माझ्या संगीत जीवनाची वाटचाल
₹100.00 ₹80.00
ख्यातनाम गायिका मालती पांडे (बर्वे) यांचे हे आत्मकथन आपल्याला मराठी भावसंगीताच्या सुवर्णकाळात घेऊन जाते.
लेखिका : मालती पांडे (बर्वे)
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
किंमत : रु. 100
सवलत किंमत : रु. 80
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
Description
ख्यातनाम गायिका मालती पांडे (बर्वे) यांचे हे आत्मकथन आपल्याला मराठी भावसंगीताच्या सुवर्णकाळात घेऊन जाते.
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
लेखिका : मालती पांडे (बर्वे)
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
लेखक संपर्क
प्रस्तावना
या आत्मकथनाला प्रस्तावना लाभली आहे ती खुद्द थोर गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी यांची….
मालती पाण्डे हे नाव १९४८ या वर्षापासून आजपर्यंत सतत सायांच्या मनात मधुर संगीतासाठी भरून राहिलेलं आहे. १९४५ पासून शास्त्रीय आणि सुगम या दोन्ही गायन प्रकारांत ज्यांनी मानाचं स्थान प्राप्त करून घेतलं अशा दोनच कलावती: एक सौ. माणिक वर्मा आणि दुसरी सौ. मालती बर्वे (पाण्डे).
१९४८ साली ‘वंदे मातरम्’ या चित्रपटातील ‘अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी’ या युगल गीतानं मालती पाण्डे हे नाव एकदम प्रकाशात आलं. मधुर आवाज, शास्त्रीय संगीताची अभ्यासपूर्ण जाण, लवचिक गळा, काव्यातील आणि प्रसंगातील भाव योग्य प्रकारे जाणून ते स्वरांच्या सहाय्यानं गळ्यातून व्यक्त करण्याचं नैसर्गिक कौशल्य या गुणांमुळं चित्रपट पार्श्वगायनाच्या क्षेत्रात ‘अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी’ या शब्दांनी त्यांनी जो गोड अपराध केला तो साऱ्या महाराष्ट्रानं वरदानासारखा उचलून धरला.
या कलावतीचा आणखी एक विशेष म्हणजे मराठी उच्चार जसे असावेत तसे तिच्या मुखातून येत होते. पार्श्वगायनाला अत्यंत आवश्यक असलेला आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे संगीत दिग्दर्शकानं सांगितलेली चाल त्याच्या सर्व अंगानं चटकन आत्मसात करणं हाही गुण त्या कलावतीत होता.
पार्श्वगायनाच्या संबंधात एक गोष्ट महत्त्वाची आहे की पार्श्वगायकाला वा गायिकेला चित्रपट गीत शिकवणारा संगीत दिग्दर्शक म्हणजे गायनशाळा चालविणारा गायन-मास्तर नव्हे. मी वर लिहिलेल्या सर्व कसोट्यांना उत्तम प्रकारे उतरणारा कलावंत अथवा कलावतीच त्यासाठी योग्य असते.
या सर्व गुणांनी युक्त अशा ह्या कलावतीचा, त्या वेळच्या मालती पाण्डेचा, चित्रपटसृष्टीतील प्रथम प्रवेश त्यामुळेच यशस्वी ठरला. ४८ ते ५४ पर्यंत सारा महाराष्ट्र मालतीबाईंच्या चित्रपट गीतांनी दुमदुमत होता. अपराध मीच केला, मनोरथा चल त्या नगरीला, हे वदन तुझे की कमळ निळे, एक गुपित सांगते तुला, विझले रत्नदीप गगनात, एका सुरात घुंगरु बोले, चलग सये वारुळाला, चिंचा आल्यात पाडाला, काय झालं बाई तरी आज, ‘श्रीकृष्ण दर्शन’ मधली मालती-बाईंनी गायलेली सर्व गाणी विशेषतः ‘सुखे जा झोपी राजकुमारी’ हे शुद्ध यमन कल्याणमधलं गीत, ‘विठ्ठल रखुमाई’ या चित्रपटातलं ‘सोनियाच्या शिंपल्यात गावला ग चिंतामणी’ अशी असंख्य गाणी मालतीबाईंच्या सार्थ गाण्यामुळे घरोघरी पोचली. अतिशय प्रेमानं लोकांनी ती आत्मसात केली. वर्षानुवर्ष जतन करून ठेवली. ‘लाखाची गोष्ट ‘ मधलं ‘त्या तिथे पलिकडे’ हे ज्याच्या मनात भरून राहिलं नाही अशी एकही व्यक्ती महाराष्ट्रात असेल असं मला वाटत नाही.
‘गीतरामायण’ मधली ‘आज मी शापमुक्त झाले’ आणि ‘कोण तू कुठला राजकुमार’ ही अगदी परस्पर विरुद्ध अर्थाची आणि प्रसंगांची गीतंही मालती-बाईच्या गाण्यांनी सार्थं वठली आहेत. मी वर उल्लेखिलेली गाणी आता लोकांना जुनी, बालबोध वळणाची वाटतात असं त्यांनी लिहिलं आहे पण आज उलट स्थिती अशी आहे की अशी जुनी गाणी आजच्या तरुण पिढीला सुद्धा आवडतात, ऐकावीशी वाटतात.
मी संगीत दिलेल्या चित्रपटांबरोबरच मराठीतील बहुतेक सर्व संगीत दिग्दर्शकांची अनेक गाणी मालतीबाई गायल्या आहेत. चित्रपट गीतांप्रमाणंच ध्वनिमुद्रिकांसाठीही मालती पाण्डे मिळावी ही इच्छा बहुतेक सर्व संगीतकारांच्या मनात असे. त्यामुळे त्यांच्या कितीतरी ध्वनिमुद्रिका अत्यंत श्रवणीय आहेत. त्या सर्व खूप गाजल्या. चित्रपट गीताप्रमाणंच ती गाणीही अजून लोकांच्या कानात आहेत. त्यांचा नवीनपणा आजही पुसला गेलेला नाही, यापुढं जाणारही नाही.
आशा भोसलेंचा उदय चित्रपटसृष्टीत होईपर्यंत माणिक आणि मालती ही दोन्ही नावं पार्श्वगायनासाठी मराठीत तरी अटळ होती. आशा भोसलेंनी मराठी पार्श्वगायनाचं क्षेत्र संपूर्णपणे व्यापून टाकलं अशा काळातही मालती पांडे ह्या पार्श्वगायिकेला या क्षेत्रासाठी अनुकूल, आवश्यक अशा बहुतेक सर्व गोष्टी परमे-श्वरानं दिलेल्या असल्यामुळे त्यांना यात टिकून राहणंच नव्हे तर यशाची चढती कमान गाठणं शक्य होतं. ( मुंबईच्या काही नामवंत संगीत दिग्दर्शकांनी गाणं ऐकून पार्श्वगायनासाठी बोलावलं होतं) पण…याविषयी पुढं लिहीन…
मालतीबाईंनी आपलं सांगीतिक आयुष्य अतिशय मोकळेपणानं काहीही दडवून न ठेवता आयुष्यातल्या अनेक अनुभवांसह सहज सुंदर भाषेत लिहिलं आहे. आई-वडिलांच्या वारशासह अनेक प्रयत्न, अनेक संकटं, अनेक गुरू त्यामुळे करावी लागलेली थोडी फार भटकंती हे सारं त्यांनी यथातथ्य लिहिलं आहे.
कलावंत हा विचारवंत असला तर योग्य-अयोग्य परिस्थितिसापेक्ष असा विचार आणि त्याचं योग्य मूल्यमापन करता येतं त्यामुळेच माडगूळकरांच्या काव्याचं सार्थ वर्णन, चित्रपट गीत, भावगीत, त्याचे संगीतकार, गायक, त्यांची गाणी, ढब यांचा बारकाईनं विचार मालतीबाईंनी केला आहे. कविता आणि भावगीत यातील भेद योग्य शब्दांत वर्णन केला आहे. ‘भावगीत’ याचा खरा अर्थ त्याच्या नावातूनच समजतो असं म्हणून त्याचं स्पष्टीकरण करताना त्या लिहितात की, “भावगीत म्हणजे निव्वळ तालासुरात गायलेली गीतरचना असे नसून ज्या गीतात कवीच्या मनातील भावनांचं, विचारांचं प्रतिबिंब तंतोतंत उमटतं ते भावगीत किंवा असं म्हणू या की अत्यंत भावपूर्ण रीतीनं म्हटलेलं जे गीत ते भावगीत. ” यापुढं लिहिताना शास्त्रीय संगीतातल्या एखाद्या बंदिशीचं जे उदाहरण तिनं दिलं आहे ते इतकं समर्पक आहे की ते मुळातूनच वाचायला हवं.
पूर्वीच्या गीतात चालीबरोबर पार्श्वसंगीताचं अवडंबर नसायचं. असं म्हणून पूर्वीच्या व आत्ताच्या स्वररचनांची, कवींच्या काव्यांची तुलना करून स्वतःचं मत सविस्तरपणे मांडलं आहे ते सर्वच योग्य अयोग्य हा विचार बाजूला ठेवला तरी सतत नवनवे प्रयोग करीत राहणं हा निसर्गतःच मानवी स्वभाव आहे. त्यातलं काही टिकेल, काही विस्मरणात जाईल, तसंच या प्रयोगामुळे असं काही नवीन निर्माण होईल की ते दीर्घकाळ लोकांना हवहवसं वाटेल. जग आता प्रत्येकाच्या इतकं जवळ आलं आहे की प्रत्येक क्षेत्रामधले नवे प्रवाह, नवी संशोधनं, नवे विचार यांच आकर्षण वाटण हे स्वाभाविक आहे. पाश्चात्त्य वाद्यांचा विशेषतः इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा, सुरावटींचा, त्यांच्या रचनापद्धतींचा आविष्कार आपल्या भारतीय संगीत रचनेत करावा असा मोह होणं हे आता टाळता येणार नाही पण त्याचा अतिरेक होतोय आणि त्यात आपले स्वर आणि शब्द बिचारे हिरमुसले होऊन जातात. हा मालतीबाईंचा विचार मात्र आपल्या संगीतकारांनी काळजीपूर्वक अभ्यासण्यासारखा आहे.
मालतीबाईंना चित्रपट गीतं, भावगीतं, सुगम संगीत हे फार लवकर आपलेसं करता आलं आणि पुढंही टिकविता आलं त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण त्यांचा त्या आधीचा आणि नंतरचाही शास्त्रीय संगीताचा अभ्यास.
मालतीबाईच्या गळ्यातला सूर हा त्यांना वारसा अधिकारानं मिळालेला आहे. थोड्याशा जाणत्या वयात आल्यापासून त्रिवेदी मास्तर, भास्करराव घोडके, विलायत हुसेन खां, हिराबाई बडोदेकर, भोलानाथ भट्ट, पद्माकर बर्वे, जगन्नाथबुवा पुरोहित असे एकापेक्षा एक सरस गुरुजन त्यांना लाभले. पार्श्वगायिका म्हणून दिगंत कीर्ती मिळविण्याची क्षमता असलेली मालतीबाई ते सोडून शास्त्रीय संगीताकडं पुन्हा वळल्या त्याचे कारण त्यांनीच आपल्या शब्दांत सांगितलं आहे: ” संगीत क्षेत्रात पदार्पण केल्यापासून नेहमीच माझ्या मनात येई. पार्श्वगायन, भावगीत गायन यापासून नाव मिळालं. थोडाफार पैसाही मिळाला पण पुढं काय? यात समाधान नव्हतं. नेहमी वाटायचं, हे अल्पसं भांडवल आपल्याला किती काळ पुरेल? पार्श्वसंगीत आणि भावगीत यांच्या बंदिस्त चौकटीत अडकून पडण्यापेक्षा जे जन्मभर पुरेल, समाधान देईल, बुद्धीला चालना देईल- नव्हे – जन्मोजन्मी शिकलं तरी अपुरं पडेल असं फक्त शास्त्रीय संगीतच आहे. तेव्हा हे जे अथांग आहे, असीम आहे याच्या पाठीमागे आपण का लागू नये? या अथांग सागरामधील एक थेंब जरी पदरी पडला तरी जीवन कृतार्थ होईल. या धारणेने मी शास्त्रीय संगीताच्या मागे लागले; अगदी गंभीर-पणे, पहिल्यापासून माझं हेच ध्येय होतं.
मालतीबाईंचं संगीत क्षेत्रातलं आजचं स्थान पाहिलं तर हा विचार योग्यच होता. त्यांच्या पार्श्वगायनाच्या काळात त्यांचं स्थान मोलाचं होतं. या विषयावर मी पुढं लिहीन असं मागं लिहिलं तो विषय आता लिहून टाकतो.
ज्या जिद्दीनं, श्रमांनी, गावाची, परिस्थितीची पर्वा न करता अत्यंत परिश्रमानं त्यांनी शास्त्रीय संगीताची साधना केली, अनेक गुरुजनांचा गाण्यातला वेगवेगळा घाट आपल्या गळ्यात बसविण्यासाठी तपश्चर्या केली, त्याच जिद्दीनं पार्श्वगायनातले वेगवेगळे प्रकार आत्मसात करण्यासाठीही प्रचंड मेहनत घेतली असती तर त्या याही क्षेत्रातली विशेष कोणीतरी निश्चित झाल्या असत्या. शास्त्रीय संगीतकाराला योग्य दृष्टी असेल आणि आवश्यक ते परिश्रम निर्धारानं करण्याची तयारी असेल तर हे साध्य होऊ शकतं.
मला हाही विश्वास आहे की शास्त्रीय आणि सुगम अशा दोन्ही प्रकारांत त्यांनी सारखंच यश मिळवलं असतं.
पार्श्वगायनाच्या कसोटीला उतरणाऱ्या व्यक्ती अपवादात्मक असतात. अशापैकी मालती पाण्डेच्या रूपानं मिळालेली गायिका या प्रकारातून आपणहून बाजूला झाली याचं दुःख वाटतं. पूर्णपणे शास्त्रीय संगीताचाच स्वीकार केल्यानंतर मात्र त्याचा जो सखोल विचार त्यांनी केला आहे त्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे.
शास्त्रीय संगीताचं वर्णन हिराबाई बडोदेकरांच्या आणि पं. ओंकारनाथ ठाकुरांच्या गाण्याचं वर्णन त्यांनी इतकं सुरेख आणि समर्पक शब्दांत केलं आहे की, एखाद्या रसिक पण डोळस प्रतिभावान साहित्यिकानंही वाचल्याबरोबर मुक्त कंठानं प्रशंसा करावी.
पं. ओंकारनाथ यांनी स्वतंत्र शिकवणार नाही असं सांगितल्यावर झालेल्या निराशेत ” आकाशात उंच भरारी मारण्याची माझी जबर महत्त्वाकांक्षा होती पण माझ्या पंखांत तेवढं बळ होतं किंवा नाही कुणास ठाऊक ” असं अगदी मोकळे-पणानं त्या लिहितात. “सांगीतिक जीवनाची वाटचाल” सांगताना त्यांनी सुभाषितं शोभतील अशी वाक्यं जागोजागी लिहिली आहेत.
नायकी पूर्णपणे आत्मसात झाल्यावर गायकीचा आविष्कार हा पूर्णपणे त्या कला-काराचा कल्पनाविलास असतो असं आत्मविश्वासानं लिहिणाऱ्या मालतीबाईंनी आपले पती प्रख्यात गायक श्री. पद्माकर बर्व्यांच्याविषयी प्रथम थोडेसे खारट, तिखट पण अंती गोड असे प्रसंग फार खुलवून लिहिले आहेत.
वयाच्या १७ व्या वर्षी मला गाणं ऐकवायला आलेली मालती पाण्डे आपली सांगीतिक जीवनाची वाटचाल लिहिते आणि त्याची प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य मला मिळतं यापेक्षा अभिमानास्पद योग कोणता? आणखी एक आश्चर्यकारक योगा-योग आहे. मालतीला सुरुवातीच्या काळात त्या वेळच्या ऑल इंडिया रेडिओनं गाण्यासाठी अपात्र ठरवलं होतं तसंच मलाही हिज मास्टर्स व्हॉईस या ग्रामोफोन कंपनीनं माझा आवाज रेकॉर्डिंगला योग्य नाही असं ठरवून मला अपात्र ठरवलं होतं आणि आम्ही दोघंही चित्रपटाच्या रेकॉर्डिंगसाठी एकाच गाण्यानं पूर्णपणे पात्र ठरलो. ते गाण म्हणजे ‘वंदे मातरम्’ या चित्रपटातलं युगल गीत (ड्युएट) ‘अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी. ‘ आम्हा दोघांनाही पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पुढं जे काही थोडं बहुत स्थान मिळालं ते याच गाण्यानं. मालतीबाई अशा भाग्यवान आहेत की श्री. पद्माकर बर्वे यांच्यासारखे उत्तम गायक त्यांना पती म्हणून लाभले आहेत. श्री. बर्वे यांनी अनेक रागांत अनेक उत्तमोत्तम बंदिशी बांधल्या आहेत. अशा तऱ्हेनं या क्षेत्रात अधिकार असलेल्या पतीचं मार्गदर्शन आणि सान्निध्य त्यांना जन्मभर लाभलं आहे.
उत्तम पती, उत्तम पुत्र आणि उत्तम कला लाभलेल्या मालतीबाईंचं पुढचं सारं आयुष्य या दोघांसह असंच कीर्तिमान राहील यात काही संशय नाही.
सारं आयुष्य शास्त्रीय संगीतासाठी वाहून घेऊन त्यात एक विशिष्ट स्थान प्राप्त करून घेतलेल्या सुरुवातीच्या मालती पाण्डे आणि आताच्या सौ. मालती बर्वेची ही सांगीतिक जीवनाची वाटचाल उदयोन्मुख आणि ध्येयवादी कलावंतांना प्रेरणादायी ठरेल.
– सुधीर फडके
मुंबई
१ डिसेंबर १९८८
