पोहोचणारी ! कुणा जहाजावर जाणाऱ्या-येणाऱ्या बरोबर दिलेली-आलेली असायची. पत्र हेच तेव्हा आम्हाला संवादाचे प्रमुख माध्यम असायचं. त्याकाळी मी जहाजावरून लिहिलेल्या पत्रांच्या व मला आलेल्या पत्रांच्या माध्यमातून ‘समुद्रायन’ हे माझं पहिलं पुस्तक जन्माला आलं. आज माझ्या पुढच्या पिढीतील एका समव्यवसायिक अधिकाऱ्याच्या पुस्तकाबद्दल मला लिहावं लागतंय हा माझ्याही आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे.
आमच्या क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञातील प्रगतीमुळे आलेले बदल, इंटरनॅशनल सेफ्टी मॅनेजमेंट (ISM) कोड, मेरिटाईम लेबर कनव्हेंशन (MLC) यासारख्या नवीन आंतरराष्ट्रीय कायद्यांमुळे आलेले बदल, स्टँडर्ड ऑफ ट्रेनिंग सर्टिफिकेट अँड वॉचकीपिंग (STCW) कनव्हेंशन नियमांमध्ये झालेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदल या साऱ्यामुळे जहाजवरील जीवनात, तिथे मिळणाऱ्या अनुभवात बरेच मोठे बदल झाले आहेत. पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे; तरी नाविकासाठी मूलभूत मानवी भावनिक पातळीवर सारं तसंच आहे. समुद्राची गाज, त्याच्या लाटांची आव्हानं तीच आहेत. ती आव्हानं, कष्ट पेलण्यासाठी लागणारी आंतरिक ऊर्जा, निश्चय, चिकाटी, तीच आहे. अखेर व्यापारी नौदलाच्या नाविकांच्या सन्मानार्थ लिहिलेल्या ‘नाविकाला कडक सलाम’ ह्या माझ्या कवितेच्या काही ओळी येथे उद्धृत कराव्याशा वाटतात.
दर्या पार करणाऱ्या नाविकाला कडक सलाम
साहस कष्ट त्यागाच्या पाईकाला कडक सलाम
सलाम तुझ्या कानोसा घेत, धुक्यात दाट पाहण्याला
अन्न वस्त्र यंत्र अवजड; समुद्रापार वाहण्याला;
सलाम माझा तुफानात मांडलेल्या त्या कामाला
सलाम तुझ्या डेकवरती; सांडलेल्या त्या घामाला
ऊन पाऊस झोंबता वारा; छातीवरती झेलण्याला
निसर्गाचे आव्हान जबरी; बेधडक पेलण्याला
सलाम तुझ्या महिनोंमहिने; महासागरात राहण्याला
हसत तुझ्या माणसांचा; विरह तो साहण्याला
सलाम दूर घरापासून; दिवस रात्र खपण्याला
दूर राहिलास तरी बंध; मनापासून जपण्याला
सलाम मित्रा तिच्यापासून; खूप दूर जाण्याला
आणि तरी शिळ घालत; प्रेमगीत गाण्याला
म्हणून माझा नाविकाला; मनापासून कडक सलाम
सलाम नाविका रोज माझा रोज तुला कडक सलाम
दर्यावर्दी आयुष्याची आव्हाने पेलू इच्छिणाऱ्या तरुणांना, त्यांच्या पालकांना पुस्तक व्यापारी जहाजावरील आयुष्याची ओळख करून देईलच पण अशा वेगळ्या आयुष्याबद्दल फारशी माहिती नसलेल्या सर्वसामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक उद्बोधक आणि वाचनीय ठरेल यात तीळमात्र शंका नाही. श्री. प्रथम म्हात्रे यांच्याकडून उत्तरोत्तर अशीच साहित्यसेवा घडावी ह्या शुभेच्छा मी त्यांना देतो!
– कॅप्टन वैभव दळवी
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
लेखक : प्रथम रामदास म्हात्रे
प्रकाशक : सृजनसंवाद
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
पुरस्कार
1) मराठी वाङमय परिषद (बडोदे) यांच्याकडून अखिल भारतीय स्तरावरील साहित्य अभिरुची गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
2) सारांश राज्यस्तरीय पुरस्कार, मिरज. प्राप्त झाले आहेत.
3) मराठी प्रवास वर्णन लेखक वाचक मंच यांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
4) मराठा मंदिर संस्था, प्रवास वर्णन द्वितीय पुरस्कार.
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
