‘त्रि’धारा
₹100.00 ₹75.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
माणसाच्या मनात अशा कितीतरी धारा सतत वास्तव्याला असतात. काहीवेळा त्या जाणवत नाहीत. जाणवल्या तरी त्यांचे आकारमान इतके खुजे असते की, त्यांच्यावर परिश्रम करावेसे वाटत नाहीत. काही जणांकडे त्या धारांना जीभ/ ओठ देऊन बोलतं करण्याची शक्ती नसते. ते फक्त त्या धारा स्वतःपुरत्या राखतात, सहनही करतात.
लेखक : नितीन देशपांडे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ७५/-
प्रिमिअम सभासदांसाठी : रु. ५०/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
“त्रि” धारा – एका लेखकाचे तीन प्रवाह !
हा आहे तीन लघु कादंबऱ्यांचा संग्रह – रूढार्थाने एक सलग कादंबरी नाही. तिन्ही प्रवाह भिन्न, एका पात्रात मिसळलेले पण “संगम” नाही. स्वायत्तपण जपत समांतर धावणारे हे लेखन काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालंय, फक्त लेखक सामाईक ! दोन लघु कादंबऱ्या पूर्वप्रकाशित पण त्यांच्याबरोबर घरात बासनात असलेली तिसरी घुसडलेली. एका लघु कादंबरीचा फॉर्म डायरीचा, दुसरीचा पत्रापत्रीचा आणि तिसरी सरळधोपट वाहत जाणारी.
“मनाची डायरी” विस्कळीत तुकड्यांना एकत्रित बांधून ठेवण्याची पराकाष्टा करणाऱ्या तरुणाची. एकेक करून सगळेच हातातून निसटून जाणारे आणि हा स्तब्ध- मोकळ्या हातांचा, नोंदी करणारा फक्त !
“क्षितिज बोलावतंय” – पती-पत्नी नाते कसोशीने जपूनही आकाशाला ओ द्यायला निघालेल्या पत्नीने आपल्या पतीचा, कुटुंबाचा हात सोडण्याची गाथा. १९८६ च्या सुमारास करिअर आणि कुटुंब यांच्यातील द्वंद्व तितकेसे प्रखर नव्हते. पण काळाने हे लेखन आता सिद्ध केलेले आहे – DINK ( डबल इन्कम नो किडस) किंवा सिंगल पेरेंटिंग या टप्प्यावर स्थिरावलेला आजचा समाज. तंत्रज्ञानाने मात केलेली कुटुंब व्यवस्था आज पैलतीरावरच्या कोणत्या हाकेला ओ द्यायची या संभ्रमात आहे. पण काळाच्या पुढे जाऊन हे चित्र ” क्षितिज बोलावतंय” मध्ये सुमारे चाळीस वर्षांपूर्वी रेखाटले गेलंय.
“सहप्रवासी” मध्ये अभियांत्रिकीच्या चार वर्षांचा कालपट चित्रित झालाय. अर्थात त्यांत फक्त मित्र-मैत्रिणी नसून शिक्षक, नातेवाईक, मृत्यू, महाविद्यालयातील धमाल असा सर्वांगीण सहप्रवास आहे. त्यांतील पात्रे खरी आणि बहुतांशी आजही हयात आहेत. त्यांच्याच उपस्थितीत “त्रि”धारा चे प्रकाशन झाले होते. सत्य-कल्पनेच्या छायाप्रकाशात सहप्रवासी घुटमळते.
“त्रि”धारा प्रकाशित झाले १९९९ साली आणि आता त्या पुस्तकाचे नव्या रूपात आगमन होतेय. पण काळाच्या नदीत खूप पाणी वाहून गेले असले तरीही आजची जगण्यातील अपरिहार्यता तिन्ही लघुकादंबऱ्यांमध्ये तेव्हाही तशीच प्रतिबिंबित झालीय. तशा अर्थाने या “धारा” समकालीन आहेत आणि राहतील.
लेखक : नितीन देशपांडे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/- सवलत किंमत : रु. ७५/-
प्रिमिअम सभासदांसाठी : रु. ५०/-
Tridhara
Dr Nitin Deshpande
Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीचाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
प्रस्तावना
उगम
सगळं जगलेलं, भोगलेलं साहित्यातून व्यक्त करायचं अन् त्यानिमित्ताने पुन्हा ते जगायचं, या खेळाची गोडी कधी लागली कळलंच नाही. कदाचित लिखाणाची आवड निर्माण झाल्यावर ती वाढण्यासाठी हा ‘बाय – प्रॉडक्ट’ फायदाच जास्त कारणीभूत झाला असावा.
माणसाच्या मनात अशा कितीतरी धारा सतत वास्तव्याला असतात. काहीवेळा त्या जाणवत नाहीत. जाणवल्या तरी त्यांचे आकारमान इतके खुजे असते की, त्यांच्यावर परिश्रम करावेसे वाटत नाहीत. काही जणांकडे त्या धारांना जीभ/ ओठ देऊन बोलतं करण्याची शक्ती नसते. ते फक्त त्या धारा स्वतःपुरत्या राखतात, सहनही करतात.
एखादं मन मात्र त्या लाटा उधळून देतं- आकृतीबंधाचा, सो कॉल्ड व्याकरणीय नियमांचा फारसा विचार न करता !
शेवटी शब्दबध्द होणं महत्वाचं!
फॉर्म आपोआप त्यानुसार निवडला जातो, क्वचितप्रसंगी निर्माण केला जातो. आपण त्यावेळी किनाऱ्यावरून न्याहाळत राहावे, बस्स.
‘त्रिधारा’ सर्वच बाबतीत भिन्न आहेत. मी फक्त कॉमन.
‘सहप्रवासी’ हा त्यातला पहिला प्रवाह !
अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार जीवघेणी (!) वर्ष आणि प्रामुख्याने ठळक अशा जिवंत व्यक्तिरेखांचं चित्रण त्यांत आहे. साहित्य/ नाट्य/ चित्रपट या बाबतीत काही जुने उल्लेखही त्यांत आहेत, कारण हे सगळं लिखाण ऑगस्ट ८१ ते सप्टेंबर ८२ या कालावधीतलं आहे, तर त्यातलं जगणं हे त्याआधीचं म्हणजे १९७७ ते ८१ या दरम्यानचं.
हे अरण्यरुदन नाही, तक्रारयुक्त गळे काढणं नाही, कोणालाही त्यात बोल लावणं, त्यांच्याकडून खुलाशाची अपेक्षा करणं, असं काहीही अभिप्रेत नाही. हा आहे फक्त चार वर्षांचा कॅलिडोस्कोप आणि त्यांतील दूरगामी परिणाम करून जाणाऱ्या व्यक्ती/ घटना यांचे चित्रण ! ठसे ताजे-ताजे असतानाच, एका उर्मीत मी सगळं लिहिलं अन् ते सुखेनैव माझ्या पोतडीत पडून होतं. त्या लिखाणाला प्रकाशाची दारं दाखवायचं मनातही नव्हतं. काही मर्यादित वाचकांकडून, काही संबंधित प्रकरणांचं वाचन सोडलं, तर यातल्या कित्येक पात्रांना, मी त्यांच्याविषयी ‘असं काही’ लिहिलंय, अन् ते आता छापतोय, असं स्वप्नही आजपर्यंत पडलं नसेल. स्वत:चा मागोवा घेताना, यानिमित्ताने असं जाणवतं की ती चार धमाल, धतिंग वर्षे आणि त्यानंतरची नोकरीतील रुक्ष, कंटाळवाणी, नावडत्या वातावरणातील काही वर्षे यांचा मनात सतत संघर्ष होता. जुनं, जगलेलं हवंहवंस वाटत होतं, त्या वातावरणाची मोहिनी मनावर होती. जयंताला ते जमलं. तो परतून एम्. ई. करण्यासाठी गेला- तेवढीच दोन वर्षांची जादा संजीवनी ! मला ते शक्य नव्हतं, म्हणून मग लिखाणाचा पर्याय समोर आला.
‘मनाची डायरी’ चं तसं नाहीये. ती पूर्णतया काल्पनिक लघुकादंबरिका आहे. पण हे वाक्यही अर्धवट खरं, कारण त्यातली काही पात्रं माझ्या आसपास वावरली आहेत. फक्त एका काल्पनिक ओघात ती पक्की बसून गेली आहेत. ‘डायरी’ हा माझा आवडता फॉर्म! काळाचा एक शेवट नसलेला तुकडा मनाच्या डायरीवर कोरलेला, सगळे रंग/ स्वर सच्चे, पण तरीही एक वाताहात आणि डायरीच्या पानांवर उरलेले अवशेष. इथेही पुन्हा सगळं जगणं, भोगणं आलंच- निमूटपणे.
हताश, हतबल माणसं अशी नियतीला हात बांधून सामोरी जाणं, हे वाईटच, त्यांना तशा रूपात बघणं, त्याहून क्लेशकारक!
‘मनाची डायरी’ काही वर्षांपूर्वी ‘सा. सह्याद्रि’ मध्ये क्रमश: प्रकाशित झाली. खरंतर ही कादंबरी मी एका कादंबरी स्पर्धेसाठी लिहिलेली. पण स्पर्धेची मुदत संपून गेली, मग तीही अशीच कपाटात ‘सहप्रवासी’ च्या शेजारी! त्यादरम्यान कोल्हापूरच्या ‘पुढारी’ ने एक कथास्पर्धा जाहीर केली. दुसरं काही सुचत नव्हतं ( ही एक नेहमीची मनोवस्था ), म्हणून मी कादंबरीची कथा केली, त्याच नावाने स्पर्धेला पाठवून दिली आणि विसरूनही गेलो. त्या कथेला चक्क ‘पहिलं’ पारितोषिक मिळालं. मग मात्र काही परिचित, प्रथितयश साहित्यिकांकडे कथेची कात्रणं पाठवून त्यांची मतं जाणून घेतली. त्यांचा आश्वासक पाठिंबा जाणवला आणि मगच ‘सा. सह्याद्रि’ चा दरवाजा ठोठावला.
‘क्षितिज बोलावतंय’ या तिसऱ्या प्रवाहाचा चेहेरा आहे – पत्रापत्रीचा. एक समंजस, मर्यादित उदार पती आणि क्षितिजाला ओ द्यायला निघालेली पत्नी! त्यांच्या सहजीवनात तिला एक अवेळी स्वप्न पडतं अन् त्याचं सत्य रूप त्यांना दुरावणारं ठरतं. पुन्हा इथे सुष्ट-दुष्ट असा प्रकार नाही. मात्र त्याहीपलीकडे जाऊन एका अपरिहार्य हाकेला नाकारायचं कसं आणि कां, स्वतःची पटलेली खूण स्वीकारायची की नाही हेच मूळ सनातन द्वंद्व आहे. मग त्याला ठराविक, साचेबंद शेवट असूच शकत नाही. एका टप्प्यावर, आपल्या नात्याचं डोळस पुनरावलोकन करत, आपापली उत्तरं शोधत हे जोडपं विलगतं. पुन्हा विध्द करून जाते ती अपरिहार्यताच! किंबहुना, या तीन्ही कादंबऱ्यांच्या मुळाशी ही चिरंजीव अपरिहार्यता आहे. उत्तरं नसण्याचा राग आहे. व्यक्त करून का होईना, पण मनातली गजबज कमी होते का ते बघण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. इथेही मी कादंबरी इन्टू कथा हा प्रयोग केला अन् तो जमला. दरम्यान यावेळी ‘सा. सह्याद्रि’ ने मागणी केली अन् ‘क्षितिज बोलावतंय’ क्रमशः प्रकाशित झाली.
या दोन्ही लघुकादंबऱ्या पुस्तकरूपाने प्रकाशित कराव्यात असं गेली काही वर्षं मनात होतं, पण तोपर्यंत श्री. लोणकर आणि त्यांच्या प्रकाशनाची गाठ पडण्याचा योग आलेला नव्हता.
या पंक्तीला ‘सहप्रवासी’ आणून बसवावी, ही सूचना पूर्णतया श्री. लोणकर यांची.
असा हा ‘त्रिधारेचा’ प्रवास!
माझ्या मनात वेळोवेळी उगवलेले हे प्रवाह… तुमच्या दिशेने संगमाच्या रूपाने निघालेले पाणलोट…. तीन वेगळ्या धारा, पण अंती एक समग्र आनंद त्यांनी तुम्हाला द्यावा….. या त्रिपथगेच्या वाटेत हवे तिथे बांध बांधून, तुम्ही त्यांना निर्ममपणे अडवावे, त्यांची शक्य तितकी चिरफाड करावी ही माझी अपेक्षा !
यानिमित्ताने स्वत:लाच पुन्हा तपासून बघावं म्हणतोय.
नितीन देशपांडे